पाकिस्तानात नुकतेच पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यातील सिराज गावातील १२५ वर्षे जुन्या हिंदू मंदिरावरून वाद निर्माण झाला. ते मंदिर पाडण्यात आले. दुसरीकडे पाकिस्तानच्या Evacuee Trust Property Board (ETPB) ने चार सप्टेंबरला मंदिराची पाहणी करून मंदिर मुद्दाम पाडल्याचे फेटाळले. मात्र, या एका घटनेपलीकडे पाकिस्तानातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्चेस पाडली गेली आहेत.
पाकिस्तानात आज किती हिंदू मंदिरे?
पाकिस्तानच्या संसदेत सन २०२५ मध्ये दिलेल्या माहितीनुसार देशात एक हजार २८५ हिंदू मंदिरे व ५३२ गुरुद्वारा होते. यातली फक्त ३७ स्थळे प्रत्यक्ष कार्यरत आहेत.
सन २०२१ च्या अहवालातील चित्र : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आयोगाच्या अहवालाचा संदर्भ अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य अहवालात आहे. त्यानुसार पाकिस्तानात फाळणीपूर्वीची ३६५ हिंदू मंदिरे तपासण्यात आली होती. त्यापैकी १३ मंदिरे सरकारी बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली ६५ मंदिरे हिंदू समुदायाकडे तर २८७ मंदिरे उपेक्षित होती. याच अहवालात १८३० हिंदू आणि शीख धार्मिक स्थळांपैकी केवळ ३१ कार्यरत असल्याचे म्हटले होते. काहींवर जिहाद्यांनी कब्जा केला तर, काहींचा मदरसा, मशिदी म्हणून वापर होत आहे. बाकीची भग्न आहेत. हा प्रश्न कमालीचा गंभीर आहे.
फाळणीनंतर किती मंदिरे पाडली?
फाळणीनंतर असंख्य मंदिरे पाडली गेली, काहींचे मदरसा आणि मशिदीत रूपांतर झाले, काही बंद पाडली आणि काहींवर अतिक्रमण केले. पाकिस्तानातील हिंदू मंदिरांच्या विद्ध्वंसाचा एकच अधिकृत आकडा नाही; मात्र सरकारी आणि स्वतंत्र अहवाल मोठ्या संख्येने हिंदू धार्मिक स्थळे उपेक्षित, अतिक्रमित, रूपांतरित किंवा बंद असल्याचे दाखवतात.
हल्ला झालेली मंदिरे
करक मंदिर : खैबर पख्तुनख्वामधील करक येथील कृष्णद्वार मंदिर आणि परमहंस महाराजांच्या समाधीवर डिसेंबर २०२० मध्ये जिहादी जमावाने हल्ला केला. मंदिराला आग लावण्यात आली. नंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी हस्तक्षेप केला.
गुरुद्वारांची स्थिती काय?
फारूकाबाद येथील १२५ वर्षे जुना गुरुद्वारा यंदा जुलैमध्ये पाडण्यात आले. पाकिस्तानच्या पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानिक व्यावसायिकाने आवश्यक हे पाडकाम केले. शीख समुदायाच्या विरोधानंतर पंजाब सरकारने चौकशीचे आदेश देऊन गुरुद्वारा पुन्हा बांधण्याचे आश्वासन दिले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेचा निषेध केला होता.
क्वेटा — गुरुद्वारा सिंह सभा
यंदाच ऑगस्टमध्ये बलुचिस्तानातील क्वेटा येथे आणखी एका ऐतिहासिक गुरुद्वाराची इमारत पाडून मॉल बांधायला सुरुवात झाली. पाकिस्तानातील हिंदू आणि शीख यांच्या देवस्थानांच्या जमिनीवर अतिक्रमण करून मालमत्तेचा वाद केला जातो. सन २०२४ मध्ये डॉनने लाहोरमधील हिंदू आणि शीख समुदायाच्या काही ट्रस्ट मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचे म्हटले होते.
हिंदू मुली आणि महिलांचे धर्मांतर
पाकिस्तानातील हिंदू समाजासाठी सर्वांत संवेदनशील मुद्द्यांपैकी एक म्हणजे अपहरण, जबरदस्तीचे धर्मांतर आणि जबरदस्तीचे विवाह. Centre for Social Justiceच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये हिंदू व ख्रिस्ती महिला आणि मुलींच्या अपहरणाची ८३ प्रकरणे नोंदविली गेली. त्यापैकी ५२ हिंदू, ३१ ख्रिश्चन होत्या. २१ ते २४ या कालावधीत ४२१ प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी २८२ हिंदू, १३७ ख्रिश्चन आणि २ शीख मुली होत्या. २०२५ मध्ये अशी ९४ प्रकरणे नोंदली गेली. वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असू शकते. कारण अनेक प्रकरणे भीतीमुळे नोंदवली जात नाहीत.
ईशनिंदा कायद्याचा धोका
पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या असुरक्षिततेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे Blasphemy Laws, म्हणजे ईशनिंदेचे कायदे. Human Rights Commission of Pakistan च्या २०२५ च्या अहवालानुसार ऑक्टोबर २४ पर्यंत ७५० पेक्षा जास्त व्यक्ती ईशनिंदेच्या आरोपांखाली तुरुंगात होत्या. सोशल मीडियावरील चुकीची माहिती, ईशनिंदेचे आरोप आणि त्यानंतर एखाद्यावर आरोप झाला तरी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच जमाव हिंसाचार करतो.
पाकिस्तानातील हिंसाचाराचे मोठे उदाहरण
१६ ऑगस्ट २३ रोजी पंजाबमधील जारनवाला येथे दोन ख्रिश्चन व्यक्तींवर कुराणाचा अपमान केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठ्या जमावाने ख्रिश्चन वस्त्यांवर हल्ला केला. Human Rights Commission of Pakistan व UNच्या Special Procedures च्या तथ्यशोधन अहवालानुसार किमान २४ चर्च अनेक छोटे प्रार्थनास्थळे, मोठ्या संख्येने ख्रिश्चन घरे, जाळण्यात आली किंवा लुटण्यात आली.
अहमदी
अहमदी समाजाला पाकिस्तानच्या कायद्यात विशेषतः गंभीर धार्मिक-सामाजिक निर्बंधांना सामोरे जावे लागते. अहमदी धार्मिक स्थळे, कबरी आणि धार्मिक चिन्हांवर हल्ल्यांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. २०२३ मध्ये अशा धार्मिक स्थळांवरील ४० हल्ल्यांची नोंद झाली.
हिंदूंचे सिंधमधून स्थलांतर
Human Rights Commission of Pakistanने 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासाचे शीर्षकच होते. “Exodus : Is the Hindu Community Leaving Sindh?” या अभ्यासानुसार सिंधमधील काही हिंदू कुटुंबांच्या स्थलांतरामागे मंदिरे पाडली जातात, धार्मिक हिंसा आणि काही हिंदू कुटुंबांवर जिहादी गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणी ही कारणे होती. त्याचबरोबर ईशनिंदा कायदे, जमाव हिंसा, जबरदस्तीचे धर्मांतर, अपहरण, जबरदस्तीचे विवाह, अतिक्रमण आणि सामाजिक भेदभाव या समस्यांमुळे धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे.
महत्त्वाचे आकडे
| पाकिस्तानची लोकसंख्या | २५ कोटी |
| हिंदू | ३८ लाख |
| अनुसूचित जाती | १३ लाख |
| ख्रिश्चन | ३३ लाख |
| शीख | १६ हजार |
| हिंदू धार्मिक स्थळे | १२८५ |
| गुरुद्वारे | ५३२ |
| कार्यरत हिंदू-शीख धार्मिक स्थळे | ३७ |
| २०२३ मधील हिंदू मंदिरे | ३६५ |
| त्यापैकी ETPB व्यवस्थापन | १३ |
| हिंदू समुदाय व्यवस्थापन | ६५ |
| देखभालीशिवाय | २८७ |
| २०२४ मध्ये अल्पसंख्याक मुली/महिलांच्या अपहरण-धर्मांतराची नोंद | ८३ |
| २१ ते २४ अशा प्रकरणांची नोंद | ४२१ |
| त्यातील हिंदू पीडित | २८२ |