प्रस्तावना
भारताचा सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि बौद्धिक वारसा हजारो वर्षांच्या प्रदीर्घ आणि अखंड परंपरेवर आधारलेला आहे. या ज्ञानपरंपरेचा एक महत्त्वाचा प्राथमिक स्रोत म्हणजे देशभरात विखुरलेली लाखो प्राचीन हस्तलिखिते आणि पोथ्या होत. छपाई तंत्रज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी, भारतातील ज्ञान हे ताडपत्र, भूर्जपत्र, कागद, कापड आणि धातूच्या पत्रांवर हाताने लिहून जतन केले जात असे. आज भारताकडे तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, वास्तुकला, राज्यशास्त्र आणि कला अशा विविध विषयांचा सखोल समावेश असलेल्या सुमारे सात कोटीहून अधिक हस्तलिखितांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. प्राचीन काळी हे ज्ञान मौखिक परंपरेने (श्रुती आणि स्मृती) एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असे, परंतु कालांतराने या ज्ञानाला चिरंतन स्वरूप देण्यासाठी हस्तलिखितांची निर्मिती सुरू झाली. मात्र, सेंद्रिय पदार्थांपासून बनलेली ही प्राचीन हस्तलिखिते काळाच्या ओघात,नैसर्गिक वातावरणातील बदल आणि योग्य वैज्ञानिक संवर्धनाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या विघटनापासून अमूल्य ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी डिजिटायझेशन हा एक शाश्वत उपाय आहे.
ज्ञान भारतम अभियान
या परिस्थितीची दखल घेत, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘भारत ज्ञान मंडपम’ (ज्ञान भारतम योजना) ही योजना सुरू केली आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील पुरातन हस्तलिखिते आणि पोथ्यांचे डिजिटायझेशन करून त्यांना एकाच छताखाली आणण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यासाठी ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वारसा केवळ जतन करणे नव्हे, तर तो जागतिक स्तरावरील संशोधकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि आगामी पिढ्यांसाठी मुक्तपणे उपलब्ध करून देणे, हे या मोहिमेचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.
या मोहिमेची पाच प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत.
- सर्वेक्षण आणि सूचीकरण, ज्याद्वारे राज्य ते तालुका पातळीवर हस्तलिखितांचा शोध घेऊन जिओटॅगिंग आणि ‘ज्ञान भारतम’ ॲपद्वारे नोंदणी केली जाईल.
- संवर्धन आणि क्षमता विकास, ज्यामध्ये ताडपत्र आणि भूर्जपत्रांसाठी संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करून १०० जिल्ह्यांत ‘पांडुलिपी मित्र’ स्वयंसेवकांचे जाळे निर्माण केले जाईल.
- तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन, ज्यामध्ये ‘नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी’ची स्थापना करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेनद्वारे सुरक्षित प्रत तयार केली जाईल.
- भाषाशास्त्र आणि भाषांतर, ज्याद्वारे ‘भारतीयजीपीटी’चा वापर करून प्राचीन लिपींचे उलगडणे व भाषांतर केले जाईल.
- संशोधन, प्रकाशन आणि प्रसार, ज्यातून शैक्षणिक मॉड्यूल्स आणि VR/AR तंत्रज्ञानाद्वारे हा वारसा जनतेपर्यंत पोहोचवला जाईल.
भांडारकर संस्थेचे नेतृत्व
या योजनेत देशाच्या पश्चिम विभागाची मुख्य जबाबदारी पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर’ सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये भांडारकर संस्थेच्या नेतृत्वाखाली एकूण चार संस्था एकत्रितपणे काम करत आहेत: स्वतः भांडारकर संस्था (मुख्य क्लस्टर सेंटर), आनंद आश्रम (पुणे),भारत इतिहास संशोधक मंडळ (पुणे), आणि कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक).
डिजिटायझेशन प्रक्रियेपूर्वी बाधित हस्तलिखितांवर सायट्रोनेला तेल, थायमॉल, किंवा पॅराडायक्लोरो बेंझिन वापरून त्यांचे ‘फ्युमिगेशन’ व संवर्धन करणे आवश्यक असते. अनेक ठिकाणी अक्षरे स्पष्ट दिसावीत म्हणून काजळी लावली जाते, मात्र या भौतिक मर्यादा आहेत. संशोधनातील अडथळे दूर करण्यासाठी या मोहिमेत ‘ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन’, ‘ज्ञान मित्रम एआय’ आणि ‘मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग’चा वापर केला जात आहे. मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगमुळे अंधुक किंवा काळी पडलेली पाने, तसेच पाण्यामुळे शाई पसरलेला मजकूर स्पष्ट दिसतो.
बायोपायरसीला आळा
पाश्चात्य देशांमधील बहुराष्ट्रीय औषध कंपन्या भारताच्या प्राचीन ग्रंथांमधील वनस्पती आणि कृषी तंत्रांवर पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर हे ज्ञान पूर्वीपासूनच अस्तित्वात असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पेटंट नाकारले जाते. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे, जगभरातील २६५ हून अधिक पेटंट अर्ज रद्द किंवा सुधारित करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे पारंपरिक ज्ञानाचे रक्षण होईल.
तसेच, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला आहे. गणितातील संकल्पना, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान आणि आयुर्वेद हे ज्ञान जोपर्यंत आधुनिक डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अशक्य आहे. डिजिटायझेशनमुळे ही प्राचीन माहिती ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’ (NDLI), ‘स्वयं’ (SWAYAM) आणि ‘दीक्षा’ (DIKSHA) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सशी जोडली जाईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही घरबसल्या आर्यभट्ट किंवा चरक यांच्या मूळ हस्तलिखितांचा अभ्यास करता येईल.
थोडक्यात
या मोहिमेपुढील एक मोठे आव्हान म्हणजे अनेक हस्तलिखिते खाजगी संग्रह, जुने वाडे, मंदिरे आणि मठांमध्ये आहेत. हस्तलिखिते सरकारला दिल्यास ‘अँटिक्विटी अँड आर्ट ट्रेझर्स ॲक्ट, १९७२’ अंतर्गत अशा प्रति सरकारकडून जप्त केल्या जाणार नाहीत. हस्तलिखितांच्या मूळ मालकांना हे आश्वासन देण्यासाठी ‘पांडुलिपी मित्र’ स्वयंसेवक संवाद साधत आहेत. धोरणानुसार, मालकाकडून दस्तऐवज जप्त न करता, त्यांना योग्य श्रेय देऊन केवळ डिजिटल प्रत घेतली जाते.
भौतिक ऱ्हास थांबवणे, ‘बायोपायरसी’पासून पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करणे आणि आधुनिक शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांपर्यंत प्राचीन ज्ञान पोहोचवण्याबरोबरच ‘नॉलेज इकॉनॉमी’चा पाया रचला जाऊ शकेल आणि आपला हा प्राचीन ठेवा खऱ्या अर्थाने जतन होईल.