Saturday, October 3, 2026

घरकोंबड्यांचा १ किलोमीटरचा लॉँग मार्च ……

Share

वेळ: दुपारी २ वाजताची

मॅडमश्री २ बंगल्यातील साहेबांच्या मोबाईलची…

“या चिमण्यांनो परत फिरा रे” रिंगटोन वाजते…

साहेबांचा नुकताच डोळा लागलेला असतो…

डोळे किलकिले करून साहेब स्क्रिनवर नाव बघतात…

“खळ्ळळ् खट्याक”…

कपाळावर आधीच असलेल्या आठ्यांवर आणखी आणखी ४ आठ्या चढवून साहेब त्रासिक आवाजात हॅलोss म्हणतात…

पलिकडून आवाज येतो… दादू, झोपला होतास का?

हो रे, हल्ली काहीच काम नाही ना… त्यामुळे सारखी झोप येते… पण तू एवढ्यात उठलास?

हो रे… तू उद्या मोर्चाला येतो आहेस ना विचारायला उठावं लागलं…

मी आलंच पाहिजे का?…

दादू, मोर्चा आपला आहे…

हो रे, पण माझे लाखो कट्टर निष्ठावान सैनिक येतील ना…

तसे माझे पण लाखो कट्टर निष्ठावान सैनिक येणार आहेत… पण आपण नसलो तर तुझा घरगडी उगाच भाव खाऊन जाईल…

शी बाबा, भायखळा ते बोरीबंदर… ५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे… एव्हढं चालायचं म्हणजे…

दादू, आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या मनातलं बोललास…

आपण दोघे गाडीत बसून मोर्चात सामील होऊ… बाकी आपले कट्टर निष्ठावान सैनिक दोन दोन वडापाव दिले की आनंदाने चालतील… बाय द वे… भायखळा ते बोरीबंदर लाँग मार्चची आयडिया कोणाची ?…

तुझ्या बाळाची…

माझं बाळ एवढा ५ किलोमीटरचा मार्ग ठरवणं शक्यच नाही… वडिल म्हणून मी त्याला पुरता ओळखून आहे…

अरे बाळा म्हणजे तुझा निवडणुकीत पडलेला बाळा नाही रे… तुझ्या तिकीटावर एकदाच निवडून आलेला बाळा म्हणतोय मी…

दादू पण आमच्या बाळाबरोबर तुझ्याकडचा देखील कोणीतरी असेल ना ठरवायला…

हो… आमच्याकडून कधीच कोर्टात न गेलेला वकील होता…

मग आता दोघांना सांग… मार्ग बदलून छोटा करायला…

अरे पण आता आयत्यावेळी ते बरं दिसेल का?…

२०१९ साली युतीचा मार्ग बदलून मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलास ते बरं दिसलं होतं का?…

बरं बरं त्यांना मार्ग बदलायला सांगतो पण तू जुन्या गोष्टी उकरून काढू नकोस… आता आपण एकत्र आलो आहोत ना?…

दादू हे बघ, त्यांना सांग १ किलोमीटरचा रूट खूप झाला… ५ किलोमीटर काय आणि १ किलोमीटर काय… आपण त्याला “लाँग मार्च”च म्हणायचं की प्रश्न मिटला…

१ किलोमीटर म्हणजे लॉंग मार्च मेट्रो सिनेमापासून सुरू करावा

लागणार… पण एक गोष्ट बरी होईल… माझ्या सैनिकांना वडापाव द्यायची गरज नाही…

दादू, माझे सैनिक याबाबतीत स्वावलंबी आहेत… दोनशे रुपयांपर्यंतच्या खर्चाची सोय त्यांची ते करतात…

तरीपण १ किलोमीटर चालायचं म्हणजे…

दादू… एक आयडिया… आपण घरून थेट बोरिबंदरलाच पोचूया…

गुड आयडिया… पण मोर्चा कशासाठी काढतोय रे आपण?… म्हणजे त्याप्रमाणे भाषणाची तयारी करता येईल…

हा मोर्चा काढायची आयडिया तर तुला त्या झुरळ सम्राटाने दिली होती ना?… त्यालाच विचार… आणि तुला कशाला तयारी करायला हवी… खंजीर वाघनखं कोथळा अफझलखान गद्दार

खोके असं २/४ वेळा आलटून पालटून म्हटलंस की झालं… फक्त “एकतर तू रहाशील किंवा मी” एव्हढाच डायलॉग चुकूनही मारू नकोस…

बरं बरं… नाही म्हणणार… पण मोर्चा नक्की कशासाठी काढणार आहोत ते त्या झुरळ सम्राटाला फोन करून विचारतो आणि तुला सांगतो…

असं म्हणून साहेब फोन कट करतात आणि झुरळ सम्राटाला फोन लावतात…

अन्य लेख

संबंधित लेख