Thursday, August 6, 2026

SIR ला  १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ,  मतदार नोंदणीची सोपी पद्धत 

Share

महाराष्ट्रात व मुंबईत मतदार याद्या मधील दुबार नावे काढण्यासाठी व मतदारांच्या नोंदणी संदर्भामधले  विविध प्रश्न सोडवून मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी, निवडणूक आयोगातर्फे राबविल्या जाणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे एसआयआर प्रक्रियेला  (Special Intensive Revision – SIR) प्रशासकीय व भौगोलिक कारणांमुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) मार्फत घराघरांत जाऊन केली जाणारी पडताळणी आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार आहे. या मुदतवाढीमुळे लाखो नवीन मतदारांना तसेच ज्या नागरिकांची नावे अद्याप नोंदवली गेलेली नाहीत किंवा तपशिलात त्रुटी आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Voter Service Portal वर ऑनलाईन अर्ज कसा करावा?  

मतदान प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाकडे वैध मतदार ओळखपत्र (Voter ID Card) असणे अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकारच्या Voters’ Service Portal (voters.eci.gov.in) द्वारे नव्याने मतदार नोंदणी करणे, नावात अथवा पत्यात दुरुस्ती करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे सोपे व पारदर्शक झाले आहे.

घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता – (ऑनलाईन अर्ज)

१. पोर्टलवर खाते तयार करणे / लॉग इन : डिजिटल सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिली आणि आवश्यक पायरी म्हणजे पोर्टलवर प्रवेश करणे.

  • निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला (voters.eci.gov.in) भेट द्या.
  • ‘Sign Up’ या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • आधीच खाते असल्यास ‘Log In’ वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि आलेला OTP टाकून प्रवेश करा.

२. योग्य अर्ज नमुना निवडणे: लॉग इन झाल्यानंतर मुख्य पृष्ठावर (Dashboard) विविध प्रकारचे नमुने उपलब्ध दिसतील. तुमच्या गरजेनुसार योग्य नमुना निवडा:

  • Form 6: नवीन मतदार नोंदणीसाठी (वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले) आणि यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी.(New Registration for General Electors).
  • Form 7: नाव वगळण्यासाठी किंवा हरकतीसाठी (Objection / Deletion). दुबार नाव वगळण्यासाठी किंवा मृत/स्थलांतरित मतदाराच्या नावावर हरकत घेण्यासाठी.
  • Form 8: नाव, पत्ता, फोटो दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी (Correction of Entries / Shifting of Residence).

३. वैयक्तिक माहिती व राज्य/जिल्हा निवडणे: या टप्प्यावर कागदपत्रानुसार अचूक माहिती भरणे गरजेचे आहे:

  • तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) काळजीपूर्वक निवडा.
  • तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख आणि लिंग अचूक भरा (इंग्रजीत टाईप केल्यावर मराठीतील स्पेलिंग ऑटोमॅटिक जनरेट होते, ते योग्य आहे का याची शहानिशा करून घ्या).
  • नातेवाईकाचे नाव (वडील, पती किंवा आई) आणि त्यांचा प्रकार निवडा.

४. संपर्क व ओळख पुरावे अपलोड करणे: अर्जाच्या सुरक्षिततेसाठी आणि पडताळणीसाठी स्पष्ट व वैध दस्तऐवज अपलोड करावे लागतात:

  • मोबाईल नंबर व पडताळणी: मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला OTP व्हेरीफाय करा.
  • फोटो अपलोड: पासपोर्ट साईज रंगीत फोटो (मानक आकारात) अपलोड करा.
  • ओळख व पत्त्याचा पुरावा: वयाचा पुरावा (उदा. जन्म दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट) आणि सध्याच्या पत्त्याचा पुरावा (उदा. विजेचे बिल, बँक पासबुक, भाडेकरार) अपलोड करा.

५. अर्ज सबमिट करणे व संदर्भ क्रमांक (Reference ID) जतन करणे: अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे:

  • सर्व भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून ‘Preview’ वर क्लिक करा.
  • सर्व तपशील योग्य व अचूक असल्यास ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट होताच स्क्रीनवर एक Reference ID (संदर्भ क्रमांक) जनरेट होईल. तो तात्काळ लिहून ठेवा किंवा सेव्ह करा.

घुसखोरी रोखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा 

आयोगाच्या या व्यापक मोहिमेमुळे राज्यातील हजारो बोगस, दुबार आणि मृत मतदारांची नावे हटवली जाणार आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, जिल्हा परिषद) आणि इतर निवडणुकांमध्ये पारदर्शकता वाढेल. ठाणे (४८.६९%), मुंबई उपनगर (५५.४९%) आणि मुंबई शहर (५६.२६%) या प्रमुख शहरी भागांत ५०% च्या आसपास झालेली पडताळणी ही प्रशासनापुढील मोठी चिंता आहे. जर मोठ्या प्रमाणावर नागरिक ASDD यादीत गेले, तर मतदानाच्या दिवशी त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

