मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योग, नगरविकास, एमएमआरडीए, सिडको या विभागाने दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
दावोस येथून परत आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वांद्रे (पूर्व), मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री म्हणाले की, मागील दोन वर्षात साडेसात लाख कोटी सामंजस्य करार झाले होते. यात पहिल्या वर्षी एक लाख 37 हजार कोटी तर दुसऱ्या वर्षी तीन लाख 70 हजार कोटींचे करार करण्यात आले होते. उद्योजकांना जर वेळेत परवानग्या दिल्या, जागा उपलब्ध करून दिली तर उद्योजक गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्यास तयार असतात. रत्नागिरीमध्ये पुढील दोन चार महिन्यामध्ये कोकाकोलाचे उत्पादन सुरू होत असून पुण्यातही महिंद्रा आणि महिंद्रा प्रकल्प सुरू होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळजवळ 35 हजार कोटीचे प्रकल्प हे रत्नागिरीमध्ये येत असून त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचा एक प्रकल्प 20 हजार युवा युवतीला रोजगार मिळवून देणारा आहे. धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर हे अंदाजे दहा ते 14 हजार कोटीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये येत असून याद्वारे अनेक लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी आणलेला मैत्री कायदा हा उद्योजकासाठींचा पहिला पारदर्शक कायदा हा महाराष्ट्रामध्ये झाला आहे. आता मैत्री पोर्टलमध्ये आम्ही सुधारणा करीत असून यात एखाद्या अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज किती दिवस थांबलेला आहे आणि तो अर्ज का थांबलेला आहे, याची उत्तर देखील अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. उद्योजकांना सोयी सुविधा निर्माण केल्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी गुंतवणूक येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.