– सत्यजित जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लंडनमध्ये दिलेले भाषण हे केवळ भारतीय वंशाच्या लोकांसाठी (डायस्पोरा) दिलेले आणखी एक औपचारिक भाषण म्हणून त्याकडे पाहून चालणार नाही. त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. संस्कृती, भारताची ओळख, राष्ट्रवाद आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या जबाबदाऱ्या या साऱ्यांचा विचार करणारे ते उत्कृष्ट विवेचन आहे. या भाषणाच्या केंद्रस्थानी सोपे पण मूलभूत सूत्र होते—विविधता ही नैसर्गिक आहे आणि एकता हेच अंतिम सत्य आहे.
डॉ. भागवत यांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाचे बौद्धिक महत्त्व इथे अधोरेखित होते. त्यांनी हिंदू संस्कृतीची मांडणी ही कोणत्याही प्रकारच्या ‘एकविधते’ची (Uniformity) किंवा एकाच साच्यात जगण्याच्या आग्रहाची मागणी म्हणून केली नाही; तर मूळ एकतेमध्ये रुजलेला विविधतेचा सहज स्वीकार म्हणून केली. हिंदू विचारसरणी ही एकाच पद्धतीची पूजा-अर्चा किंवा एकच धार्मिक चौकट, असा अट्टहास धरत नाही. हिंदू सांस्कृतिक परंपरेने ईश्वराला न मानणाऱ्या निरीश्वरवादाचा जितक्या सहज स्वीकार केला, तितक्याच सहजतेने विविध तत्त्वज्ञानांना, वेगवेगळ्या उपासना पद्धतींना आणि विविध सामाजिक परंपरांना सामावून घेतले. ही दुर्बलता नसून सांस्कृतिक आत्मविश्वासाचा पुरावा आहे.
यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी नेहेमीच चर्चेत असणाऱ्या ‘हिंदू राष्ट्रा’बाबत केलेले स्पष्टीकरणही लक्षणीय होते. त्यांनी हिंदू राष्ट्र ही संकल्पना कोणत्याही धर्मसत्तेच्या (Theocratic state) संकुचित व्याख्येतून बाहेर ठेवली. जगात विविधता ही नैसर्गिक आहे आणि एकता ही मूलभूत आहे, हाच संदेश जगाला देणे हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश त्यांनी स्पष्ट केला. हा फरक समजून घेणे मोलाचे आहे; कारण संघावर होणारी बहुतांश टीका ही ‘हिंदूराष्ट्र म्हणजे एकाच धर्माचे वर्चस्व’ या गृहितकावरून सुरू होते. डॉ. भागवत यांनी लंडनमध्ये मांडलेली भूमिका पाहायला हवी. त्यांच्या प्रतिपादनानुसार भारतीय संस्कृती म्हणजे एकविधतेविना साधलेली एकता, कोणालाही न नाकारता जपलेली आपली ओळख आणि सक्तीविना अनुभवलेली संस्कृती.
या दौऱ्यात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय व हिंदू समुदायासाठी आणखी एक संदेश दडलेला होता. डॉ. भागवत यांनी निःसंदिग्ध शब्दांत सांगितले, ‘माणसाची कर्मभूमीवरच निष्ठा असायला हवी. म्हणजे उद्या जर ब्रिटन आणि भारत यांच्यात दुर्दैवाने काही संघर्ष निर्माण झालाच, तर ब्रिटनमधील हिंदूंनी पूर्ण निष्ठेने ब्रिटनच्या बाजूनेच उभे राहिले पाहिजे. जन्मभूमी माणसाला मूल्ये देते आणि त्या मूल्यांनुसार प्रत्येकाने आपल्या कर्मभूमीत कर्तव्ये पार पाडायला हवीत.
परदेशस्थांच्या राष्ट्रावादाचे प्रगल्भ आकलन आहे. भारतावरचे सांस्कृतिक प्रेम म्हणजे कर्मभूमीशी राजकीय प्रतारणा नाही. एखादी व्यक्ती राजकीय द्रोह न करताही सांस्कृतिक पाळेमुळे पूर्ण निष्ठेने जपू शकते. माणसाचा सांस्कृतिक आत्मविश्वास जितका, तितकीच त्याच्या मनात स्वतःच्या निष्ठेबद्दलची असुरक्षितता कमी असते.

त्यामुळे, अनिवासी भारतीयांसाठी डॉ. भागवत यांचा संदेश स्पष्ट आहे: प्रामाणिकपणे काम करा, कायद्याचे पालन करा, ब्रिटिश समाजाला योगदान द्या, नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये ताठ मानेने जपा. कर्मभूमीला केवळ आर्थिक कमाईचे साधन मानू नका. ब्रिटन ही तुमची कर्मभूमी असेल, तर तिची मनापासून आणि प्रामाणिक सेवा करा.
यामध्ये भारतासाठीही एक धडा दडला आहे. अनिवासी नागरिकांची ताकद केवळ त्यांच्या पैशावरून, व्यावसायिक यशावरून किंवा उच्च पदांवरून मोजली जाऊ नये. ती ताकद त्यांच्या मूल्यव्यवस्थेवरून जोखायला हवी. यात कुटुंबाप्रती जबाबदारी, विविधतेचा आदर, समाजसेवा, बौद्धिक मोकळेपणा आणि द्वेषरहित सांस्कृतिक आत्मविश्वास!
