Thursday, October 29, 2026

स्त्री, महिला आणि नारी : मातृशक्तीचे त्रिविध दर्शन

Share

प्रस्तावना

भारतीय संस्कृतीत भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून साक्षात ‘शब्दब्रह्म’ मानली गेली आहे. संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्द हा कोणत्यातरी मूळ क्रियावाचक धातूपासून सिद्ध होतो; त्यामुळे एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती उलगडणे म्हणजे त्यामागे सामावलेली आपल्या पूर्वजांची जीवनदृष्टी समजून घेणे होय. आज दैनंदिन व्यवहारात ‘स्त्री’, ‘महिला’ आणि ‘नारी’ हे शब्द सामान्यतः समानार्थी मानून वापरले जातात. त्यामुळे, आजच्या शब्दांच्या दुनियेत या लेखमालेत आपण हे तिन्ही शब्द एकाच मातृशक्तीचे तीन स्वतंत्र पण परस्परपूरक पैलू कसे उलगडून दाखवतात हे पाहूया. भारतीय चिंतनाने तिच्याकडे कधीही केवळ एक उपभोग्य घटक किंवा अधिकारांसाठी पुरुषांशी संघर्ष करणारा वर्ग म्हणून पाहिले नाही; तर तिला कुटुंबाचा कणा, संस्कृतीची संवाहक आणि राष्ट्रउभारणीची मूळ आधारशिला मानले आहे.

‘स्त्री’: सर्जनशीलता आणि धारणाशक्तीचे रूप

‘स्त्री’ या शब्दाची व्याकरणिक व्युत्पत्ती अत्यंत सखोल आहे. महर्षी पतंजलींनी ‘महाभाष्य’ ग्रंथात ‘स्त्यै’ (एकत्र येणे, संघटित होणे आणि विस्तार पावणे) या धातूपासून ‘स्त्री’ शब्दाची निर्मिती स्पष्ट केली आहे. “स्त्यायति अस्यां गर्भः इति स्त्री” — म्हणजेच जिच्या उदरात नवा जीव आकार घेतो आणि विस्तारतो, ती ‘स्त्री’. यास्काचार्यांनी ‘निरुक्त’ ग्रंथात (३.२१) “स्त्रियः स्त्यायतेरपत्रपणात्” अशी व्याख्या करून याच धातूचा अन्वयार्थ शालीनता आणि संयमाशी जोडला आहे. याशिवाय ‘शब्दकल्पद्रुम’ कोशात ‘स्तृ’ (आच्छादन करणे, संरक्षण देणे) या धातूवरून “स्तृणाति इति स्त्री” अशीही व्युत्पत्ती दिली आहे. मायेच्या, वात्सल्याच्या आणि संस्कारांच्या छत्राखाली कुटुंबाला सामावून घेऊन सुरक्षितता देणारी शक्ती म्हणजेच स्त्री होय.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची धारणा करणारी मूळ प्रकृती म्हणजे स्त्री. ऋग्वेदातील विवाहसूक्तात (१०.८५) आणि महाभारताच्या शांतीपर्वात तिचे हेच स्थान अधोरेखित करताना “स्त्रियः श्रियश्च गेहेषु न विशेषोऽस्ति कश्चन” (घरातील स्त्री आणि साक्षात लक्ष्मी यांच्यात कोणताही भेद नाही) असे म्हटले आहे. ‘स्त्री’ हा शब्द वात्सल्यपूर्ण मातृत्व आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या तिच्या धारणाशक्तीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे भूमी बीजाचे संगोपन करून त्याचे वृक्षात रूपांतर करते, त्याचप्रमाणे स्त्री भावी पिढीवर सुसंस्कार रुजवून सशक्त समाजाची पायाभरणी करते.

‘महिला’: तेज, प्रतिष्ठा आणि पूजनीयतेचे प्रतीक

मातृशक्तीचा दुसरा महत्त्वाचा पैलू ‘महिला’ या शब्दातून प्रकट होतो. संस्कृत व्याकरणातील उणादि सूत्रानुसार (१.५५) ‘मह् पूजायाम्’ (पूजा, सन्मान, गौरव करणे) या मूळ धातूला ‘इलच्’ आणि स्त्रीलिंगी ‘टाप्’ प्रत्यय लागून ‘महिला’ हा शब्द सिद्ध होतो. ज्या धातूपासून ‘महान’ आणि ‘महत्’ हे शब्द बनतात, त्याच मुळाशी ‘महिला’ शब्दाचे बीज आहे. “मह्यते पूज्यते समाजे इति महिला” — म्हणजेच जिचा समाजात गौरव केला जातो आणि जी आदराच्या सर्वोच्च स्थानी विराजमान आहे, ती ‘महिला’.

ऋग्वेदात याच धातूपासून साधलेले ‘मही’ हे रूप विशाल पृथ्वी आणि तेजस्वी वाणीसाठी प्रयुक्त झाले आहे. पुढे पुराणे, स्मृती आणि अभिजात संस्कृत साहित्यात कुलशीलवान, प्रगल्भ आणि आदरणीय स्त्रियांसाठी हा शब्द रूढ झाला. संस्कृत काव्यपरंपरेत आणि आयुर्वेदात ‘प्रियंगू’ नावाच्या सुगंधी लतेलाही ‘महिला’ म्हटले जाते; पुण्यवान व तेजस्वी स्त्रीच्या केवळ पावन स्पर्शाने ही वेल बहरून येते, अशी त्यामागील रसिक संकल्पना आहे. ज्या समाजात महिलेच्या अस्तित्वाला आणि शीलाला वंदनीय मानून तिचा सन्मान केला जातो, तोच समाज खऱ्या अर्थाने संपन्न आणि सुसंस्कृत ठरतो.

‘नारी’: कर्तृत्व, सहजीवन आणि समर्थ नेतृत्व

तिसरा अत्यंत तेजस्वी शब्द म्हणजे ‘नारी’. पाणिनीय व्याकरणानुसार हा शब्द ‘नृ’ या मूळ शब्दापासून बनला असून त्याचा धातू ‘नॄ नये’ (पुढे नेणे, मार्गदर्शन करणे, प्रगती साधणे) असा आहे. समाजाला सन्मार्गावर पुढे नेणारा तो ‘नर’, आणि अष्टाध्यायीतील सूत्रानुसार (४.१.७३) त्याला ‘ङीन्’ प्रत्यय लागून ‘नारी’ हा शब्द सिद्ध होतो. म्हणजेच, कुटुंबाला, धर्माला आणि समाजाला योग्य दिशेने नेण्याचे नेतृत्वगुण जिच्यामध्ये उपजतच आहेत, ती ‘नारी’. सुभाषित परंपरेत “न अरिः अस्याः सा नारी” (जिचा कोणीही शत्रू नाही, जी अजातशत्रू राहून विश्वबंधुत्व जपते) असाही विग्रह केला जातो.

बृहदारण्यक उपनिषदात (१.४.३) नर आणि नारीच्या उत्पत्तीची एक मार्मिक कथा येते. सृष्टीच्या आरंभी एकाच परमतत्त्वाने स्वतःच्या अस्तित्वाचे दोन समान भाग केले; त्यातून पती (नर) व पत्नी (नारी) निर्माण झाले. द्विदल धान्याचे जसे दोन समान भाग असतात, तसेच पुरुष आणि नारी हे एकाच चैतन्याचे दोन समसमान अंश आहेत. त्यामुळेच भारतीय विचारात स्त्री-पुरुष समानता ही स्पर्धेतून किंवा संघर्षातून नव्हे, तर ‘परस्परपूरकतेतून’ आणि सहजीवनातून मांडली गेली आहे. पुराणातील शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप हे याच अद्वैताचे प्रतीक आहे.

‘नारी’ या शब्दातील नॄ (नेतृत्व करणे) हा धातू केवळ तात्त्विक नव्हता, तर प्रत्यक्ष व्यवहारात होता याची साक्ष ऋग्वेदातील मुद्गलानी (इन्द्रसेना) हिची कथा देते (ऋग्वेद १०.१०२). जेव्हा मुद्गल ऋषींच्या गाई शत्रूंनी पळवून नेल्या, तेव्हा स्वतः मुद्गलानीने रथाचे सारथ्य केले आणि युद्धभूमीवर नेतृत्व करून शत्रूंचा पराभव केला. या संदर्भात वेदांमध्ये स्त्रीचे वर्णन अबला म्हणून नव्हे, तर ‘वीरिणी नारी’ (शूर आणि नेतृत्व करणारी नारी) असे केले आहे.

मनुस्मृतीतील “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” या वचनातही तिच्या याच कर्तृत्वसंपन्न रूपाचा गौरव सामावलेला आहे.

मातृशक्तीचा जागर आणि राष्ट्रनिर्मिती

संस्कृत भाषेने दिलेले हे तीन शब्द म्हणजे भारतीय स्त्रीच्या परिपूर्णतेची त्रिसूत्री आहे. ‘स्त्री’ तिच्यातील जन्मदात्या वात्सल्याची, मातृत्वभावाची आणि संस्कारक्षमतेची जाणीव करून देते; ‘महिला’ तिचे सामाजिक तेज, प्रतिष्ठा आणि पूजनीय स्थान अधोरेखित करते; तर ‘नारी’ तिच्यातील उपजत प्रज्ञा, कर्तृत्व आणि समर्थ नेतृत्वाची शक्ती जागृत करते. ती एकाच वेळी कुटुंबाला सावरणारी प्रेमळ माता आहे आणि मूल्यांवर संकट आल्यास हाती शस्त्र व शास्त्र धरणारी रणरागिणीही आहे. हे स्वत्वाचे भान जेव्हा तिच्यात जागृत राहते, तेव्हा ती केवळ घराची नव्हे, तर संपूर्ण समाजाची आणि सशक्त राष्ट्राची भाग्यविधाती ठरते.

अन्य लेख

संबंधित लेख