अन्तू आपल्या टोलेजंग बंगल्याच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीत उभा असतो…
तेवढ्यात त्याला खालून एक आलिशान गाडी येताना दिसते…
अन्तू मान फिरवून आतल्या खोलीत बेडवर आरामात लोळणाऱ्या आपल्या पप्पाला विचारतो…
पप्पा… ते वांद्र्याच्या फोटोग्राफर अंकलला तुम्ही आपल्या गणपतीसाठी बोलवला होता काय?…
होय डिकरा… पण तुला कसा कळला?….
पप्पा… खाली एक लांबलचक गाडी उभी राहिलीय… तेच्यामधून लय मोटा लटांबर उतरलाय… तेच्यामधी ते फोटावाला अंकल बी हाय…
पप्पा लगेच नवीन शर्ट घालून तयार होतो…
…………………………..
या या साहेब… भले पधार्या…
राम राम मुकेश शेठ…
जय श्रीकृष्ण… जामनगर पछी आपला लय दिवस नंतर मेळ पडतोय…
हो हो शेठ… हल्ली मला वेळच नसतो…
हां… मुख्यमंत्री असताना तर फोन उचलायला बी तुम्हाला वेळ नसायचा… तवा एक-दोन वेळा इम्पॉर्टंट मेसेज मी सचीन भाई वाजेला देऊन तुम्हाला पोचवायला सांगितला होता नि तुम्हाला ते पोचले बी होते…
तसं नाय शेठ… तेव्हा माझ्याबरोबर सगळाच पक्ष होता… त्यामुळे मी घरीच असलो तरी फोन उचलायला पण वेळ नसायचा… आता आजूबाजूला माणसं कमी झाल्यामुळे फोन उचलायला वेळ मिळतो पण नविन माणसं गोळा करायला महाराष्ट्रभर फिरावं लागतं… त्यामुळे मी घरी कमी वेळ असतो…
हां म्हणून निमंत्रण देताना मी लई चिंतेत होतो… मनात बोलला होता… साहेब येतायत की नाय…
शेठ… तुम्ही निमंत्रण दिलं आणि मी आलो नाही असं कधी होईल का?…
ते पण बराबर हाय साहेब… अन्तू डिकराच्या लग्नाला तुम्ही जामनगरपर्यंत आला होता… ते बी अख्खी फॅमिली घेऊन…
शेठ चला… तुमच्या गणपतीचे दर्शन घेऊ…
या या साहेब… हे बाजूला गणपती हाय…
साहेब सहकुटुंब सहपरिवार गणपती समोर उभे राहून शेठला विचारतात…
शेठ… तुमचा गणपती नवसाला पावतो का?…
पावतो पावतो… डिकराच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो नक्की पावतो…
तुम्हाला काही स्वतःला अनुभव आला आहे का?…
हां साहेब… ते सचिन वाजेने आमच्या घरासमोर जिलेटीनची कांडी ठेवली होती ना… तवा मी नवस बोलला होता… आमचे जीवावर उठलेल्या सगळ्यांचा तळपट होव दे… आणि गणपती बाप्पाने आमचा ऐकला…
साहेबांनी आवंढा गिळला आणि शेठच्या गणपतीला नवस बोलण्याचा प्लॅन रद्द करून कसाबसा तीर्थप्रसाद घेऊन… घरी जायला माघारी फिरले…
त्यावर शेठ आग्रह करू लागला…
साहेब… जेवल्या बगर जायचं नाय… नीताने खास तुमच्यासाठी वडापाव बी बनवलाय…
शेठ आज आग्रह करू नका… मला लालबागच्या राजाला जायचंय… तिथेच जेवायला येतोय म्हणून सांगितलंय…
आणि साहेब लटांबरा सोबत गाडीत बसून घरी जेवायला निघाले…