रत्नागिरीत १६ नोव्हेंबर १९३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घडवून आणलेली स्पृश्य-अस्पृश्यांची एकत्रित भोजनपंगत ही जातिभेदाच्या भिंती मोडण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते.
एखाद्या समाजातील भेदभाव संपवायचा असेल, तर केवळ विचार मांडून किंवा कायदे करून भागत नाही. त्या समाजातील माणसांनी एकमेकांशी कसे वागावे, एकत्र कसे यावे आणि परस्परांशी असलेले सामाजिक संबंध कसे बदलावेत, यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक असते. जवळपास शंभर वर्षांपूर्वी रत्नागिरीत घडलेला एक प्रयोग याच विचाराचे उदाहरण ठरला. १६ नोव्हेंबर १९३० रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहभोजनाने रूढ जातिभेदाला थेट आव्हान दिले.
त्या काळात जातिभेद हा केवळ सामाजिक ओळखीपुरता मर्यादित नव्हता. कोणाच्या हातचे अन्न खायचे, कोणाच्या घरात प्रवेश करायचा, कोणाच्या शेजारी बसायचे आणि कोणाला स्पर्श करायचा, यावरही जातीची बंधने होती. विशेषतः रोटीबंदीमुळे वेगवेगळ्या जातींच्या लोकांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जात होते. अशा परिस्थितीत सर्व जातींच्या लोकांनी एकाच पंगतीत बसून भोजन करणे ही साधी बाब नव्हती. त्यासाठी सामाजिक विरोधाला सामोरे जाण्याची तयारी आवश्यक होती.
१९२४ ते १९३७ या काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ब्रिटिश सरकारच्या अटींनुसार रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते। सक्रिय राजकारणावर बंदी असल्याने त्यांनी आपले सर्व लक्ष हिंदू समाजातील जाती-जमातींमधील भेदभाव नष्ट करून समाज संघटित करण्यावर केंद्रित केले.
१७ एप्रिल १९२४ रोजी सावरकरांनी सामाजिक सुधारणांच्या आपल्या प्रयोगांना सुरुवात करण्यासाठी परशुराम गावातील विठ्ठल मंदिराची जाणीवपूर्वक निवड केली. या मंदिराचे महत्त्व अनेक कारणांनी विशेष होते. चित्पावन ब्राह्मणांसाठी ते अत्यंत पवित्र स्थान मानले जात होते. पेशवे बाजीराव पहिले यांना याच मंदिरातून प्रेरणा मिळाली होती. त्यांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या मंदिराची स्थापना केली होती.
रत्नागिरीत स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर सावरकरांनी केलेले पहिले महत्त्वपूर्ण भाषण अशा आध्यात्मिक आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित स्थळी झाले. या भाषणासाठी त्यांनी निवडलेला विषय होता, ‘शुद्धीकरण आणि अस्पृश्योद्धार’. त्यांच्या या भूमिकेमुळे सनातनी हिंदूंकडून त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. मात्र, या विरोधामुळे आपल्या निर्धाराला तडा जाऊ द्यायचा नाही, असा निश्चय सावरकरांनी केला होता.
सावरकरांसमोरील पहिले मोठे आव्हान होते ते समाजात व्यापक जागृती निर्माण करण्याचे. १९२५ च्या गणेशोत्सवात त्यांनी व्याख्याने आणि सार्वजनिक चर्चांचे आयोजन केले. अस्पृश्यता ही अन्यायकारक असून हिंदू समाजासाठी घातक आहे, हे पटवून देणारे लेखही त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांच्या काही विचारांशी तत्त्वतः सहमत होणे लोकांना शक्य असले, तरी प्रत्यक्ष आचरणात ते आणणे कठीण होते, याची त्यांना जाणीव होती. कारण जन्मापासूनच माणसाच्या मनावर झालेले सामाजिक संस्कार आणि रूढींचा पगडा सहजासहजी दूर करणे शक्य नव्हते.
मात्र, या अडचणींनी सावरकरांचा निर्धार डगमगला नाही. रत्नागिरीतील सनातनी हिंदूंना मोठा धक्का बसेल, अशा पद्धतीने ते अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार समाजाच्या वस्तीत पोहोचले. महार समाजातील लोकांना शहरात येऊन भजने गाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी शहराची दारे उघडण्याची वाट पाहण्याऐवजी सावरकरांनी स्वतःच त्यांच्या वस्तीत, म्हणजेच महारवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी महार बांधवांसोबत भजने गायली, नृत्य केले आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
याच सामाजिक सुधारणा चळवळीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सहभोजन’ होय।
सावरकरांनी रत्नागिरीत सहभोजनाची चळवळ उभी करताना याच रूढीवर पहिला प्रहार केला. त्यांच्या मते, माणसाच्या धर्माचे स्थान त्याच्या अंतःकरणात असते, पोटात नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या हातचे अन्न खाल्ल्याने धर्म भ्रष्ट होतो, ही धारणा निरर्थक होती. भोजनाच्या माध्यमातून माणसांमध्ये जवळीक निर्माण होऊ शकते, परस्परांविषयीचा संकोच दूर होऊ शकतो आणि सामाजिक समानतेचा अनुभव प्रत्यक्षात येऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता.
या उपक्रमाची पूर्वतयारीही महत्त्वाची होती. डिसेंबर १९२९ मध्ये तरुण हिंदू मंडळाच्या माध्यमातून विविध जातींच्या सुमारे शंभर तरुणांनी एकत्र भोजन केले होते. त्यानंतर हा प्रयोग केवळ कार्यकर्त्यांपुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक सहभोजनासाठी जागा मिळवणे, भोजन तयार करण्यासाठी स्वयंपाकी तयार करणे आणि सामाजिक विरोधाला तोंड देणे, अशा अनेक अडचणी आल्या. अखेरीस खातू कुटुंबाच्या नाट्यगृहात त्याची व्यवस्था करण्यात आली. अपेक्षेपेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याने काहींना सहभागी होता न आल्याने परतावे लागले. १६ नोव्हेंबर १९३० च्या सहभोजनाकडे याच व्यापक सामाजिक प्रयोगातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहता येते.
या सहभोजनात ब्राह्मण, मराठा, भंडारी, वैश्य यांच्यासह महार, चांभार आणि इतर वंचित समाजघटकांचे लोक एकाच पंगतीत बसले. ही केवळ भोजनाची व्यवस्था नव्हती. शतकानुशतके सामाजिक अंतर राखण्याची सवय झालेल्या समाजाला एकत्र येण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा तो प्रयत्न होता. सहभोजनात सहभागी झालेल्यांची नावे प्रसिद्ध करण्याची पद्धतही सावरकरांनी सुरू केली. कारण या कृतीमागे कोणताही संकोच किंवा लपवाछपवी नसावी, अशी त्यांची भूमिका होती. या उपक्रमात सहभागी झालेल्यांना सामाजिक बहिष्कारासारख्या परिणामांना सामोरे जावे लागले; तरीही हळूहळू त्याचा स्वीकार वाढू लागला.
या सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दृष्टीने १९३१ मध्ये भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने रत्नागिरीत पतितपावन मंदिराची उभारणी झाली. सर्व जातींच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश, पूजा आणि उपासनेचा समान अधिकार मिळावा, हा त्यामागील मूलभूत विचार होता. मंदिराची स्थापना झाल्यानंतर तेथे आंतरजातीय सलोखा वाढविणारे सहभोजन आणि अन्य सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले जाऊ लागले. अशा उपक्रमांमधून सामाजिक समरसतेची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा सावरकरांचा प्रयत्न होता.
या कार्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही दखल घेतली होती. पतितपावन मंदिरात आयोजित एका कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवावे, अशी सावरकरांची इच्छा होती. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आंबेडकरांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत सावरकरांना पत्र पाठवले. त्यात सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात सावरकर करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली; त्याचवेळी त्यांच्या चातुर्वर्ण्यविषयक भूमिकेशी असलेला मतभेदही स्पष्टपणे मांडला.
“सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात आपण करीत असलेल्या कार्याबद्दल माझी प्रशंसा व्यक्त करण्याची ही संधी मी साधत आहे… अस्पृश्यांना हिंदू समाजाचा अविभाज्य भाग बनवायचे असेल, तर केवळ अस्पृश्यता नष्ट करून भागणार नाही. त्यासाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थाही नष्ट करावी लागेल… ही बाब लक्षात घेणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये आपण आहात, याचा मला आनंद आहे.
मात्र, चातुर्वर्ण्याचा आधार जन्माऐवजी गुणांवर असल्याचे आपण सांगत असलात, तरी त्याच संकल्पनेचा आग्रह धरत आहात, हे खेदजनक आहे. कालांतराने हा अनावश्यक आणि दिशाभूल करणारा शब्दप्रयोग सोडून देण्याचे धैर्य आपण दाखवाल, अशी मला आशा आहे.”
संदर्भ: धनंजय कीर, वीर सावरकर, पृष्ठ १९०.
आंबेडकरांच्या या पत्रातून दोन्ही नेत्यांच्या भूमिकांमधील साम्य आणि मूलभूत फरकही स्पष्ट होतात. जन्माधारित जातिभेद आणि अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, याबाबत दोघांचीही भूमिका ठाम होती. मात्र, चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेबाबत त्यांचे मतभेद होते. हिंदू धर्मग्रंथांचा आधार घेत सावरकर चातुर्वर्ण्याचा अर्थ जन्माऐवजी गुण आणि कर्तृत्वावर आधारित व्यवस्था असा लावत होते. जन्माधारित जातिव्यवस्थेपासून समाजाला दूर नेण्यासाठी ते हा युक्तिवाद करीत होते. याउलट, आंबेडकरांच्या मते चातुर्वर्ण्याचा आधार जन्माऐवजी गुणांवर ठेवणे पुरेसे नव्हते; ही संकल्पनाच सोडून देणे आवश्यक होते.
त्यामुळे आंबेडकरांनी सावरकरांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याची प्रशंसा केली असली, तरी त्यांच्या वैचारिक भूमिकेवर चिकित्सक मत नोंदवण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या पत्रव्यवहारातून सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाबाबत असलेले साम्य आणि ते साध्य करण्याच्या मार्गांबाबत असलेले मतभेद दोन्ही अधोरेखित होतात.
या चळवळीला कलाक्षेत्रातील काही व्यक्तींचाही सक्रिय पाठिंबा मिळाला. पंडित दीनानाथ मंगेशकर हे सावरकरांचे निकटचे मित्र होते. ते सहभोजनाच्या कार्यक्रमांत सहभागी होत आणि आपली कन्या लता हिलाही सोबत घेऊन जात. काही ऐतिहासिक नोंदींनुसार, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर या सावरकरांच्या आंतरजातीय सहभोजन उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांत लहान सदस्यांपैकी होत्या. पुढे जागतिक कीर्ती मिळवलेल्या या गायिकेच्या बालपणाशी जोडलेला हा सामाजिक इतिहासाचा एक वेगळाच पैलू आहे.
१६ नोव्हेंबर १९३० रोजीची ती भोजनपंगत आजही एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधते. समाजातील समरसता केवळ घोषणांनी निर्माण होत नाही. ती एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होण्यातून, सार्वजनिक जीवनात समान अधिकार देण्यातून आणि दैनंदिन व्यवहारातील भेदभाव दूर करण्यातून आकाराला येते. एकत्र भोजन करणे ही त्याची सुरुवात असू शकते; मात्र त्यातून निर्माण होणारा परस्परांचा विश्वास आणि बंधुभाव अधिक महत्त्वाचा असतो.
शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर उभे असताना त्या सहभोजनाचे महत्त्व केवळ ऐतिहासिक आठवण म्हणून मर्यादित राहत नाही. सामाजिक समरसता म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला समान प्रतिष्ठा, समान संधी आणि समान सहभाग मिळणे. रत्नागिरीतील त्या पंगतीने या दिशेने एक ठोस पाऊल टाकले होते. त्या प्रयत्नाचे खरे स्मरण म्हणजे त्यामागील समतेचा विचार आजच्या सामाजिक व्यवहारात उतरवणे.
– राजेश कोरडे