Thursday, August 27, 2026

IICT आणि Netflix कडून १०० विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा

Share

भारतीय स्टोरीटेलर्सच्या नव्या पिढीला प्रोत्साहन; IICT आणि Netflix कडून १०० विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतातील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) आणि Netflix यांनी १०० विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ८० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेत एक वर्ष कालावधीच्या दोन डिप्लोमा अभ्यासक्रमांसह सहा महिन्यांच्या चार प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. Interactive Comics and Sequential Arts आणि Visual Effects Mastery हे दोन डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत. तर Virtual Art Department Content Creation, Media Tech Workflow, Art of Character Animation तसेच E-Sports and Gaming Management या चार प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांनाही संधी

ही शिष्यवृत्ती योजना देशभरातील विद्यार्थी तसेच कार्यरत व्यावसायिकांसाठी उपलब्ध असणार आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टमध्ये Netflix चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर या उपक्रमाला चालना मिळाली. भारताची समृद्ध कथाकथन परंपरा आणि मोठी सर्जनशील प्रतिभा यांचा उपयोग करून भारताला जागतिक स्तरावरील कंटेंट निर्मितीचे केंद्र बनविण्याची क्षमता असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले होते.

सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा

यानंतर Netflix India Storytelling Initiative सुरू करण्यात आली. भारतातील सर्जनशील प्रतिभेला उद्योगाभिमुख कौशल्ये देऊन भविष्यातील स्टोरीटेलर्सची सक्षम फळी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि IICT मंडळाचे अध्यक्ष चंचल कुमार यांनी भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे सांगितले. IICTची संकल्पना भारतातील मोठ्या सर्जनशील प्रतिभेला जागतिक AVGC-XR उद्योगाच्या बदलत्या गरजांशी जोडणारा पूल म्हणून करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगक्षेत्रातील ज्ञान वर्गखोल्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या अशा सहकार्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगानुभव आणि आधुनिक कौशल्ये मिळतील. यामुळे भारतातील युवा प्रतिभेला जागतिक सर्जनशील उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे.

सर्जनशीलतेला कौशल्याची जोड देत भारतातील नव्या पिढीतील कथाकथनकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख