आपलंही छोटं शेत असावं, घराच्या बाजुने फळांची, फुलांची आणि भाज्यांची रोपं असावीत असं अनेकांना वाटतं. आपल्या झाडांची फुलं तोडून देवाला वाहणे किंवा केसात माळणे, ताजी भाजी तोडून त्याची भाजी करणे किंवा झाडाची फळं तोडून खाणे यात जी मज्जा आहे ती इतर कशातच नाही. शहरात राहणाऱ्या आता मिलेनियल असलेल्या पिढीच्या काही जणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या लहानपणी या सगळ्याचा अनुभव घेतलेला असतो. पण आताच्या काळात शाळा, कॉलेज, ऑफीस, प्रवास, सोशल मीडिया या सगळ्या गदारोळात आपल्या दारातील झाडाचे काहीतरी तोडून खाण्याची मजा घेणे दुर्मिळच आहे. सुट्टीच्या काळात आजीच्या घरी अगदी क्वचित लोकांना हा अनुभव घेता येतो. नाहीच तर अग्रो टुरिझमच्या नावाखाली ट्रिपला जाऊन हा आनंद विकत घ्यावा लागतो.
गावाला जाताना रस्त्यातही आपल्याला आंबा, चिंच, केळी, फणस यांसारखी झाडे फळांनी लगडलेली दिसतात आणि ती फळं तोडून खाण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. असं एखादं झाड आपल्या अंगणात, टेरेसवर असावं असं अनेकांना वाटतं. पण शहरी गजबजाटात आणि स्क्वेअर फुटच्या मोजपट्टीत ते शक्य होतंच असं नाही. अगदी मोठमोठ्या फळांची नाही पण फुलांची, फळभाज्यांची रोपं तरी आपल्याला आपण राहतो त्या भागात नक्कीच लावता येतात. आपल्याला आवडणारी बाग कशी फुलवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्यासाठीचे काही सोपे पर्याय आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरात साधारणपणे तुळस, मोगरा, झेंडू, जास्वंद, गुलाब अशी काही ठराविक रोपं असतात. पण गार्डनिंगची आवड असेल तर या पलीकडे जाऊन कोणती रोपं आपण कशा पद्धतीने घरात, घराच्या आजुबाजूला लावू आणि वाढवू शकतो ते पाहूया.
1. अशा पिकवा भाज्या – मिरची, कडिपत्ता, कोथिंबीर, ओवा, टोमॅटो, मेथी, पालक, वांगी, लिंबू यांसारख्या काही भाज्यांची पिकं आपण घरच्या घरी अगदी सहज घेऊ शकतो. यातील काही रोपं कुंडीत येतात तर काही रोपांना थोडी मोठी कुंडी किंवा जागा लागण्याची शक्यता असते. टेरेस किंवा थोडी मोठी गॅलरी असेल तर ही पिकं सहज घेता येऊ शकतात.
2. सजावट – आवड आणि सवड असेल तर कमी जागा असेल तरीही घराची बाल्कनी, गच्ची किंवा अगदी खिडकीच्या पॅसेजमध्येही आपल्याला फुलांची आणि भाज्यांची रोपं लावता येऊ शकतात. त्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन मात्र करायला हवे. ही रोपं आपल्याला हवे ते तर देतातच पण घराच्या सजावटीमध्येही त्यांचा मोठा वाटा असतो.
3. सोसायटीतही करु शकता वृक्षारोपण – आपण राहत असलेली सोसायटी थोडी मोठी असेल तर त्याच्या बगिचामध्ये आपण सोसायटीच्या परवानगीने काही मोठ्या आकाराची झाडं नक्कीच लावू शकतो. यात फळांची, फुलांची किंवा इतरही अनेक झाडं लावता येतात. मात्र त्यासाठी पुढाकार घेऊन योग्य ते नियोजन करावे लागते.
4. इनडोअर प्लांटस – फुलं आणि इतर रोपांसोबतच सध्या बाजारात विविध रंगांची घराच्या आत लावता येतील अशी शोभेची इतरही रोपं अगदी सहज उपलब्ध असतात. इनडोअर प्लांटस म्हणून प्रसिद्ध असणारी ही रोपं घराला हिरवेपण तर बहाल करतातच पण घरातील ऑक्सिजन लेव्हल चांगली ठेवण्यासाठीही उपयुक्त असतात. घर सजवण्यासाठी या रोपांचा चांगला उपयोग होतो.
5. टेरेस असेल तर – हल्ली शहरातही रो हाऊसेस, बंगलो, प्रायव्हेट टेरेस किंवा सोसायटीची टेरेस अशा मोकळ्या जागा मिळू शकतात. याठिकाणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने हिरवळ करता येऊ शकते. विविध प्रकारच्या वेली, रोपं लावल्यास याठिकाणी पक्षी, फुलपाखरे यांचा अधिवासही नकळत तयार होतो आणि सहजगत्या शहरी वातावरणात नैसर्गिक हिरवळ तयार करता येऊ शकते.
6. मार्गदर्शन उपलब्ध – आजकाल सरकारतर्फे आणि खाजगी स्वरूपातही अशाप्रकारे होम गार्डनिंगचे क्लासेस घेतले जातात. त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती मिळू शकते. त्यामुळे आवड आणि सवड असेल तर शहरी भागातही आपण कुंडीतील रोपांपलीकडे घरगुती शेती किंवा होम गार्डनिंग नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो.
सायली जोशी-पटवर्धन