धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी अभिमान दिन आणि राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला आवर्जून ऑनलाईन उपस्थित राहिले होते.
यावेळी मोदींनी सांगितले की जनजातीय वीरांचा सन्मान म्हणजे भारताचा सन्मान होय. बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत देशातील तळागळातील घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम सरकार करत आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारच्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे पी एम जन्मन योजना, धरती आबा आदिवासी ग्राम विकास अभियान , एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि नक्षलवादाच्या छायेतून मुक्त झालेली गाव यामुळे जनजातीय समाजाच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जनजातीय समाजाचा गौरवशाली इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये व भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे . गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे प्रमुख केंद्र बनवताना जनजातीय, दलित आणि ओबीसी घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. राज्यपालांनी आपल्या भाषणात जनजातीय संस्कृती, परंपरा, अरण्य संपदा आणि लोककलांचे जपणूक करण्याचे महत्त्व सांगितले. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री जुवेल ओरम यांनी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनां विषयी माहिती दिली. भारताच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या जनजातीय समाजातील नेत्याचा असणं हे देशाच्या लोकशाहीची आणि सर्वसमावेशकतेची साक्ष देते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जल, जंगल, आणि जमिनीच रक्षण करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जनजातीय समाज देशाच्या विकासात अग्रेसर होत आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जनजातीय योद्धांच्या बलिदानाशिवाय अपूर्ण आहे. जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यावर आणि स्वाभिमानावर गदा आली, तेव्हा जनजातीय समाजाने कधीही अन्यायापुढे मान झुकवली नाही.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व आदिवासी हक्कांच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणारे भगवान बिरसा मुंडा हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते आदिवासी समाजाचे ‘धरती आबा’ (जगाचे पिता) होते. भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयातच जनजातीय हक्कांसाठी आणि जल , जंगल , जमीन यांच्या अधिकारासाठी उलगुलान म्हणजे आंदोलन उभं केलं जे आजही कोटी कोटी देशवासीयांना प्रेरणादायी ठरतं. त्याचप्रमाणे आसाम व मेघालय परिसरातील खासी उठावाचे नेतृत्व करणारे वीर तीरोट सिंग यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दीर्घ लढा दिला. सिद्धू आणि कान्हू यांच्या नेतृत्वाखाली संथाल समाजाने ब्रिटिश साम्राज्यवादाला मोठी टक्कर दिली. मानगडच्या भूमीवर गोविंद गुरूंचे अनुयायी, रानी गाइदिन्ल्यू, तंट्या भिल्ल, अल्लुरी सीताराम राजू, राणी दुर्गावती, तसेच महाराष्ट्राच्या भूमीतील राघोजी भांगरे, भगोजी नायक आणि वीर बाबुराव शेडमाके यांनी आपल्या शौर्याने देशाला नवी दिशा दिली.
केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात जनजातीय स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी जनजातीय स्वातंत्र्य सेनानी संग्रहालये उभारली आहेत. 2016 मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या घोषणेनुसार देशभरात 11 संग्रहालय प्रस्तावित असून, त्यापैकी अनेक संग्रहालयांचे उद्घाटन झालेले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही जनजातीय समाजाच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांबरोबर संवाद साधला. त्यामध्ये यवतमाळ मधून कृष्णा नागराज टेका, भरूच मधून वजीर भाई कोतवालिया, आयआयटी कानपूर मध्ये शिकण्यासाठी असलेले सबावत अन्वेष या सर्वांनी पंतप्रधानांबरोबर ऑनलाईन माध्यमाने थेट संवाद साधला. कृष्णाराव टेका म्हणाले पीएम जनमन योजनेमुळे पक्क घर, शौचालय, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत. कोलम समाजाच्या पारंपारिक संस्कृतीचे जतन करत आधुनिक विकासाचा प्रकाश त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. वजीर भाई कोतवालिया यांनी ब्रिटिश काळात बांबू तोडणे या व्यवसायाला गुन्हेगारी स्वरूप दिल्याकारणाने कोतवालिया समाज यांचे उत्पन्न एक शतकभर हिरावलं गेलं होतं. आता सरकारने बांबू विषयी घेतलेल्या निर्णयामुळे उत्पन्नाचे विविध मार्ग खुले झाले आहेत. आयआयटी कानपूरचे सबावत अन्वेष हे इंजीनियरिंग फिजिक्स प्रशिक्षण घेत आहेत, परंतु भविष्यात वायु प्रदूषण आणि पर्यावरण रक्षणासाठी वैज्ञानिक संशोधन करण्याचे इच्छा बाळगून आहे.
एकेकाळी छत्तीसगडमधील बस्तर, महाराष्ट्रातील गडचिरोली आणि देशातील सव्वाशेरहून अधिक जिल्हे माओवादी-नक्षलवादी हिंसेमुळे त्रस्त होते. या हिंसेमुळे सर्वाधिक फटका जनजातीय माता, भगिनी आणि त्यांच्या मुलांना बसला. त्यांचे शिक्षण, मतदानाचा हक्क, रोजगाराच्या संधी याहीपेक्षा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये दारिद्र्यात जीवन व्यतीत करत होते. आज शासनाच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाने नक्षलवादाचे उच्चाटन झाले, आणि आज तिथे उत्सव साजरे होत आहेत मुलं शाळेत जात आहेत युवकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत.
आदिवासी विकासाचे प्रमुख आयाम व उपक्रम
| योजना / उपक्रम | उद्दिष्ट व स्वरूप |
| पीएम-जन्मन (PM-JANMAN) | विशेष करून अत्यंत असुरक्षित आदिवासी गटांच्या (PVTGs) विकासासाठी, त्यांना पक्की घरे, रस्ते, मोबाईल कनेक्टिव्हिटी, आरोग्य व शिक्षण पुरवणे. |
| धरती आबा आदिवासी ग्राम विकास अभियान | देशातील सुमारे ६४,००० आदिवासी गावांमध्ये पायाभूत सुविधांचा (पाणी, वीज, रस्ते, आरोग्य) विस्तार करणे. |
| एकलव्य मॉडल निवासी शाळा (EMRS) | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मोफत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. सध्या ५३२ पेक्षा जास्त शाळा कार्यरत असून १.७२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. |
| वन धन विकास केंद्र (VDVK) | ३,६२० हून अधिक केंद्रांद्वारे आदिवासी वनोपजांना मूल्यवर्धकता (Value Addition) मिळवून देणे आणि १३ लाखांहून अधिक सदस्यांना रोजगाराशी जोडणे. |
| भाषिक व सांस्कृतिक जतन | लुप्त होत असलेल्या आदिवासी भाषांचे जतन करण्यासाठी ९ प्रमुख आदिवासी भाषांमध्ये अनुवाद सुविधा आणि ३०० हून अधिक प्राइमरची निर्मिती. |
| योजना / उपक्रम | उद्दिष्ट व स्वरूप |
| पीएम-जन्मन (PM-JANMAN) | विशेष करून अत्यंत असुरक्षित आदिवासी गटांच्या (PVTGs) विकासासाठी, त्यांना पक्की घरे, रस्ते, मोबाईल कनेक्टिव्हिटी, आरोग्य व शिक्षण पुरवणे. |
| धरती आबा आदिवासी ग्राम विकास अभियान | देशातील सुमारे ६४,००० आदिवासी गावांमध्ये पायाभूत सुविधांचा (पाणी, वीज, रस्ते, आरोग्य) विस्तार करणे. |
| एकलव्य मॉडल निवासी शाळा (EMRS) | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मोफत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. सध्या ५३२ पेक्षा जास्त शाळा कार्यरत असून १.७२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. |
| वन धन विकास केंद्र (VDVK) | ३,६२० हून अधिक केंद्रांद्वारे आदिवासी वनोपजांना मूल्यवर्धकता (Value Addition) मिळवून देणे आणि १३ लाखांहून अधिक सदस्यांना रोजगाराशी जोडणे. |
| भाषिक व सांस्कृतिक जतन | लुप्त होत असलेल्या आदिवासी भाषांचे जतन करण्यासाठी ९ प्रमुख आदिवासी भाषांमध्ये अनुवाद सुविधा आणि ३०० हून अधिक प्राइमरची निर्मिती. |