SIR द्वारे होणारी घरोघरी पडताळणी (H2H Verification) आणि कागदपत्रांची तपासणी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि लोकसंख्येचं योग्य संतुलन राखण्यासाठी मदत होते. मुंबई, ठाणे, पुणे आणि संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येचे स्वरूप वेगाने बदलत आहे. कायदेशीर भारताचे नागरिक असणाऱ्याची नाव यादीत खात्री पूर्वक राहणं आणि अवैध मार्गांनी किंवा घुसखोरी करून भारतात आलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही, याची खात्री करणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. राजकीय फायद्यासाठी आणि व्होट बँक तयार करण्यासाठी काही अराजकता पसरवणाऱ्या संस्था  बेकायदेशीर स्थलांतरितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करतात. SIR मोहिमेत केली जाणारी सखोल कागदपत्र पडताळणी ही अशा अवैध नोंदी रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. अनेक मतदारसंघांत एकाच व्यक्तीची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी (उदा. मूळ गावी आणि नोकरीच्या ठिकाणी शहरात) नोंदवलेली असतात. SIR मोहिमेमुळे अशा दुबार नोंदी शोधून त्या हटवणे शक्य होते. मतदार यादीत वर्षानुवर्षे मृत व्यक्तींची किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे राहिल्यामुळे मतदानाच्या दिवशी बोगस मतदानाचा मोठा धोका असतो. SIR द्वारे होणाऱ्या घरोघरी पडताळणीमुळे या त्रुटी दूर होतात, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते. 

SIR २०२६ चे सुधारीत वेळापत्रक 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मोहिमेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.

टप्पापूर्वघोषित तारीखसुधारित अंतिम तारीख / कालावधीमुख्य कामकाज
१. घरोघरी पडताळणी (H2H Verification)२९ जुलै / ८ ऑगस्ट २०२६१७ ऑगस्ट २०२६BLO द्वारे गणना अर्जांचे वाटप, संकलन आणि डिजिटायझेशन.
२. मतदान केंद्र पुनर्गठन८ ऑगस्ट २०२६१७ ऑगस्ट २०२६मतदान केंद्रांची फेररचना, पुनर्गठन आणि सुसूत्रीकरण.
३. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी (Draft Roll)५ / १७ ऑगस्ट २०२६२४ ऑगस्ट २०२६प्राथमिक अद्ययावत मतदार यादी जाहीर करणे.
४. दावे व हरकती नोंदवणे१७ ऑगस्ट – १६ सप्टें.२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६नमुना ६, ७ आणि ८ द्वारे अर्ज स्वीकारणे.
५. सुनावणी व दावे निकाली काढणे१५ ऑक्टोबर २०२६२२ ऑक्टोबर २०२६ पर्यंतनोटिसा बजावणे, सुनावणी घेणे आणि निर्णय देणे.
६. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी (Final Roll)१९ ऑक्टोबर २०२६२७ ऑक्टोबर २०२६सर्व दुरुस्त्यांसह अंतिम शुद्ध मतदार यादी जाहीर करणे.

प्रादेशिक स्थिती

ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी ७४.०४% मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या तुलनेत प्रमुख शहरी आणि महानगरीय भागांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसून येत आहे.

विभाग / जिल्हापडताळणी पूर्ण टक्केवारीमुख्य वैशिष्ट्ये व आव्हाने
राज्य सरासरी (महाराष्ट्र)७४.०४%ग्रामीण भागातील वेगाने झालेली नोंदणी, स्थानिक प्रशासनाचा पाठपुरावा.
मुंबई शहर५६.२६%हाय-राईज इमारतींमध्ये प्रवेशाच्या अडचणी, बंद घरे, स्थलांतरित लोकसंख्या.
मुंबई उपनगर५५.४९%प्रचंड लोकसंख्या घनता, भाडेकरूंचे वारंवार होणारे स्थलांतर.
ठाणे जिल्हा४८.६९%राज्यातील सर्वात कमी प्रमाण; शहरीकरण, नोकरदार वर्गाची अनुपलब्धता.
पुणे महानगर क्षेत्र५०% – ७०%आयटी पार्क परिसर आणि शैक्षणिक हबमध्ये फॉर्म वाटपातील मंदगती.

SIR मोहिमेची १७ ऑगस्ट २०२६ ही वाढीव मुदत लोकशाही प्रक्रिये साठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ अधिकाऱ्याला योग्य माहिती द्यावी किंवा ओनलाईन अर्ज वेळेत भरून द्यावा. २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या नमुना मतदार यादीत आपले नाव व मतदान केंद्र योग्य आहे की नाही, याची पडताळणी ऑनलाइन पोर्टल (voters.eci.gov.in) किंवा BLO मार्फत करावी. कोणत्याही उर्वरित माहिती भरण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान तात्काळ नमुना ६, ७ किंवा ८ भरावा. ठाणे , मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या प्रमुख शहरी भागांत ५०% च्या आसपास झालेली पडताळणी ही प्रशासनापुढील मोठी चिंता आहे. जर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची नावे वगळली किंवा चिन्हांकित म्हणजेच  ASDD यादीत गेली, तर मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करू दिले जाणार नाही याचा मोठा धोका पुढील काळात उद्भवू शकतो.

अन्य लेख

संबंधित लेख