आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी करणे आणि त्यांच्या नकला करणे, यावर अनेक जणांचे करिअर उभे राहिले आहे. त्यापैकी एक म्हणजे कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन. हिंदू देवी-देवतांवर टीका करणे, अश्लील भाषेत बोलणे आणि त्यावरून विनोद करणे, यालाच तो त्याची कला समजतो.
नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक वेळा टीकाटिप्पणी होत असते. त्यांच्या नावाने लाखो रील्स व्हायरल होत असतात. मग ते ‘इस सज्जन को क्या तकलीफ है?’ या मीमपासून ते इटलीच्या राष्ट्राध्यक्ष मेलोनी यांच्यापर्यंतचे विविध प्रसंग असोत. या सर्व गोष्टी पंतप्रधान खेळाडूवृत्तीने पाहत असतात. स्वतःही त्यांचा आनंद घेत असतात.
सध्या समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन २ चर्चेत आहे. सीझन २ च्या एपिसोड क्रमांक ८ मध्ये ‘ओडी’ नावाचे एक पात्र आले होते, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत होते. त्यावेळी समय रैना याने लगेचच कुणाल कामरा याला व्हिडिओ कॉल केला. तुम्ही हा एपिसोड पाहिला असेल किंवा पाहणार असाल, तर तुम्हाला समजेल की, ‘ओडी’ नावाचे पात्र साकारणाऱ्या व्यक्तीने आपल्या हजरजबाबीपणाने कुणाल कामरा याला गप्प केले होते.
सध्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या शोमधील एक छोटीशी क्लिप काढून तिच्या रील्स बनवत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत आहेत. त्यामध्ये ते असे कॅप्शन देत आहेत की, आता कोणीही पंतप्रधानांची नक्कल करत आहे आणि त्यांचा दबदबा राहिलेला नाही.
परंतु, पंतप्रधानांनी कधीही अशा विनोदांना विरोध केलेला नाही. ते स्वतःही त्यांचा आनंद घेत असतात. पंतप्रधानांची मानसिकता हुकूमशाहीची नाही. राहुल गांधी, जे स्वतःला तरुण नेता समजतात त्यांनीही पंतप्रधानांवर अनेक वेळा टीकाटिप्पणी केली आहे. १९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा पंतप्रधानांची खिल्ली उडवण्याचेच आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी पुलकित मणी (इन्स्टाग्राम हँडल : @hunnywhoisfunny) या रील स्टारला बोलावले होते. त्यावेळी त्याने पंतप्रधानांची नक्कल केली. याआधीही त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि तोच व्हिडिओ ध्रुव राठी याने आपल्या चॅनेलवरून रिपोस्टदेखील केला होता.
१३ एप्रिल २०१९ रोजी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत पुढील विधान केले होते. “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… सभी चोरों के नाम में मोदी क्यों होता है? पता नहीं ऐसे और कितने मोदी निकलेंगे।” म्हणजेच, नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून त्यांनी मोदी आडनाव असलेल्या लोकांबद्दल प्रश्न उपस्थित केला.
पंतप्रधानांवर अशा प्रकारे टीकाटिप्पणी करणारे युवा नेते राहुल गांधी यांना मात्र स्वतःवरील टीका सहन झाली नाही, याचे उदाहरण म्हणजे; व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी राहुल गांधी यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. या चित्रात नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा प्रचंड मोठी दाखवली होती, तर राहुल गांधी यांना कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मागे लपलेले दाखवले होते. हे व्यंगचित्र कुंदापूर येथे एका होर्डिंगवर लावण्यात आले होते. व्यंगचित्रकाराच्या दाव्यानुसार, काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने फोन करून ते होर्डिंग काढण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी नगरपालिका प्रशासनाने हे होर्डिंग काढले.
राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते भरसभेत भाषण करताना बोलण्याचा ताबा कसा सोडतात, याचे सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले वक्तव्य. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ. श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित कार्यक्रमात खरगे भाषण करत होते. या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशातील महागाई, बेरोजगारी, निवडणूक प्रक्रिया आणि सरकारच्या कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. खरगे भाषण करत असताना सभागृहातील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टिप्पणी केली. त्याने मोदी कधीही जाणार नाहीत, असे म्हटले. यावर प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी, “मोदी का बाप भी जाएगा” असे वक्तव्य केले. त्यांनी हे वाक्य पुन्हा उच्चारल्याचेही वृत्त आहे. या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. खरगे यांच्या वक्तव्याला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला सभागृहात काही लोकांनी मारहाण केल्याचे वृत्तही समोर आले.
याउलट भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची सर्वाधिक गळचेपी केव्हा झाली असेल, तर ती १९७५ च्या आणीबाणीच्या काळात. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. या काळात वृत्तपत्रांवर पूर्वप्रसिद्धी सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार अबू अब्राहम यांनी इंदिरा गांधी सरकारवर अनेक बोचरी व्यंगचित्रे काढली. त्यांच्या काही व्यंगचित्रांना सेन्सॉरशिपमुळे प्रसिद्धीची परवानगी नाकारण्यात आली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांनाही प्रकाशित होऊ दिले गेले नाही.
अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीत २०१५ साली एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे आणि सोनिया गांधी यांच्यादेखील व्यक्तिरेखा होत्या. या व्यंगचित्रावर अरविंद केजरीवाल यांनी मोठा आक्षेप घेतला होता. भाजपने माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. तसेच, याविरोधात त्यांनी ट्विटही केले होते.
जे नरेंद्र मोदी स्वत: चा बाप काढला तरी शांत राहू शकतात, ते हास्यव्यंगाने का अस्वस्थ होतील. त्यांची प्रतिष्ठा भारतच नव्हे तर जगभरात वृद्धिंगत होत आहे. अशा विनोदाने त्यांची अप्रतिष्ठा होण्याचे काहीही कारण नाही. राहुल गांधी हास्य-विनोदकारांना व व्यंगचित्रकारांना आपल्या करामतींनी भरपूर खाद्य देत असतात. असे विनोद झाले तर ते किती खिलाडूपणाने घेतील याचा विचार करावा.
– शुभम उमेश पाठक