Tuesday, September 15, 2026

अभियांत्रिकी पलिकडील सर एम व्ही!

Share


अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! आज त्यांचा जन्मदिवस अभियांत्रिकी दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

—————————————————————–—————————————————————–

एखाद्या राज्याचा विकास केवळ मोठमोठी धरणे, कारखाने, रस्ते उभारून होत नसतो. त्यासाठी त्या राज्याची बलस्स्थाने ओळखून तिथे विकसित होऊ शकतील अशा उद्योगांची पायाभरणी करत त्या आधारावर राज्याची औद्योगिक दिशा निश्चित करणे, अशी दिशा निश्चित करत असताना त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ शिक्षणातून विकसित करण्याची दूरदृष्टी आणि कच्चा माल उपलब्ध करून देणाऱ्या शेतकी अर्थव्यवस्थेला विज्ञानाची जोड देत अधिकाधिक बळकट करणे अशा स्वरूपाची सर्वांगीण दूरदृष्टी असणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींची समज असणारे आणि सतत कार्यमग्न राहण्याची आवड असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून मैसूर संस्थानचे दिवाण सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव सर्वश्रुत आहे. सर एमव्ही या आदरार्थी पण आपुलकीच्या नावाने ते मैसूरात ओळखले जात असत.

सध्याच्या आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे सर एम.व्ही. यांचे मूळ गाव. त्यांचे पूर्वज त्यांच्या जन्मापूर्वी तीन शतके मैसूर मध्ये स्थलांतरीत झाले होते. आपल्या मूळ गावाची आठवण म्हणून त्या नावाचा समावेश त्यांनी आपल्या नावात करून घेतला होता. १५ सप्टेंबर १८६१ या दिवशी कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी गावामध्ये, श्रीनिवास शास्त्री आणि वेंकटम्मा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण बंगळूर येथे झाले. १८८१ मध्ये मद्रास विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली आणि नंतर ‘कॉलेज ऑफ सायन्स, पुणे’ (आजचे ‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे’) येथे स्थापत्य अभियांत्रिकीचे (सिव्हिल इंजिनीअरिंग) शिक्षण घेतले. काही काळ मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम केल्यानंतर त्यांना भारतीय सिंचन आयोगात काम करण्यासाठी बोलवून घेतले गेले. १९०३ साली पुण्याच्या खडकवासला धरणात बसवण्यात आलेली स्वयंचलित वेअर वॉटर फ्लडगेट्सची एक प्रणाली ही त्यांनी संशोधित केली होती आणि तिचे पेटंट देखील त्यांनी मिळवले होते. तीचाच वापर पुढे तिग्रा धरण, KRS म्हणजेच कृष्णराजा सागर धरणांमध्येदेखील केला गेला. हैदराबाद शहराचे रक्षण करण्यासाठी बांधलेली पूर संरक्षण प्रणाली, विशाखापट्टणम बंदराचे समुद्राच्या धूपेपासून संरक्षण करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९०९ मध्ये, राज्याचे मुख्य अभियंता म्हणून, त्यांनी कावेरी नदीवर कन्नमबाडी धरण बांधण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९१२ मध्ये मैसूर संस्थानच्या दिवाण पदाची धुरा त्यांनी स्वीकारल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित देखील केल्या. त्याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आज सुवासिक साबणांमध्ये वरच्या स्थानावर असणारा मैसूर सॅंडल सोप! अस्सल चंदनी सुगंध असणाऱ्या या साबण उद्योगांची पायाभरणी सर एम व्ही यांनी त्याकाळात केली. मैसूर आणि त्याच्या आसपास मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या चंदनाचा उपयोग करून म्हैसूर सोप फॅक्टरी, सँडल ऑइल फॅक्टरी अशा सुगंधी द्रव्योत्पादन फॅक्टऱ्या त्यांनी निर्माण केल्या. त्यांच्या आजही पसंतीस उतरणाऱ्या सुगंधावरून सर एम व्ही किती दूरदृष्टीचे होते हे सहज लक्षात येते. त्याशिवाय पॅरासिटॉइड लॅबोरेटरी, भद्रावती आयर्न वर्क्स स्टेट बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर शुगर मिल्स आणि इतर असंख्य औद्योगिक उपक्रम स्थापन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यांनी आपल्या दिवाणपदाच्या काळात उद्योगातील खाजगी गुंतवणुकीलाही प्रोत्साहन दिले. ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी, वेळेच्या नियोजनासाठी आणि समर्पणासाठी ओळखले जात होते.

सुस्ती सोडा आणि काम करा हा त्यांचा आवडता मंत्र होता. “ए व्हिजन ऑफ प्रॉस्परस म्हैसूर” या आपल्या पुस्तकात त्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान, सिंचन, औद्योगिकीकरण अशा सगळ्याच विकासपैलूंचा परामर्श घेतला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी यातील प्रत्येक पैलूचे महत्व त्यांनी अधोरेखित केलेले आहे.

त्यांच्या कार्याचा आढावा घेताना केवळ एक अभियंता म्हणून न पाहता अधिक व्यापक दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे अगत्याचे आहे. त्यांचे म्हैसूरमधील कार्य पाहिले, तर त्यांच्या दूरदृष्टीची खरी व्याप्ती लक्षात येते. त्यांनी केवळ धरणे, कारखाने किंवा संस्था उभारल्या नाहीत, तर विकासाची एक सर्वसमावेशक दृष्टी रुजवली. जलसंपदा, शेती, उद्योग, शिक्षण, बँकिंग आणि रोजगार या सर्वांचा परस्परसंबंध त्यांनी ओळखला. म्हणूनच त्यांचा वारसा हा केवळ एका अभियंत्याचा किंवा दिवाणाचा वारसा नाही; तो नियोजनबद्ध आणि स्वावलंबी राष्ट्रनिर्मितीचा आदर्श आहे. ‘काम हेच जीवनाचे ध्येय’ मानणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्या कर्तृत्वातून आधुनिक भारताला विकासाचा मार्ग दाखवला.
जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेत ब्रिटिश सरकारने १९१५ मध्ये त्यांना ‘Knight Commander of the Order of the Indian Empire’ हा किताब बहाल केला आणि ते ‘सर एम. विश्वेश्वरय्या’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्याशिवाय स्वतंत्र भारताचा सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न हा किताब देऊन 1955 साली त्यांना गौरवले गेले. 101 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले सर एम व्ही 14 एप्रिल 1962 मध्ये दिवंगत झाले.

आधुनिक भारताचा अधिकाधिक विकास करण्याच्या प्रयत्नांमध्ये, ‘विकासाची सर्वांगीण दृष्टी विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असणे’ हीच या महान अभियंत्याला खरी आदरांजली ठरेल.

– मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख