Wednesday, September 16, 2026

महाराष्ट्रात ₹२७,००० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारणार ग्रीनफिल्ड जहाजबांधणी क्लस्टर

Share

महाराष्ट्रातील सागरी उद्योगाला मोठी चालना देणारा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील दिघी येथे ‘ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग इंडस्ट्रियल क्लस्टर’ उभारण्यासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ आणि ‘नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या जहाजबांधणी क्षेत्राचा कायापालट होणार असून सुमारे ९० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
गुंतवणूक: सुमारे ₹२७,००० कोटींची भव्य गुंतवणूक प्रस्तावित.
उत्पादन क्षमता: दरवर्षी २० लाख ग्रॉस टन जहाजबांधणी क्षमता निर्माण होणार.
रोजगारनिर्मिती: १५,००० थेट आणि ७५,००० अप्रत्यक्ष असे एकंदरीत ९०,००० रोजगार उपलब्ध होणार.
स्थान: दिघी, जिल्हा रायगड.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सागरी अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या करारप्रसंगी बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन आणि एनशिपएमएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या बैठका

महाराष्ट्राला जहाजबांधणी आणि सागरी उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर नेण्यासाठी विविध जागतिक व स्थानिक उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली:

चौघुले शिपयार्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन चौघुले आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत राज्यातील जहाजबांधणी, शिपिंग क्षेत्रातील विकास आणि गुंतवणुकीच्या संधींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

जागतिक स्तरावर प्रगत सागरी तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलँड्सच्या ‘डामेन शिपयार्ड ग्रुप’च्या प्रतिनिधींसोबतही चर्चा पार पडली. नेदरलँड्सचे आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि अनुभव महाराष्ट्रात आणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगारनिर्मिती करण्यावर भर देण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख