Thursday, September 24, 2026

देव-देवत्वापलीकडील संकल्पना

Share

प्रस्तावना

मानवी संस्कृतीचा इतिहास हा केवळ बाह्य भौतिक प्रगतीचा इतिहास नसून तो मानवी अंतर्मनाच्या आणि विश्वाशी असलेल्या संबंधांच्या शोधाचा प्रवास आहे. या चराचर सृष्टीच्या पलीकडे मानवी बुद्धीने ज्या एका गूढ, अव्यक्त आणि प्रकाशमय विश्वाची अनुभूती घेतली, तिला ‘दैवतसृष्टी’ म्हटले गेले. देव, धर्म आणि तत्त्वज्ञान ही तीन तत्त्वे मिळून सध्याची मानवी संस्कृतीची ओळख तयार होते. त्यामुळे आज ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत आपण प्राचीन संस्कृतीचा गाभा समजून घेण्यासाठी तिच्या दैवतसंकल्पनेचा मागोवा घेणार आहोत. 

मानवाला त्याच्या प्रारंभिक आदिम अवस्थेतच देवाची अपरिहार्य गरज भासली. या कल्पनेच्या मुळाशी निसर्गाविषयी वाटणारे आदिम भय आणि विस्मय हे प्रमुख कारण होते. वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, भूकंप, महापूर, अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांसारख्या निसर्गाच्या रौद्र रूपांपुढे स्वतःचे अल्पत्व जाणवल्याने मानवाने त्या महाशक्तींना देवरूप दिले. त्या शक्तींनी आपले अहित करू नये आणि जीवन समृद्ध करावे, या भावातून प्रार्थना आणि दैवतोपासनेचा जन्म झाला.

देव म्हणजे काय?

संस्कृतमधील पाणिनीच्या व्याकरणानुसार ‘देव’ हा शब्द ‘दिव्’ या धातूपासून तयार होतो. त्याने अनेक अर्थ सांगितले. त्यापैकी ‘द्युति’ म्हणजेच चमकणे, प्रकाशणे किंवा ज्ञानमय होणे या अर्थाने ‘देव’ ही संज्ञा सर्वमान्य झाली. पुढे महर्षी यास्कांनी आपल्या ‘निरुक्त’ या ग्रंथात –

“देवो दानाद्वा दीपनाद्वा द्योतनाद्वा द्युस्थानो भवतीति वा । यो देवः सा देवता ॥”

अशी व्याख्या केली. अर्थात, प्राणिमात्रांना जीवनोपयोगी घटकांचे निरंतर दान देणारा, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा, स्वतः प्रकाशमान असणारा, ज्याचे मूळ अधिष्ठान अंतरिक्ष अथवा द्युलोकात (आकाशात) आहे असा तो देव.

निसर्गशक्तींचे मानवीकरण

ऋग्वेदकालीन आर्यांची देवतांविषयक कल्पना निसर्गातील गूढ, भव्य व कल्याणकारी शक्तींवर आधारलेली होती. हिमालयात जाणवणाऱ्या निबिड अंधकारानंतर जेव्हा क्षितिजावर उषेचे सोनेरी, विलोभनीय दर्शन घडायचे, तेव्हा त्या अलौकिक निसर्गदृश्याने भारवून जाऊन ऋषींनी उषेला देवता कल्पून तिच्यावर अमृतमय सूक्ते रचली. वाऱ्यांच्या समूहांना मरुत्गण म्हणले. पाण्याचे रौद्ररुप पाहून त्याच्या नियंत्याला वरुण नाव दिले.

सुरुवातीला या सर्व निसर्गशक्ती आकारहीन होत्या. संस्कृतीच्या विकासासोबत मानवाने या अमूर्त शक्तींना मानवी रूप दिले. या मानवीकरणातून देवतांमध्ये स्त्री-पुरुषभेद, वैशिष्ट्यपूर्ण आयुधे आणि कौटुंबिक नातेसंबंध कल्पिले गेले.

तेहतीस कोटी देव

लोकमानसात प्रचलित असलेला ‘३३ कोटी देव’ हा समज भाषिक गैरसमजातून निर्माण झाला आहे. संस्कृतमध्ये ‘कोटि’ या शब्दाचा संख्यावाचक अर्थ करोड असला, तरी त्याचा आणखी एक अर्थ ‘प्रकार’, ‘श्रेणी’ किंवा ‘उच्चतम वर्ग’ असा आहे. वैदिक साहित्यातील ‘त्रयस्त्रिंशत् देवाः’ या उल्लेखाचा अर्थ अकरा द्युलोकात, अकरा अंतरिक्षामध्ये आणि अकरा पृथ्वीवर असे मिळून एकूण तेहतीस प्रकारचे किंवा तेहतीस उच्च देवता असाच होतो. महर्षी यास्कांनी वैदिक देवतांचे त्यांच्या निवासस्थानानुसार तीन मुख्य स्तरांवर वर्गीकरण केले: द्युस्थानीय (दिव्य) देवता, अंतरिक्षस्थानीय देवता, पार्थिव देवता.

