Friday, October 2, 2026

धीरोदात्त!

Share


संस्कृत महाकाव्य आणि नाट्यशास्त्रामध्ये नायक कसं असावा याचे काही प्रकार सांगितले आहेत. त्यातला धीरोदात्त नायक म्हणजे सर्वश्रेष्ठ मानला जातो. उत्तम चारित्र्य, स्थिर बुद्धी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत आणि गंभीर राहून अविचल न होता पार होणाराय नायक म्हणजे धीरोदात्त नायक!

३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लाईदुबईच्या FZ1073 या बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानातील प्रवाशांना असाच एक धीरोदात्त नायक अनुभवायला मिळाला. हे विमान हजारो फूट उंचीवर असताना एक भयंकर प्रसंग घडला. विमानाचे कॅप्टन होते भारतीय पायलट स्मित मच्छार. कॉकपिटमध्ये त्यांच्यावर सह-वैमानिकाने चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी होऊनही स्मित यांनी प्रसंगावधान राखून कॉकपिटचा दरवाजा उघडला. विमानातील काही प्रशिक्षित इस्राएली प्रवाशांनी आणीबाणी ओळखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत केली. आणि ते विमान सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित उतरलं आणि जवळपास १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. त्या सहवैमानिकाने असा हल्ला का केला? त्याचा नेमका कोणता हेतू होता याविषयी कोणतीही ठोस माहिती नसली तरी प्रवाशांच्या दृष्टीने परिस्थिती धोकादायकच होती. त्यातून मन आणि बुद्धी स्थिर ठेवत मार्ग काढल्यामुळे तो धोका टळला.

घरचा कापड व्यवसाय सांभाळायचा म्हणून अगदी सहजपणे टेक्स्टाइल इंजिनियरिंग आणि त्यांनंतर वेलिंगकर इंस्टिट्यूट मधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेत असतानाच स्मित यांची ओळख aviation किंवा विमानोड्डाण क्षेत्राशी झाली आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. पुढे न्यूझीलंडला जाऊन त्यांनी खडतर असे फ्लाइट ट्रेनिंग पूर्ण केले आणि कमर्शियल पायलट होण्याचा मार्ग पक्का केला. जून २०११ मध्ये ते स्पाइसजेटमध्ये रुजू झाले आणि तिथे ११ वर्षांहून अधिक काळ काम केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२० पासून नवीन पायलट्सना प्रशिक्षण देणारे कॅप्टन म्हणून ते कामं पाहत होते. जून २०२२ मध्ये फ्लायदुबई या विमानकंपनीत डायरेक्ट-एंट्री कॅप्टन म्हणून ते रूजू झाले. स्मित यांनी बोइंग ७३७ च्या विविध मॉडेल्सवर ९,७५० तासांहून अधिक उड्डाण केल्याची नोंद त्यांच्या कार्यकारी तपशीलात सापडते. पण केवळ फक्त विमान उडवणं नाही, तर इतरांना घडवणं आणि उड्डाण सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणं हा ही त्यांच्या कामाचा भाग होता.

कॅप्टन स्मित यांची एक मुलाखत पाहण्यात आली. विमानाचा मुख्य कॅप्टन म्हणून काम करत असताना आलेले काही अनुभव त्यांनी त्यात मांडले आहेत. ते पायलट असणाऱ्या एका विमानात अचानक एका बाळाचा जन्म होणे आणि त्याचवेळी उद्भवलेल्या वैद्यकीय आणीबाणीवर जलद मार्ग काढत असताना आपलं मन बुद्धी स्थिर ठेवत वैमानिकाच्या दिलेल्या चौकटीत राहत मार्ग कसा काढला ते त्यांनी सांगितलं आहे. त्याची बीजं अगदी सुरुवातीला आलेल्या एक अनुभवामध्ये असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे. विमान क्षेत्रातील विलंब याविषयी बोलत असताना त्यांनी हा प्रसंग सांगितलं आहे. त्या विमानाच्या मुख्य वैमानिकाने आपल्याला काय करायच आहे असा दृष्टिकोन न ठेवता कॉकपिटचे दार उघडले आणि त्या चार हवाईसुंदऱ्यांच्या पाठीशी उभे रहात, प्रवाशांना अनिश्चित वेळापत्रकाविषयी शांत पण ठामपणे समजावत परिस्थिती नियंत्रणात आणली.
स्मित म्हणाले मी यातून आयुष्यभरासाठी धडा शिकलो. त्यानंतर कोणतीही परिस्थिती आली तरी नेहमी प्रवाशांना विश्वासात घेऊनच त्यातून मार्ग काढण्याचा पर्याय मी निवडत आलो. आणि प्रवासीदेखील अशावेळी पूर्ण सहकारी देतात असा अनुभव त्यांनी मांडला!

‘विमानोड्डाण क्षेत्रात delays- technical glitches -crashes अशा कोणत्याही अडचणी कधीही येऊ शकतात. अशावेळी त्यातून शांतपणेच मार्ग काढावा लागतो.’ ‘या क्षेत्रात ताण-तणाव किंवा असंतुलित मानसिकतेची शक्यताही घातक ठरू शकते.’ ‘विमानात प्रवासात असताना कोणतीही लहान मोठी मदत लागली तरी विमानातील कर्मचारी वर्गच तुमच्या मदतीला येणार असतो; त्यामुळे त्यांना त्यांचा योग्य मान दिला जायला हवा.’ बोईंग mx च्या अनुभवांबाबत सावध प्रतिक्रिया देत असतानाच ‘कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होताना आधी नेमकं काय झालं आहे ते समजून घ्या आणि मग व्यक्त व्हा’ अशाप्रकारचे कित्येक विचार या मुलाखतीत त्यांनी मांडले आहेत.

त्यांनी मांडलेली प्रत्येक गोष्ट ३० सप्टेंबरच्या प्रसंगात त्यांच्या उपयोगी पडलेली आहेच. त्यांची तणावातही स्थिर राहून मार्ग काढण्याची क्षमता, दार उघडताक्षणी प्रवाशांना विश्वासात घेतल्यामुळे त्यांच्याकडून आणि कर्मचाऱ्यांकडून झालेली मदत यामुळेच पुढचा अनर्थ टळला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या स्मित यांना आधी तबूकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना UAE मध्ये आणलं गेलं आणि आता त्यांच्यावर अबुधाबीत उपचार सुरू आहेत. ‘त्यांची प्रकृती चांगली असून ते झपाट्याने बरे होत आहेत.’ असे UAE मधील भारतीय राजदूतांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या कामगिरीचं कौतुक करत त्यांना “हीरो” म्हटलं. त्यांच्याशी बोलताना स्मित यांनी हनुमानचालिसेवरील आपला विश्वास व्यक्त केला आहे. या भयंकर संकटात देखील हनुमानचालिसा आपल्या तोंडी होतीच असे त्यांनी सांगितले. वायुपुत्र हनुमानानेच त्यांना हे हवेतले संकट टाळण्याची शक्ती दिली!

सुरुवातीला सांगितलेल्या धीरोदात्त नायकाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे हनुमान! त्याच हनुमंताच्या निस्सीम भक्ताने तोच धीरोदात्तपणा आपल्याही ठायी असल्याचे या प्रसंगातून दाखवून दिले आहे!

-मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख