मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचा निर्धार व्यक्त करत पक्षाने ही महत्त्वपूर्ण रचना उभारली आहे. समितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि विनोद तावडे यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मुंबईकरांपर्यंत विकासाच्या मुद्द्यांवर पोहोचत जोरदार प्रचार मोहीम राबवण्याचे नियोजन तयार करण्यात येत आहे. भाजप महायुतीकडून आगामी निवडणुकीत जोरदार मोहीम उभारली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने सर्वाधिक संरचित आणि व्यापक योजना तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.