Saturday, September 5, 2026

गोविंदा आला रे आला!

Share

प्रस्तावना


आज गल्लीबोळांत आणि चौकाचौकांत दुमदुमणारा “गोविंदा आला रे आला”चा गजर, उंचावर बांधलेली दहीहंडी आणि तिला गवसणी घालण्यासाठी आकाशाकडे झेपावणारे मानवी मनोरे हा केवळ एका उत्सवाचा जल्लोष नाही; तर तो द्वापारयुगातील एका युगप्रवर्तक सामाजिक क्रांतीची उजळणी आहे. आज साजरी होणारी ही दहीहंडी यमुनेच्या तीरावर घडलेल्या एका अशा प्रसंगाशी जोडलेली आहे, ज्याने मानवी संस्कृतीला समरसतेची आणि संघशक्तीची नवी दिशा दिली. दिवसभराच्या खेळानंतर बालकृष्ण आणि त्यांचे सवंगडी—पेंद्या, सुदामा, मनसुखा आदी सर्व गोपालबालक—एका वृक्षाच्या छायेत विसावले. भूक लागल्याने प्रत्येकाने घरून आणलेली शिदोरी सोडली. कोणाकडे केवळ सुक्या लाह्या, कोणाकडे थोडे ताक, तर कोणाकडे कोरडी भाकर होती. दारिद्र्य आणि विषमतेचे सावट त्या निष्पाप बालकांच्या चेहऱ्यावर संकोच व न्यूनगंडाच्या रूपात उमटले. अंतर्यामी श्रीकृष्णाने सवंगड्यांच्या मनातील ही सुप्त वेदना तत्क्षणी ओळखली. त्यांनी हसतमुखाने सर्वांच्या शिदोऱ्या एकाच पात्रात एकत्र कालवल्या. स्वतःच्या हाताने मित्रांना घास भरवला आणि त्यांच्या हाताने स्वतःही प्रेमाने भक्षण केला. हा केवळ अन्नाचा मिलाफ नव्हता, तर विषमतेची दरी मिटवून मानवी मने एका सूत्रात गुंफणारा सामाजिक समरसतेचा दाखला होता.

समरसतेची ज्योत

गोकुळातील गवळणी प्राण्यांपासून आणि लहान मुलांपासून लोणी-दही सुरक्षित राहावे म्हणून घडे छताला लटकवलेल्या शिंकाळ्यात ठेवत असत. बालकृष्ण आपल्या मित्रांचे खांद्यावर खांदे देऊन मानवी मनोरे उभारत आणि सर्वात वर चढून मडके फोडून त्यातील लोणी सर्वांना वाटत असत. आपल्याच घरातील साठवून ठेवलेली साधनसंपत्ती आपल्याच घरातील बालकांना मिळण्यासाठी कृष्णाने घेतलेला पुढाकार हे उत्तम नेत्याचे लक्षण आहे.
‘राजा कालस्य कारणम्’ म्हणतात ते खरेच आहे, नेता जसा विचार करतो आणि निर्णय घेतो, तसाच काळ व समाज घडत असतो. श्रीकृष्ण हे गोकुळातील राजघराण्याशी संबंधित आणि साक्षात जगन्नियंता होते, परंतु त्यांनी कोणत्याही सत्तेचा वा श्रेष्ठत्वाचा बडेजाव मिरवला नाही. समाजातील सामान्य गोपालबालकांविषयी श्रीकृष्णाच्या अंतःकरणात अपार करुणा, आत्मीयता आणि निरपेक्ष प्रेमभाव होता. त्या मित्रांना केवळ सहानुभूती न दाखवता, स्वतःच्या बरोबरीचे स्थान देऊन कृष्णाने त्यांच्यात स्वाभिमान जागवला आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. एका आदर्श लोकनेत्याने विषम समाजात आत्मसन्मानाची आणि समतेची ज्योत कशी पेटवावी, याचा हा अद्वितीय वस्तुपाठ होता.

संत तुकारामांचा अभंग

या काल्याचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात:

“उपजोनिया पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥
वैकुंठीं तो ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचा ॥”

संत तुकाराम महाराज स्पष्ट करतात की, वैकुंठातील दिव्य ऐश्वर्यापेक्षा समाजातील बांधवांसोबत एकत्र बसून प्रेमाने खाल्लेला हा काल्याचा घास देवाधिकांनाही स्वर्गात दुर्लभ आहे.
गोकुळात उंचावर लटकवलेली शिंकाळ्यांतील हंडी फोडण्यासाठी श्रीकृष्णाने उभे केलेले मानवी मनोरे हे ‘संघभावने’चे आणि संघटित सामर्थ्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. उंचावरील हंडी फोडणे हे एका व्यक्तीचे काम नाही; त्यासाठी प्रत्येकाला एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवून उभे राहावे लागते. या रचनेमध्ये पाया खंबीर नसेल, तर शिखरावरचा गोविंदा कधीच ध्येय गाठू शकत नाही. येथे जात, पंथ, गरीब-श्रीमंत हे सर्व भेद गळून पडतात; उरतो तो केवळ परस्परांवरील अतूट विश्वास आणि सांघिक निष्ठा. 

कलियुगे संघशक्ति


आज कलियुगात दहीहंडी साजरी करताना आपण केवळ उत्सवाचा बाह्य आनंद घेत नसून श्रीकृष्णाच्या याच युगप्रवर्तक जीवनकार्याला स्मरत आहोत. आधुनिक काळात समाज जेव्हा विविध भेद, स्वार्थ आणि संकुचित विचारांनी विभागला जातो, तेव्हा दहीहंडी आपल्याला संघटित शक्तीची आणि एकात्मतेची दिशा दाखवते. स्वतःच्या संकुचित शिदोरीचा अहंकार विसरून सर्वांनी एकत्र येणे, समाजातील सर्व घटकांना खांद्यावर घेऊन उन्नत करणे आणि समाजाला समर्थ बनवणे, हाच गोपाळकाल्याचा शाश्वत संदेश आहे. दहीहंडी फोडण्यासाठी एकत्र आलेल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात हीच समरसतेची भावना धडधडत असते आणि हीच संघशक्ती कलियुगात आपणास तारून नेईल.

ॐ श्री कृष्णार्पणमस्तु|

अन्य लेख

संबंधित लेख