आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, तसंच महाराष्ट्रातील बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले.
याबरोबरच रिजिजू यांनी पुण्यातील संगमवाडी येथील महान क्रांतीकारी लहुजी साळवे स्मारकाला भेट दिली, सामाजिक न्याय, सुधारणा आणि प्रगतीसाठी काम करणाऱ्या दूरदर्शी नेत्याला आदरांजली वाहिली. तसेच स्मारकाशी संबंधित कामाची पाहणी करण्यात आली. लहुजी साळवे यांचा आदर्श आपल्याला चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा देतात. त्यांचा वारसा आणि समाजाप्रती बांधिलकीचा सन्मान करणे आणि त्यांच्या कामाचा अभिमान बाळगणे हे भाग्याचे असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.