स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट याने आपल्यापैकी बहुतांश जणांचे आयुष्य व्यापले आहे. मोबाइल हातात नसेल तर आपले जगणे अशक्य आहे की काय असे वाटण्याइतकी वेळ आली आहे. जगभरातल्या सततच्या बातम्या, विविध इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारी माहिती, एकमेकांशी ऑनलाइन कनेक्ट राहण्याचा अट्टाहास या गोष्टींसाठी आपण सोशल मीडियाचा वापर करतो. इतकेच नाही तर यापुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सतत अपडेट करण्याचे अनेकांना जणू व्यसनच जडलेले असते.
हे अपडेट करुन आपण थांबत नाही तर ते कोण पाहतंय, त्यावर कोण काय प्रतिक्रिया देतंय हेही मॉनिटर करत राहण्याकडे आपले बरेचसे लक्ष आणि एनर्जी जात राहते. यामुळे नकळत आपले डोके व्यस्त राहते आणि त्याचा परीणाम म्हणजे काही वेळा इतर कामांकडे दुर्लक्ष होते. सततच्या स्क्रिन टाईममुळे येणारा ताण हा कित्येकदा मानसिक थकवा आणणारा, नैराश्याकडे नेणारा असू शकतो. यापासून स्वत:ची थोडी सुटका करायची असेल तर आपल्यालाच पुढाकार घेऊन काहीतरी करावे लागते. हे काहीतरी म्हणजे नेमके काय, तर डिजिटल गॅजेटसपासून काही काळासाठी दूर राहणे म्हणजे डिजिटल डिटॉक्स. सोप्या भाषेत सांगायचे तर डिजिटल उपवास म्हणजेच हे डिटॉक्स.
डिजिटल डिटॉक्स केल्याने नेमके काय होते?
१. मानसिक शांती – आपल्याला सोशल मीडियावर सतत काहीतरी अपडेटस येत असतात. हे अपडेटस नाही पाहिले तरी आपले फारसे काही बिघडणारे नसते. मात्र आपल्याला फोनवर जरा काही वाजले की सारखा फोन चेक करण्याची सवय असते. पण डिजिटल डिटॉक्स केल्यावर हे पूर्णपणे बंद होते आणि आपल्याला नकळत मानसिक शांती मिळते.
२. नात्यात जवळीक निर्माण होते – घरात, ऑफीसमध्ये किंवा मित्रमंडळी आणि समारंभांमध्येही अनेकांच्या हातात सतत फोन असल्याचे आपण पाहतो. त्यांना सतत काही ना काही स्क्रोल करण्याची सवयच जडलेली असते. पण आपण जर काही काळासाठी ठरवून डिजिटल डिटॉक्स केले तर व्हर्चुअल जगापासून आपण दूर राहतो आणि कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रमंडळींसोबत क्वालिटी टाईम घालवतो. त्यामुळे नकळत आपल्या नात्यात जवळीक निर्माण होते.
३. एकाग्रता वाढण्यास मदत – सोशल मीडियाचा सतत वापर करणाऱ्यांना कामावर किंवा इतरही कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. मात्र आपण फोन किंवा अन्य गॅजेटस काही काळासाठी दूर ठेवली तर नकळतच आपली एकाग्रता वाढते आणि काम चांगले होण्यास मदत होते.
कसे करायचे डिजिटल डिटॉक्स
१. गॅजेट फ्रि झोन – आपल्या घरात असा एक झोन असायला हवा जो पूर्णपणे गॅजेट फ्रि असेल. हा झोन म्हणजे आपल्या घराची बैठकिची खोली असू शकते, स्वयंपाकघर असू शकते, बाल्कनी किंवा अगदी आरामाची म्हणजेच झोपण्याची खोलीही असू शकते. पण प्रत्येक घरात असा झोन अवश्य असायला हवा. ज्यामुळे नकळत आपला काही वेळासाठी तरी फोन बाजूला राहतो.
२. स्क्रीन फ्रि विकेंड – शनिवार आणि रविवार हे आठवड्याचे सुट्टीचे दिवस असतात. या दोन्ही दिवशी आपण स्क्रिन फ्री राहण्याचे ठरवू शकतो. अगदीच शक्य नसेल तर एक किंवा अर्धा दिवसांचा विकेंड तरी स्क्रीन फ्री जाहीर केला तर घरातील सगळीच मंडळी स्क्रीनशिवाय वावरत असल्याने अनेक नवीन गोष्टी करता येऊ शकतात. याचा नव्या आठवड्यात एनर्जीने काम करण्यासाठी निश्चितच फायदा होतो.
३. रेंज नसलेल्या ठिकाणी प्रवास – महिन्यातून किंवा दोन महिन्यातून तुम्ही शहराच्या जवळपास प्रवास करत असाल तर असे ठिकाण निवडा जिथे फोनला अजिबात रेंज नसेल. त्यामुळे तुम्ही नकळतच फोनपासून दूर राहाल. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला दिसेल.
४. बटणांचा फोन वापरा – इंटरनेट आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर राहायचे असेल तर ठरवून काही ठिकाणी जुन्या पद्धतीचा बटणांचा फोन वापरा. जेणेकरुन तुम्ही एकमेकांना फोनही करु शकता आणि सोशल मीडियापासून दूरही राहू शकता.
– सायली जोशी-पटवर्धन