वयात आल्यावर आपल्या विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. साधारणत: शाळा संपत असताना म्हणजेच ९-१० वीच्या वयात या गोष्टींचे भान यायला लागते असे म्हणतात. हल्ली ते वय आणखी कमी झाले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. ठराविक वयानंतर स्वत:ची, शरीराची, भावनांची पुरेशी ओळख झालेली असते आणि अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळीक वाढायला लागते. अशावेळीच अभ्यास, करियर, घरातील इतर ताणतणाव यांच्याशी सामना करत असताना अनेकदा कोणीतरी आपल्या जवळचे हवे असे वाटायला लागते. मित्रमैत्रीणींसोबत आपल्या हक्काची आपली अशी व्यक्ती आयुष्यात असावी असे वाटते आणि मग नकळत सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी, मित्रमैत्रीणींशी जवळीक वाढते.
मानवी नाते, गुंतागुंतीचे स्वभाव, सामाजिक मर्यादा यामुळे अनेकदा आपण ज्याच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतो त्याच्यासोबत आपले आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळतातच असे नाही. अशावेळी एकाशी पटले नाही तर दुसरा किंवा हा नाही तर तो असा सध्याचा ट्रेंड आहे. इतकेच काय तर नात्यामध्ये ब्रेक घेणे, ब्रेक अप सेलिब्रेट करणे या संकल्पनाही जोर धरु लागल्या आहेत. त्यातूनच इन्स्टंट रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या अनेक नव्या संकल्पना रुढ होत आहेत. मात्र आपल्या पालकांचे नातेसंबंध, समाजातील इतरांचे नातेसंबंध पाहून काहीवेळा नातेच नको किंवा जोडीदारच नको अशा टोकाच्या निर्णयापर्यंतही काही तरुण-तरुणी पोहोचताना दिसत आहेत. तर जबाबदारी नको, स्वातंत्र्य हवे या कारणापोटीही जोडीदार नको हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामागे व्यक्तीपरत्वे बरीच कारणे असली तरी त्यातल्या काही कारणांचा आपण या निमित्ताने आढावा घेऊया.
१. नात्यातील तणाव- आयुष्यात आलेल्या पहिल्या वहिल्या नात्यात किंवा लग्नानंतर काही कारणाने नाते टिकू न शकल्यास तणाव निर्माण होतो. हा तणाव सहन होण्याच्या पलिकडे आहे असे वाटते. मग आधीच एका नात्यात पोळून निघालेला व्यक्ती भविष्यात जोडीदार आणि नातेच नको असा विचार करतो.
२. नातेसंबंधाविषयी मनात असलेल्या संकल्पना – काहीवेळा आपले आईवडील किंवा कुटुंबातील इतर जवळच्या व्यक्तींमध्ये नात्यात तणाव असतो. असे नाते दिर्घकाळ पाहिल्याने नात्यावरचा विश्वास उडतो. अशावेळी असे नाते असण्यापेक्षा ते नसलेलेच बरे असे वाटूनही अनेक जण जोडीदार, लग्न किंवा सोबतच नको या निर्णयापर्यंत पोहोचतात.
३. बंधने नको – जोडीदार असेल तर आपली मोकळीक जाईल, आपल्यावर वेगवेगळ्या गोष्टींची बंधने येतील. असे वाटल्याने हल्ली अनेकदा जोडीदारापेक्षा आपण एकटेच राहिलेले चांगले असे काहींना वाटत आहे. मी कोणालाच कसलेही उत्तर द्यायला बांधील का असावे या विचारांती नातेच नको असेही अनेकांचे मत आहे. आता ते चूक की बरोबर हा आणखी वेगळा आणि मोठा मुद्दा आहे.
४. जबाबदारी घेण्याची तयारी नसणे – जोडीदार असेल किंवा लग्न करायचे असेल तर जबाबदारी घ्यावी लागते. पण नात्यासोबत येणाऱ्या अर्थिक, शारीरिक, मानसिक गोष्टींचा किंवा जबाबदारीचा ताणच नको असे वाटल्यानेही अनेकजण या गोष्टीकडे संकट म्हणून पाहतात. मग जोडीदारच नको या निष्कर्षापर्यंत पोहोचतात.
५. अवलंबून नसणे – बरेचदा एखादी व्यक्ती स्वत:ला सगळ्या अर्थाने परीपूर्ण किंवा सक्षम समजत असते. आर्थिक, शारीरिक, मानसिकरित्या आपण खंबीर आहोत. आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याने घेऊ शकतो तर सोबत कशाला हवी असाही विचार हल्ली काही जण करताना दिसतात.
आता हे सगळे मुद्दे व्यक्तीपरत्त्वे वेगवेगळे असतात. असे असले तरी जोडीदार नसल्याने समाजात एकट्या राहणाऱ्या व्यक्तींना विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कदाचित वय हातात आहे तोपर्यंत त्यांना असे वाटत नाही. मात्र एकदा वय वाढायला लागले की एकटे राहणे किती अवघड आहे याची जाणीव व्हायला लागते. पण तेव्हा मात्र हातातून वेळ निघून गेलेली असते. आजही आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी एकट्या राहणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांच्या कौटुंबिक, सामाजिक, अर्थिक, शारीरिक, मानसिक अशा कितीतरी अडचणी पाहायला मिळतात. तो एक स्वतंत्र विषय असून त्यावरही आपण पुन्हा कधीतरी बोलूया…
– सायली जोशी पटवर्धन