चित्रपट निर्मिती सुविधा, वैविध्यपूर्ण चित्रीकरण स्थळे आणि मराठी चित्रपटांची विशेष उपस्थिती
महाराष्ट्राची समृद्ध चित्रपट परंपरा, आधुनिक निर्मिती सुविधा आणि वैविध्यपूर्ण चित्रीकरण स्थळे जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी ‘इफ्फी २०२६’ (IFFI 2026) मध्ये महाराष्ट्राने विशेष सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या (MFSCDC) वतीने राज्यातील अत्याधुनिक चित्रपट निर्मिती पायाभूत सुविधा आणि सर्जनशील क्षमतेचे प्रदर्शन करण्यात येत आहे.
https://x.com/PIBMumbai/status/2124019517101654417
मुंबईतील जागतिक दर्जाचे चित्रपट स्टुडिओ, विविध प्रकारच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध असलेली निसर्गरम्य आणि वैविध्यपूर्ण स्थळे तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती यांमुळे महाराष्ट्राचे चित्रपट क्षेत्र जागतिक व्यासपीठावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
या सोहळ्यात ‘तिघी’ आणि ‘सिनेमन’ या मराठी चित्रपटांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, सर्जनशीलता आणि प्रभावी कथाकथनाची परंपरा जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी या सहभागातून मिळत आहे.
महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी, तिची समृद्ध परंपरा आणि भविष्यातील चित्रपट निर्मितीच्या अमर्याद शक्यता जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आहे.