प्रस्तावना
भारतीय संस्कृतीतील सण, उत्सव आणि पौराणिक आख्यायिका या केवळ काल्पनिक कथा किंवा एकांगी धार्मिक विधी नाहीत, तर त्यामागे मानवी जीवनाला आणि संपूर्ण राष्ट्राला एका सूत्रात बांधणारे प्रगल्भ नैतिक, सामाजिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ दडलेले आहेत. दिवाळीच्या आनंदोत्सवात आश्विन वद्य चतुर्दशीला साजरा होणारा ‘नरक चतुर्दशी’ हा सण याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. पश्चिमेकडील द्वारका, उत्तरेकडील मिथिला आणि पूर्वेकडील प्राग्ज्योतिषपूर (आजचे आसाम) यांना एकाच सांस्कृतिक आणि भौगोलिक सूत्रात गुंफणारी नरकासुराची कथा ही प्राचीन भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचा बोलका दस्तऐवज आहे.
नरकासुराचा जन्म एखाद्या राक्षसी कुळात झाला नसून साक्षात दैवी वंशाचा अंश होता. जेव्हा प्रलयकालीन महासागरात बुडालेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूंनी ‘यज्ञ वराह’ अवतार धारण केला, तेव्हा वराह आणि भूदेवी (पृथ्वी) यांच्या संयोगातून एका अत्यंत तेजस्वी बालकाचा जन्म झाला. प्रत्यक्ष भूमीचे अपत्य असल्यामुळे त्याला ‘भौम’ असे नाव मिळाले.
मात्र, भूदेवीने या बालकाला जन्म दिल्यानंतर मिथिला नगरीचा विदेह राजा जनक याच्या यज्ञभूमीच्या परिसरात आणून ठेवले. राजा जनक जेव्हा त्या तेजस्वी बालकाला उचलण्यासाठी पुढे आला, तेव्हा त्या बालकाचे मस्तक एका मानवी कवटीवर म्हणजेच ‘नर-कपालावर’ विसावलेले होते. ‘नर’ (मनुष्य) आणि ‘क’ (शिर, कपाल किंवा मस्तक) या दोन पदांच्या संयोगातून महर्षी गौतमांनी त्या बालकाचे नामकरण ‘नरक’ (मनुष्याचे कपाल स्पर्शून जन्मलेला) असे केले. राजा जनक आणि त्यांची पत्नी सुमती यांनी त्याला दत्तक पुत्राप्रमाणे वाढवून सर्व शस्त्र-शास्त्रांचे शिक्षण दिले. तर प्रत्यक्ष भूदेवीने ‘कात्यायनी’ दासीचे रूप घेऊन त्याच्या बालपणातील संगोपनावर देखरेख ठेवली.
भगवान विष्णूंचे वरदान
तरुण आणि पराक्रमी झाल्यावर नरकाचा प्रवास उत्तरेकडील मिथिलेतून थेट ईशान्य भारतातील कामरूप प्रदेशाकडे वळला. तिथे त्याने किरात वंशातील जुलमी राजा घटकासुराचा पराभव करून ‘भौम वंशा’ची प्रस्थापना केली. नरकाची राजधानी असलेले प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजच्या आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी आणि दिसपूर हा परिसर होय. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी या तरुण नरकाचा राज्याभिषेक केला आणि धर्ममार्गाने प्रजापालन करण्याचा, ऋषीमुनींचा आदर करण्याचा व नीलाचल पर्वतावरील कुलदेवता माता कामाख्येची अनन्यभावे भक्ती करण्याचा उपदेश दिला. तसेच, भूदेवीच्या विनंतीवरून विष्णूंनी त्याला एक विशेष वरदान दिले की, “त्याचा मृत्यू केवळ त्याच्या जन्मदात्या मातेच्या, मातेसमान स्त्रीच्या हातून किंवा तिच्या संमतीनेच होईल.” सुरुवातीच्या काळात नरक अतिशय प्रजाहितदक्ष राजा आणि देवीचा परमभक्त होता.
कुसंगतीचे परिणाम
‘असुषु प्राणेषु रमते इति असुरः’ म्हणजेच जो केवळ स्वतःच्या इंद्रियसुखात आणि अहंकारात रमतो तो ‘असुर’ होय. साक्षात विष्णूच्या अवताराचा आणि भूदेवीचा पुत्र असूनही केवळ चुकीच्या संगतीमुळे त्याचे नैतिक अधःपतन झाले. प्राग्ज्योतिषपूरच्या सीमेला लागून असलेल्या शोणितपूरचा (आधुनिक तेजपूर) राजा बाणासुर याच्याशी नरकाची मैत्री झाली. बाणासुर हा बळीराजाचा पुत्र आणि कट्टर शिवभक्त असला तरी तो अत्यंत अहंकारी आणि आक्रमक वृत्तीचा होता. बाणासुराने नरकाच्या मनात ही विषवल्ली पेरली की, त्रैलोक्यावर सार्वभौम सत्ता गाजवण्यासाठी वैदिक मर्यादा किंवा भक्तीची नव्हे, तर स्वेच्छाचारी आणि पाशवी बळाची गरज असते.
या कुसंगतीमुळे नरकाचा विवेक पूर्णपणे भ्रष्ट झाला आणि तो खऱ्या अर्थाने ‘नरकासुर’ ठरला. त्याने राजधर्माचा त्याग करून महर्षी वशिष्ठांना कामाख्या देवीच्या मंदिरात जाण्यापासून रोखले. संतप्त झालेल्या महर्षी वशिष्ठांनी त्याला शाप दिला की, “ज्या जन्मदात्या पित्याच्या जोरावर तू उन्मत्त झाला आहेस, तोच मानवी रूपात अवतीर्ण होऊन तुझा संहार करेल.”
कामाख्या देवीचा अवमान
बाणासुराच्या संगतीने सत्तांध झालेल्या नरकासुराची राक्षसी वृत्ती इतकी वाढली की, जगातील प्रत्येक श्रेष्ठ वस्तू आपल्याच उपभोगासाठी आहे, अशी राक्षसी भावना त्याच्यात निर्माण झाली. तो साक्षात जगन्माता कामाख्या देवीच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि त्याने तिला विवाहाचा प्रस्ताव दिला. देवीने त्याचा अहंकार चूर करण्यासाठी एक अट घातली—”जर तू एकाच रात्रीत, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी, नीलाचल पर्वताच्या पायथ्यापासून थेट मंदिरापर्यंत दगडी पायऱ्या, चार प्रवेशद्वारे आणि विश्रामगृह बांधून पूर्ण केलेस, तरच मी तुझ्याशी विवाह करीन.” नरकासुराने रातोरात हे काम जवळपास पूर्णत्वास नेले. तेव्हा देवीने योगमायेने एका कोंबड्याला पहाटेपूर्वीच आरवण्यास प्रवृत्त केले. अटीत आपण हरलो असे समजून संतापलेल्या नरकासुराने त्या कोंबड्याचा पाठलाग करून त्याचा शिरच्छेद केला. या कथेच्या खुणा आजही आसाममध्ये जिवंत आहेत. तो अपूर्ण दगडी जिना ‘मेखेलाउजा पथ’ आणि ज्या ठिकाणी कोंबड्याला मारले ते ठिकाण ‘कुकुराकाता’ या नावाने आजही ओळखले जाते.
अखेर नरकासुराचा वध
नरकासुराने देवमाता अदितीची तेजस्वी कुंडले हिरावली, स्वर्गाधिपती इंद्राचे ऐरावत आणि राजछत्र पळवले. एवढेच नव्हे तर, दिग्विजय मोहिमांदरम्यान विविध राजांच्या १६,१०० कन्यांचे अपहरण करून त्यांना प्राग्ज्योतिषपूरच्या अंतःपुरात बंदी बनवून ठेवले. या अत्याचारांचा पाढा जेव्हा इंद्राने द्वारकेत जाऊन भगवान श्रीकृष्णाकडे वाचला, तेव्हा द्वापार युगात भूदेवीचा अंशावतार असलेल्या आपल्या पट्टराणी सत्यभामेला सोबत घेऊन श्रीकृष्णाने गरुडावरून प्राग्ज्योतिषपूरवर स्वारी केली. त्यानंतर झालेल्या घनघोर युद्धात नरकासुराच्या अस्त्रप्रहाराने श्रीकृष्ण काही काळ रणांगणावर मूर्च्छित पडल्याची लीला करतात. ते पाहून रणचंडिकेचे रूप धारण केलेल्या सत्यभामेने धनुष्य उचलून नरकासुरावर अचूक शरसंधान केले. हा ऐतिहासिक दिवस होता आश्विन वद्य चतुर्दशीचा!
दीपोत्सव वधाचा नव्हे आनंदाचा!
मृत्यूच्या अंतिम क्षणी नरकासुराच्या मनातील अज्ञानाचा आणि अहंकाराचा पडदा गळून पडला. त्याने स्वतःच्या मातेच्या आणि पित्याच्या रूपात समोर उभ्या असलेल्या सत्यभामा-श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली—”माझ्या मृत्यूचा हा दिवस जगाने वधदिवस म्हणून न पाळता प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा करावा. या दिवशी जो कोणी पहाटे मंगल स्नान करून दीप प्रज्वलित करेल, त्याच्या जीवनातील दारिद्र्य, अज्ञान आणि नरकाची भीती समूळ नष्ट व्हावी.” श्रीकृष्णाने ‘तथास्तु’ म्हटले आणि हा दिवस ‘नरक चतुर्दशी’ म्हणून दीपोत्सवाचा मंगल आरंभबिंदू ठरला. बाह्य शत्रूपेक्षा अंतर्मनातील आसुरी वृत्तींचा नाश करून ज्ञानाचा दिवा लावणे, हाच नरक चतुर्दशी साजरा करण्यामागचा मूळ उद्देश आहे.