नवी पिढी आणि तरुणांबद्दल डॉ. भागवत यांनी गाढ विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आजच्या तरुणांमध्ये प्रचंड कुतूहल आहे आणि जग अधिक सुंदर बनवण्याची तीव्र इच्छा आहे. त्यांच्यावर नियम लादण्याऐवजी, त्यांना स्पष्ट उद्दिष्ट द्या आणि ते गाठण्याचे मार्ग त्यांनाच शोधू द्या.’ आजच्या ‘जेन-झी’ त्यानंतरच्या नव्या पिढीसाठी हा विचार स्तुत्य आहे.
ब्रिटनमधील तरुण भारतीयांना आधुनिकता आणि भारतीयत्व यांपैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. तंत्रज्ञान, जागतिक नागरिकत्व आणि भारतीय मूल्ये ही परस्परविरोधी नाहीत. तसेच, आपली परंपरा म्हणजे काही वस्तुसंग्रहालयातली निर्जीव वस्तू नाही. उलट त्या परंपरेतील तत्त्वज्ञान समजून घेऊन त्याची आधुनिक परिप्रेक्ष्यात मांडणी करणे आवश्यक आहे. इथेच नेमकी संघाची भूमिका महत्त्वाची ठरते.
कोणतीही संस्कृती गोठवलेल्या स्थितीत जिवंत राहू शकत नाही. मूलभूत मूल्ये नव्या पिढीपर्यंत गेली तरच ती जिवंत राहते. म्हणूनच, डॉ. भागवत यांचे ‘तरुणांना केवळ नियम लादण्यापेक्षा ध्येय द्या’ हे सूत्र दूरगामी परिणाम करणारे आहे. ते ध्येय मानवतेचे, सामाजिक सौहार्दाचे, सेवेचे, जबाबदारीचे आणि सार्वभौम बंधुत्वाचे असू शकते. अर्थात, काळ, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि सामाजिक परिस्थितीनुसार मार्ग नक्कीच बदलतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘सेवा’ या संकल्पनेचा आग्रह धरतो. त्याचेही स्पष्टीकरण यातून मिळते. डॉ. भागवत यांनी सेवा या संकल्पनेची वेगळी मांडणी केली. उपकार किंवा दान म्हणून नव्हे तर व्यक्तीला समाजाशी आणि एका विशाल उद्दिष्टाशी जोडण्याची एक अनमोल संधी म्हणजे सेवा, असे ते सांगत होते. आज टोकाच्या व्यक्तिवादी युगात ही सेवेची भावना सकारात्मक बदल घडवून आणणारी आहे.
जुन्या चौकटीत न अडकता मूल्ये मात्र पुढच्या पिढीकडे पोहोचवायची, हे संघापुढचे दुसऱ्या शतकाच्या वाटचालीतले एक आव्हान आहे. डॉ. भागवत यांनी त्याचे एक उत्तर दिले. ‘आपुलकी!’ विविधतेसह साधलेली एकता, उपकारभाव न ठेवता केलेली सेवा, नागरी निष्ठेला धक्का न लावता जपलेली सांस्कृतिक मुळे, आणि साचलेपण येऊ न देता पुढे नेलेली परंपरा! म्हणूनच, या भाषणाकडे हिंदुत्वाभोवती फिरणाऱ्या नेहमीच्या राजकीय चष्म्यातून पाहता येणार नाही.
याच्याहून खोलवरचा प्रश्न असा आहे की, आज ओळख, विचारधारा यांचा विसर आणि मालकी हक्कांचा संघर्ष यांनी ग्रासलेल्या जगाला देण्यासारखे भारताकडे काय आहे? डॉ. भागवत यांच्या मते भारताकडे ते आहे. आणि त्याचे उत्तर ‘एकविधता’ (Uniformity) हे नसून ‘एकात्मता’ (Oneness) हे आहे.
त्यामुळेच, लंडनहून आलेला हा संदेश अधिक सखोल आणि अर्थपूर्ण आहे. ब्रिटनमधील एक हिंदू नागरी निष्ठेबाबत पूर्णपणे ‘ब्रिटिश’ असू शकतो आणि सांस्कृतिक संचिताच्या स्पर्शाने ‘भारतीय’ राहू शकतो. कोणतीही तरुण व्यक्ती सांस्कृतिक मुळे न गमावता तंत्रज्ञानाने आधुनिक बनू शकतो. आणि एखादा समाज एकतेची भावना न गमावताही प्रचंड विविधता स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो.
म्हणूनच, डॉ. भागवत यांनी मांडलेला मध्यवर्ती विचार लक्षणीय आहे—भविष्यात ‘विविधता’ आणि ‘एकता’ यांपैकी एकाचीच निवड करण्याची गरज नाही; हिंदू सांस्कृतिक विचार हे सिद्ध करतो की आपण या दोन्ही गोष्टी एकाचवेळी जपू शकतो. आणि कदाचित सीमांपलीकडे हिंदुत्व घेऊन जाण्याचा खरा अर्थ हाच आहे. आपला सांस्कृतिक आत्मविश्वास बहुविधता, देशभक्ती आणि सार्वभौम मानवी बंधुत्वाशी यांच्या हातात हात घालून राहू शकतो. डॉ. मोहन भागवत यांना तेच जगाला सांगायचे होते आणि आहे!