वैदिक देवतांचे चारित्र्य नीतियुक्त आणि ‘ऋत’ (वैश्विक नियम) या तत्त्वाशी बांधलेले मानले गेले. वरुण हा या नैतिक नियमांचा प्रमुख प्रतिपालक होता. असे असले तरी ऋषींनी देवतांच्या सामर्थ्याची महती गाताना मानवाला एक कठोर विवेक दिला— ‘न देवचरितं चरेत्’. देवांची स्तुती करावी, संकटसमयी त्यांचे साहाय्य मागावे; परंतु त्यांच्या चरित्राचे अंधानुकरण करू नये, कारण मानवी नीतीचे निकष आणि अलौकिक निसर्गशक्तींचे व्यापार भिन्न असतात.

पौराणिक संक्रमण

काळाच्या ओघात वैदिक देवतांचे मूळ वैभव मागे पडले. पुराण काळात वरुण केवळ एक सामान्य जलदेव बनला, इंद्राचे माहात्म्य घसरले आणि अग्नीही दुय्यम ठरला. हे वैदिक देव पुराणात केवळ दिशांचे रक्षक म्हणजे ‘दिक्पाल’ म्हणून राहिले. याउलट वैदिक काळात गौण असलेले विष्णू आणि रुद्र (शिव) हे पुराणांचे केंद्रबिंदू झाले.

पौराणिक युगाने ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालनकर्ता) आणि महेश (संहारक) या ‘त्रिदेव’ संकल्पनेची स्थापना केली. वायू पुराणातील कथेनुसार प्रलयाच्या अंती विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्माची उत्पत्ती झाली आणि तिथे शिव प्रकट झाले; यातून सृष्टीच्या कारभाराचे कार्यविभाग स्पष्ट झाले. विष्णूच्या सत्त्वगुणाला प्राधान्य देऊन वैष्णव पुराणांनी त्याला परब्रह्म मानले, तर शैव पुराणांनी शिवाला परात्पर मानले.

समाजातील विविध उपासना पंथांमधील संघर्ष मिटवण्यासाठी पुराणांनी समन्वयाची भूमिका घेतली. त्यातून ‘पंचायतन’ (विष्णू, शिव, शक्ती, गणपती आणि सूर्य) ही सर्वसमावेशक उपासना पद्धत रूढ झाली. कर्मकांडाचा कठीण मार्ग मागे टाकून पुराणांनी ‘अवतारवाद’ आणि ‘भक्तिमार्ग’ पुढे आणला, ज्यामुळे देव मानवाच्या वैयक्तिक सुख-दुःखात सहभागी होणारा प्रेमळ सखा झाला.

लोकसंस्कृतीतील दैवते

हा दैवतविचार केवळ संस्कृत ग्रंथांपुरता सीमित न राहता कलियुगातील लोकसंस्कृतीपर्यंत झिरपला. महाराष्ट्राच्या दैवतरचनेकडे पाहिले तर हे संक्रमण स्पष्ट दिसते.पंढरपूरचा विठोबा पशुपालक समाजाचा रक्षक ‘वीर-गोपाळ’ देव, तर जेजुरीचा खंडोबा दख्खनच्या पठारावरील मेंढपाळ, कृषक आणि योद्ध्यांचा रक्षक देव किंवा म्हसोबा शेताच्या बांधावर शेंदूर लावलेला पाषाण म्हणून पूजला जाणारा हा देव कृषी संस्कृतीचे रक्षण करणारा महिष-देव अशी विविध रूपे शिव आणि विष्णूची रूपे म्हणून पुढे आली.

निष्कर्षाप्रती

बाह्य निसर्गशक्ती आणि अनेक देवतांच्या पूजेकडून उपनिषदांनी ‘एकोSहं बहुस्याम्|’ अशा एकाच अंतिम सत्याकडे— ‘ब्रह्मा’कडे झेप घेतली. अंतिम सत्य हे निर्गुण, निराकार आणि अव्यक्त असून त्याचे वर्णन केवळ ‘सत् चित् आनंद’ असेच करता येते. परंतु सामान्य मानवी बुद्धीला अमूर्त तत्त्वाची उपासना करणे सुलभ व्हावे म्हणून, जेव्हा तेच परब्रह्म त्रिगुणात्मक उपाधी धारण करते, तेव्हा त्याला ‘सगुण ईश्वर’ किंवा ‘देवता’ म्हटले गेले.

आदिम मानवाच्या निसर्गभयातून अंकुरलेली, ऋग्वेदाच्या काव्यात निसर्गशक्ती म्हणून विस्तारलेली, पुराणांमध्ये मानवी भावनांशी एकरूप होऊन भक्तीत सामावलेली आणि उपनिषदांच्या अद्वैत चिंतनात विश्वात्मक झालेली ‘देवता’ ही संकल्पना म्हणजे भारतीय मानवी प्रज्ञेच्या उत्क्रांतीचा एक अत्यंत चिंतनीय विषय आहे.

अन्य लेख

संबंधित लेख