चांगला नफा मिळवण्याच्या ४ सोप्या टिप्स
आपण नोकरी, व्यवसाय करत असताना महिन्याकाठी काही रक्कम आपल्या खात्यात जमा होत असते. मग आपण आपल्या गरजा लक्षात घेऊन या आलेल्या रकमेचे नियोजन करतो. मात्र बँकेत जास्त बॅलन्स उरला की आपण ते पैसे कुठे खर्च करता येतील असा विचार करतो आणि मग खरेदी, सहली, हॉटेलिंग यामध्ये हे पैसे संपून जातात. महिना अखेरीस आपल्या हातात काहीच नाही अशीही वेळ अनेकदा येते. इतकेच नाही तर घरात एखादे आजारपण आले, काही अडचणीची परिस्थिती उद्भवली तर आपल्याला पैशांची जमवाजमव करावी लागते. इतकेच नाही तर घर, गाडी, शिक्षण यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात व्याज देऊन बँकेकडून कर्ज घ्यावे लागते.
हल्ली अगदी मोबाइल, लॅपटॉप, फ्रिज यांसारख्या लहान लहान गोष्टींवरही कर्ज मिळते मात्र त्यासाठी आपल्याला बँकेला खूप जास्त प्रमाणात व्याज द्यावे लागते. त्यामुळे अगदीच गरज असेल तरच कर्ज घ्यायला लागावे किंवा अडचणीच्या वेळी आपल्याकडे पुरेशी रक्कम असावी यासाठी पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. यालाच आता फायनान्शिअल प्लॅनिंग असे म्हणतात. सध्या बहुतांश कुटुंबात दोघेही कमवत असल्याने उत्पन्न हे लाखाच्या घरातच असते. आपले रोजचे खर्च, सर्व प्रकारची बिले, मुलांचे शाळेचे व इतर शुल्क भरुन काही रक्कम आपण अवश्य गुंतवायला हवी. ही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली तर भविष्यात ती वाढूनच आपल्याला मिळते. त्यामुळे गुंतवणूक करताना नेमकी उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम गुंतवणूक करावी. गुंतवणुकीचे कोणते पर्याय जास्त नफा देणारे असतात हे आपल्याला माहित असायला हवे. गुंतवणूक म्हटली की सामान्यपणे घर, सोनं, फिक्स डिपॉझिट असे पारंपरिक पर्याय आपल्याला माहित असतात. पण त्याशिवायही बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीचे असेच काही सोपे पर्याय आज आपण समजून घेणार आहोत.
१. म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) – एसआयपी म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम ठराविक फंडमध्ये जमा करणे. यामध्ये दरमहा कमीत कमी ५०० रुपयांपासून रक्कम जमा करता येते. यातून मिळणारा नफा हा साधारणपणे १० ते १२ टक्के इतका जास्त असतो. म्युच्युअल फंड हा अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून, ते व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे शेअर, बाँड किंवा इतर सरकारी योजनांमध्ये गुंतवले जातात. यातून मिळणारा नफा किंवा तोटा सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटला जातो. यात इक्विटी, डेट, हायब्रिड फंड असे वेगवेगळे प्रकार असतात.
२. शेअर मार्केट गुंतवणूक – शेअर मार्केटकडे बरेचदा चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते. पण योग्य पद्धतीने अभ्यास करुन किंवा मार्गदर्शन घेऊन आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली तर ती नक्कीच फायदेशीर ठरु शकते. मात्र यासाठी शेअर मार्केटचा काही प्रमाणात अभ्यास करणे आवश्यक असते. हे शिकण्यासाठी सध्या बऱ्याच प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच फायनान्शिअल प्लॅनरही आपल्याला त्यासाठी मदत करु शकतात. पण आपल्याला ते कळत नाही किंवा त्यामध्ये पैसे बुडतातच असा ग्रह ठेवून बरेच जण त्यापासून लांब राहतात. तसे न करता योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूक फायदेशीरही ठरु शकते.
३. पोस्ट ऑफीस योजना – पोस्ट ऑफीसच्या म्हणजेच शासनाच्या सतत नवनवीन योजना येत असतात. आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती असतेच असे नाही. मात्र दिर्घकालिन असलेल्या बऱ्याच योजना भरपूर लाभ मिळवून देणाऱ्या असतात. यामध्ये लहान मुलांसाठी सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, आरडी, नॅशनल सेव्हींग सर्टीफिकेट, किसान विकास ज्येष्ठ नागरीकांसाठी असणारी पेन्शन योजना अशा बऱ्याच योजना फायदेशीर असतात. त्यावर मिळणारे व्याजही साधारणपणे खाजगी बँकेपेक्षा थोडे जास्तच असते. त्यामुळे ऑनलाईन किंवा जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन याची योग्य ती माहिती घेऊन याठिकाणी योग्य पद्धतीने पैसे गुंतवता येतात.
४. गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ – पारंपरिक पद्धतीने सोने, चांदी खरेदी करणे हे आपल्याकडे अतिशय सामान्य आहे. लग्न, वाढदिवस किंवा अन्य काही कारणाने सोने, चांदी खरेदी केली जाते. सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी, वस्तू, देवपुजेचे साहित्य असे आपण खरेदी करतो. काहीच नाही तर गुंतवणूक म्हणून वळं किंवा विटा खरेदी करतो. पण अशाप्रकारे स्थायी स्वरुपात सोने-चांदी खरेदी करण्यापेक्षा ईटीएफ हा सोने चांदी गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय असू शकतो. हे डिजिटल सोने किंवा इलेक्र्टॉनिक सोन्याच्या स्वरुपात असते. शेअर बाजार ज्याप्रमाणे वर खाली होतो त्याप्रमाणे याच्या किमती बदलतात. सोन्याचा भाव वाढला तर आपण हे लगेचच विकू शकतो आणि कमी झाला तर खरेदी करु शकतो. या खरेदी विक्रीसाठी डिमॅट आणि ट्रेडींग अकाऊंट असणे आवश्यक असते.
– सायली जोशी – पटवर्धन