Wednesday, September 2, 2026

मनसेला कृष्णराज महाडिकांचा इशारा

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विरोध केल्याने भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचता आले नाही. या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसेला पुन्हा इशारा दिला आहे.

मुंबईतील आंदोलनादरम्यान माहीम परिसरात झालेल्या राड्याबाबत बोलताना महाडिक यांनी सांगितले की, संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले आहे. भाजयुमोचे कार्यकर्ते माहीम चौकात शिस्तबद्ध पद्धतीने जमले होते. त्यावेळी मनसेचे काही कार्यकर्ते मागील बाजूने येऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचा दावा त्यांनी केला.

‘यापुढे भाजयुमोच्या कोणत्याही कार्यक्रमात अशा पद्धतीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही महाडिक यांनी दिला.

दरम्यान, मुंबईतील आंदोलनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ट्रोलिंगकडे आपण फारसे लक्ष देत नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान पदाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ आपण आवाज उठवला होता, असे त्यांनी सांगितले. तसेच अमित ठाकरे यांनी केवळ पंतप्रधानपदाचाच नव्हे तर देशाच्या संविधानाचाही अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यात घडलेला प्रकार दुर्दैवी आणि विनोदी होता. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना मूलभूत प्रोटोकॉलची माहिती असणे आवश्यक आहे. अशा घटनांमधून युवा पिढीमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही महाडिक म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना महाडिक यांनी आपण रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केले.

एखाद्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकहितासाठी समर्पित केले असेल आणि त्यांचा अपमान झाला, तर तरुणांच्या मनात साहजिकच संताप निर्माण होऊ शकतो. याच भावनेतून भाजयुमोचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, असा दावा त्यांनी केला.

युवा मोर्चा ही तरुणांना आपली भूमिका व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देणारी संघटना आहे. मात्र, यापुढे संघटनेचे काम अधिक चांगल्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले जाईल, असेही कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.

मुंबईतील या घटनेमुळे भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून, दोन्ही पक्षांच्या युवा संघटनांमधील हा वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख