प्रस्तावना
भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महान बलिदानांचे अवमूल्यन करणे ही आधुनिक पुरोगामी आणि स्वयंघोषित बुद्धिजीवी वर्गाची जुनी खोड राहिली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने २०१८ च्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’ दृश्यावर घेतलेला आक्षेप याच ‘दिमागी नक्षल’ चे मूर्तिमंत उदाहरण आहे.
स्वरा भास्करने एका कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रश्न उपस्थित केला होता की, “या दृश्यामुळे बलात्कार पीडितांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. किंवा आपण पीडितांना हे सांगू इच्छितो का की, त्या जगण्यास पात्र नाहीत? किंवा स्वतःचा जीव देणे हीच एक सन्माननीय कृती आहे? बलात्कार म्हणजे महिलेच्या आयुष्याचा अंत आहे असा संदेश आपण देणार आहोत का?”
वरवर पाहता हे महिलांच्या हक्कांसाठी बोललेले विधान वाटत आहे, तरी मुळात मध्ययुगीन बर्बर आक्रमकांचे हिंस्र स्वरूप, भारतीय संस्कृतीतील ‘पावित्र्य’ व ‘स्वाभिमान’ या संकल्पना आणि जोहाराचे सामूहिक सामरिक महत्त्व यांविषयीचे अक्षम्य अज्ञान दर्शवते.
अलाउद्दीन खिल्जी हा बलात्कारी गुन्हेगार होता का?
स्वरा भास्करच्या या विधानातील सर्वांत मोठी गफलत म्हणजे तिने १३०३ मधील सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाला आधुनिक काळातील एखाद्या बलात्कार किंवा लैंगिक गुन्ह्याच्या पातळीवर आणून ठेवले. अलाउद्दीन खिल्जी हा आधुनिक लोकशाही समाजातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि संविधानाच्या चौकटीत शिक्षा होऊ शकणारा एकाकी गुन्हेगार नव्हता; तो मध्ययुगीन भारतावर आक्रमण करणाऱ्या अशा एका क्रूर, धर्मांध आणि साम्राज्यवादी व्यवस्थेचे नेतृत्व करत होता, ज्या व्यवस्थेचा मुख्य उद्देशच काफिर मानल्या गेलेल्या प्रजेचे अस्तित्व नष्ट करणे, मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि पराभूत जनतेला संपूर्णपणे गुलाम बनवणे हा होता.
चित्तोडचा किल्ला जिंकल्यानंतर सुलतान खिल्जीने एकाच दिवसात सुमारे ३०,००० निरपराध हिंदू नागरिकांची, शेतकऱ्यांची आणि कारागिरांची गावतृणासारखी क्रूर कत्तल केली, अशी अधिकृत नोंद त्याचाच दरबारी इतिहासकार अमीर खुसरो याने ‘शान से’ करून ठेवली आहे. ज्या आक्रमकाने हजारो अबालवृद्धांच्या रक्ताचे पाट वाहवले, त्याच्या हाती जर चित्तोडच्या स्त्रिया जिवंत सापडल्या असत्या, तर त्यांच्या वाट्याला निव्वळ एका प्रसंगापुरती लैंगिक हिंसा आली नसती; तर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले असते, त्यांना बाजारात विकले गेले असते, त्यांचे सक्तीने धर्मांतर करून त्यांना आयुष्यभरासाठी शाही हरममध्ये लैंगिक दास्यात ढकलले गेले असते. देवगिरीच्या यादवांचा पाडाव केल्यानंतर यादव राजकन्येला अंतःपुरात नेऊन दासी बनवण्याचा खिल्जीचा इतिहास मेवाडच्या समोर जिवंत होता. त्यामुळे, जोहाराची तुलना आजच्या शांतताकालीन समाजातील बलात्कार पीडितांच्या संघर्षाशी करणे म्हणजे मध्ययुगीन आक्रमकांच्या योजनाबद्ध नरसंहारावर पांघरूण घालण्यासारखे आहे.
मृत्यूनंतरही देहाचे पावित्र्य धोक्यात
मुळात, राणी पद्मिनी आणि चित्तोडच्या हजारो वीरांगनांनी जोहार का केला? यामागे केवळ पराभवाचे भय नव्हते, तर परकीय आक्रमकांच्या सैतानी आणि अमानुष मानसिकतेची त्यांना असलेली पूर्ण कल्पना होती.
मध्ययुगीन आक्रमकांच्या क्रौर्याची सीमा केवळ जिवंत माणसांपुरती मर्यादित नव्हती; पराभूत शत्रूच्या स्त्रियांच्या मृतदेहांची विटंबना करणे, शवांशी अमानुष चाळे करणे (नेक्रोफिलिया), शरीराचे अवयव कापून ते विकृत प्रदर्शनासाठी टांगणे हे त्या बर्बर युद्धाचाराचे भयावह वास्तव होते. मेवाडच्या वीरांगनांना ही स्पष्ट जाणीव होती की जर त्यांनी युद्धात शस्त्र हाती घेऊन वीरमरण पत्करले किंवा विष प्राशन केले, तरीही हिंस्र आक्रमक त्यांच्या निष्प्राण शरीराला देखील सोडणार नाही; त्यांच्या मृतदेहाचाही घोर अपमान आणि विटंबना केली जाईल.
म्हणूनच, “मेल्यानंतरही या नराधमांचा एकही अपवित्र हात किंवा त्यांची वासनांध दृष्टी आमच्या शरीराला शिवता कामा नये” हा अढळ निश्चय करून त्यांनी अग्नीची निवड केली. अलाउद्दीन खिल्जी जेव्हा अहंकाराने किल्ल्यात शिरला, तेव्हा त्याला तिथे भोगायला शरीर मिळाले नाही, तर विजयाच्या नावाखाली केवळ राख आणि धूळ मिळाली. राणी पद्मिनीच्या या बलिदानाने खिलजी युद्ध जिंकून सुद्धा पराभूत झाला. देहाच्या विनाशापेक्षा आत्म्याचे आणि चारित्र्याचे पावित्र्य श्रेष्ठ मानणाऱ्या या सर्वोच्च आध्यात्मिक निर्धाराला ‘आत्महत्या’ समजणे ही एक मोठी दुःखद घटना आहे.
विकृत तुलना
स्वरा भास्करने केलेली तुलना दिशाभूल करणारी आहे. आजच्या संविधानिक भारतात बलात्कार पीडितेने जगले व लढलेच पाहिजे; कायदा तिच्या पाठीशी आहे. मात्र, १३०३ मधील प्रसंग आधुनिक गुन्ह्याचा नसून परकीय, रानटी आक्रमणाविरुद्धच्या अस्तित्वाचा लढा होता. तेथे मानवाधिकार किंवा न्यायालये अस्तित्वात नव्हती. अशा भीषण युद्धकाळात देह अग्नीला अर्पण करून शत्रूचा वासनांध हेतू उधळून लावणे ही दुर्बलता नसून सर्वोच्च पराक्रम होता. पाश्चात्त्य नारीवादाच्या उथळ चष्म्यातून न पाहता, राणी पद्मिनीचा जोहार हा केवळ तथ्यात्मक वाचला तरी संस्कृती, धर्म आणि आत्मसन्मानाच्या रक्षणाचा तेजस्वी अध्याय समजायला मदत होईल. यातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे याच विचारसरणीचे काही विद्वान ‘राणी पद्मिनीचा इतिहास मुळी घडलाच नव्हता!’ असेही म्हणायला कमी करीत नाहीत.
निष्कर्ष
स्वरा भास्करने केलेले विधान हे ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास करणारे, हिंदू स्त्रियांच्या पराक्रमाची उपेक्षा करणारे आणि राष्ट्रीय वीरांगनेच्या दिव्य बलिदानाला हीन लेखणारे आहे. ‘चोरी वर शिरजोरी’म्हणून आपले विधान अयोग्य पद्धतीने मोडून तोडून मांडल्याचा इतरांवर आरोप सुद्धा तिने केला आहे. राणी पद्मिनीच्या त्या धगधगत्या अग्निकुंडाने आक्रमकांच्या क्रौर्याला जळून खाक केले होते. त्या सर्वोच्च त्यागाला विकृत आधुनिकतेच्या तराजूत तोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. भारतीय जनमानसात राणी पद्मिनी ही अगतिक पीडिता म्हणून नव्हे, तर बर्बरतेला धुळीस मिळवून स्वतःच्या अढळ शीलाचे रक्षण करणारी स्वाभिमानी राष्ट्रमाता म्हणून युगानुयुगे पूजनीय राहील.