Wednesday, October 7, 2026

इस्लाममध्ये जन्म हिंदूंमध्ये कर्म

Share

एखादी व्यक्ती आपला धर्म, कुटुंब आणि ओळख मागे टाकून नव्या आयुष्यात पाऊल ठेवते, तेव्हा तिला आधाराची सर्वाधिक गरज असते. तो आधार कोण देतं, यावरून तिचा पुढचा प्रवास ठरतो. महाराष्ट्रातल्या एका तेली मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नाझमा बानो या तरुणीची कथा याच प्रश्नाभोवती फिरते. आज ती “लव जिहाद” या विषयावर काम करते. त्या कामाचा पाया तिच्या स्वतःच्या अनुभवात आहे.

वयाच्या १६ व्या वर्षी ती आणि तिच्या समोरच राहणारा एक हिंदू तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी पळून जाऊन लग्न केले आणि तिने हिंदू धर्म स्वीकारला. माहेरच्या भीतीमुळे नंतरचं वर्षभर दोघांना लपूनछपून राहावं लागलं. पुढे ते नवऱ्याच्या मूळ घरी परतले, पण तिथेही तिचा स्वीकार म्हणावा तितका नीट झाला नाही. मतभेद वाढले आणि काही काळाने त्या दोघांचा घटस्फोट झाला.
हा नकार दुहेरी होता. एका बाजूला माहेरचा भीतीदायक विरोध आणि दुसऱ्या बाजूला सासरहून झालेला अस्वीकार! ज्या नात्यासाठी तिने सर्व काही सोडलं, तेही टिकलं नाही. अशा वेळी एकटं पडल्याची भावना किती तीव्र असते, याची कल्पना करता येते.

आधार देणारे हात

ती सांगते, या कठीण काळात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तिच्या पाठीशी उभे राहिले. सुरुवातीलाही लग्न, पोलिस आणि वकिली अशा सगळ्या प्रक्रियांमध्ये तिच्या नवऱ्याच्या मित्राने खूप मदत केली होती. तो मित्र विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होत. लग्नानंतरही, “घरात बसून राहू नकोस, काहीतरी काम कर,” असं म्हणत त्यांनी तिला सामाजिक कामात सहभागी करून घेतलं. त्यानिमित्ताने विविध लोकांच्या ओळखी होत गेल्या. दुर्गावाहिनी या संघटनेची शिबिरे तिने पूर्ण केली.
तिच्या दृष्टीने या साऱ्यांच्या मदतीचं मोल मोठं आहे, कारण जी मदत तिला त्या क्षणी इतर कुठूनही मिळाली नव्हती, ती या कार्यकर्त्यांच्या रूपाने मिळाली होती. त्यांची घरे ही तिची हक्काची घरे झाली होती. तिच्या प्रत्येक अडीअडचणीला या सागळ्यांनी तिला खूप मदत केली आणि ती ही अगदी नि:स्पृहपणे! लहान असताना नकळत का होईना, दंगलींमध्ये आपण ज्या धर्माच्या लोकांवर फेकण्यासाठी पेट्रोल आणि रॉकेलचे दिवे भरून दिले त्या धर्मातली लोकं इतक्या सहजपणे आपल्याला स्वीकारतील अशी तिची कल्पना नव्हती. ज्या विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना इस्लामी आपला कट्टर शत्रू मानतात त्यांच्याकडून इतकी माणुसकीची वागणूक आणि भक्कम आधार मिळाल्यामुळे ती सुखावून गेली. त्यामुळे आधार आणि कृतज्ञता यातून कार्यकर्त्यांच्या विचारविश्वाशी तिचं जोडलं जाणं स्वाभाविक होतं.

अनुभवातून उभं राहिलेलं काम

सामाजिक कामात सहभागी होण्याच्या टप्प्यावर तिची “लव जिहाद” या विषयाशी ओळख झाली. सुरुवातीला हे काम म्हणजे अडचणीत सापडलेल्या मुलींशी संवाद साधणं एवढंच होतं. मुस्लिम समाजात मुलगी म्हणून जगताना आलेले स्वतःचे अनुभव ती त्यांना सांगते आणि त्यांना पुढचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू या कामाची गरज तिला अधिक तीव्रतेने वाटू लागली आणि ते तिचं कायमचं कार्य झालं.

तिच्या सांगण्यानुसार, तिने आतापर्यंत सुमारे ४००-४५० मुलींचं समुपदेशन केलं आहे. घरवापसी झालेल्या पाच मुलींना त्यांच्या घरांनी नाकरलं; तेव्हा त्यांना स्वतःच्या घरात ठेवून घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करत, पुढे चांगली मुलं पाहून त्यांचं लग्न देखील लावून दिलं आहे, त्यांचं पुनर्वसन केलं आहे. जन्माने मुस्लिम असलेल्या लग्नानंतर आणि हिंदू झालेल्या मुलींची ती नंतरही काळजी घेते. त्यांचा त्यांच्या सासरी संवाद आहे का आणि त्यांना त्रास होत नाही ना, हे ती पाहते. कारण अशी लग्ने झाल्यावर होणारी घुसमट आणि येणारं एकटेपण तिने अनुभवलं आहे. त्यामुळे अशा धर्म बदलून हिंदू झालेल्या मुलींसाठी ती हक्काचा निवारा होते. त्यांना धीर देते. त्यांना आधार देते. या कामासाठी ती कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नाही. तिचा स्वतःचा एक व्यवसाय आहे आणि त्यातून होणाऱ्या कमाईवरच ती आपला चरितार्थ आणि हे काम करत असते.

लव्ह जिहाद विषयीची तिची भूमिका: धर्माची ओळख

ती हे का करते, या प्रश्नाचं तिचं उत्तर दोन भागांत मांडता येतं. पहिला भाग असा, की तिच्या मते, हिंदू धर्मात स्त्रीला जे स्थान आणि स्वातंत्र्य आहे ते इतरत्र नाही. इस्लाममध्ये स्त्रीला पुरेसा आदर मिळत नाही आणि धर्मप्रसारावर अतिरिक्त भर दिला जातो, असा तिचा दावा आहे.
ती सांगते की काही वेळा मुस्लिम मुलींनाही हिंदू मैत्रिणींवर प्रभाव टाकण्यासाठी तयार केलं जातं. एक उदाहरण ती देते. मुस्लिम मैत्रीण विचारते, “तुमच्या धर्मात किती देव आहेत?” उत्तर येतं, “३३ कोटी.” त्यावर ती म्हणते, “मग संकट आलं तर कोणाला हाक मारशील? आमच्याकडे एकच देव आहे, गोंधळ नाही.” अशा संवादांतून मैत्रिणीचा विचार हळूहळू बदलत जातो, असं तिचं निरीक्षण आहे. याशिवाय मुलींना वश करून घेण्यासाठी त्यांना काळा धागा बंधने, पाणी किंवा खाद्य पदार्थ यातून त्यांना मंतरलेले पदार्थ पाजणे किंवा अत्तर हुंगायला लावून त्यामार्फत वंश करून घेणे असे प्रकार देखील सर्रास केले जातात असे तिने सांगितले. आजच्या आधुनिक युगात या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी तिने या गोष्टी घडताना प्रत्यक्ष पहिल्या आहेत.

तिचं आत्मपरीक्षण: “आपण कमी पडतो”

दुसरा भाग आत्मपरीक्षणाचा आहे आणि तोच अधिक लक्षवेधी आहे. ही कार्यकर्ती आपलं काम “विरोधी” म्हणून मांडत नाही, तर “आपलं काय चुकतं” या प्रश्नापासून सुरू करते. तिच्याशी बोलताना सर्वात ठळकपणे जाणवतो तो हा आत्मपरीक्षणाचा सूर.
तिच्या मते, “लव जिहाद” घडतो याचं कारण फक्त मुस्लिम मुलं कट्टर असतात एवढंच नाही. मुस्लीम कट्टर असतातच, पण खरी अडचण हिंदू घरांत आहे, असं ती म्हणते. हिंदू घरांत धर्म रुजवला जातो, पण तितक्या ठामपणे आणि गंभीरपणे ते केलं जात नाही. सण, उपास आणि रीतिरिवाज पाळले जातात, पण त्यामागचा अर्थ, मूल्यं आणि विचार मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. हिंदू धर्मात स्त्रीला मान आणि स्वातंत्र्य आहे, असं तिचं ठाम मत आहे. पण हे आपल्या मुलींना कोणी समजावून सांगतच नसेल, तर त्यांना ते कळणार कसं, असा तिचा प्रश्न आहे. आपल्या धर्माविषयीची अपुरी माहिती मुलींना दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडते, असं ती सांगते.


इथे तिचं एक निरीक्षण लक्षात घेण्याजोगं आहे. तिने दिलेल्या “३३ कोटी देव” या संवादात खरा मुद्दा धर्मांमधला फरक हा नाही. मुलीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही, हा आहे. आपल्या परंपरेबद्दल विचारलेल्या साध्या प्रश्नाला मुलगी आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा समोरच्याचं म्हणणं तिला पटकन खरं वाटू लागतं, असं तिला दिसतं. म्हणूनच बंदी किंवा धाक घालण्यापेक्षा, या वायतील मुलामुलींशी सर्व विषयांवर विशेषत: धर्म आणि परंपरा याबाबतीत संवाद असावा अशी तिची धारणा आहे.
ती वारंवार घरातल्या संवादाकडे बोट दाखवते. मुलांना प्रश्न विचारायला मोकळीक आहे का, घरात धर्मावर मोकळेपणाने बोललं जातं का, मुलींना त्यांचं मत मांडू दिलं जातं का, असे प्रश्न ती उपस्थित करते. हे सगळं तिच्या स्वतःच्या अनुभवातून येतं. मुस्लीम असताना स्त्री म्हणून मी आपल्याच घरात आपण सुरक्षित नव्हते, पण लग्न होऊन हिंदू झाल्यावर त्या धर्मात नेहमीच आदर आणि मानसन्मान मिळाला. कोणीही वाईट नजरेने पाहिलं नाही, हा तिचा अनुभव आहे. ही सुरक्षितता आणि सन्मान हा संस्कारांचा परिणाम आहे, असं ती मानते. मग हेच संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी का पडतो, असा तिचा सवाल आहे.


ती हे सगळं तक्रारीच्या सुरात नव्हे, तर तळमळीने सांगत असते. ती कळकळ तिच्या आवाजातूनही आपल्यापर्यंत पोहोचत असते. तिच्या दृष्टीने हे काम फक्त मुलींना धर्मांतरणापासून परावृत्त करण्याचं नाही. समाजाने आपल्या घरापासून याकडे पाहावं, असा तिचा आग्रह आहे.
तिच्या मनात हिंदू धर्माविषयी इतकी तळमळ का निर्माण झाली?

श्रद्धेचा आधार

“माझा जन्म इस्लाममध्ये झाला, पण मृत्यू हिंदू म्हणूनच येईल,” असं ती ठामपणे म्हणते. ती महादेवाची निस्सीम भक्त आहे आणि नवरात्रीत शक्तीसाधनेसाठी उपास करते. इतकी श्रद्धा तिच्या ठायी कुठून निर्माण झाली? या श्रद्धेमागची एक आठवण ती सांगते. लग्नानंतर लगेचच काही कार्यकर्त्यांसोबत ती आणि तिचा नवरा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला गेले होते. तिथे वाटेत एका श्रीगणेशाच्या मंदिरात थांबले असताना तिला आरतीचा मान देण्यात आला. “या धर्माने मला किती सहजपणे आपलंसं केलं,” ही भावना तिच्या मनात कायमची कोरली गेली.
ती सांगते की इथे कोणीही माझ्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून वाईट नजरेने पाहिलं नाही, पूर्वी मात्र स्वतःच्या घरातही आपण सुरक्षित नव्हतो. हे हिंदू धर्माचे संस्कार आहेत असं ती मानते. इतकंच काय पण ज्या नवऱ्याशी तिचं पटलं नाही, त्यानेदेखील ‘ही आपल्यावरच्या प्रेमाखातर आणि विश्वासाखटर आपला धर्म सोडून आली होती’ याची जाणीव ठेवत वेगळे होताना त्याचं राहतं घर हिच्या नावावर करून दिल, आणि सन्मानाने तिला जाऊ दिलं. स्त्रीचा आदर करण्याची ही भावना हिंदू धर्मात अशी रुजली आहे. अन्य धर्मातल्या माणसालाही आपलंसं करून घेण्याची ही वृत्ती तिने प्रत्यक्ष अनुभवली, आणि म्हणूनच आता इतर कोणत्याही धर्मात मृत्यू नको, ही तिची धारणा आहे. ही तिची वैयक्तिक अनुभवगाथा आहे.
या कथेतला मूळ प्रश्न धर्मांच्या तुलनेपलीकडचा आहे. संकटात सापडलेल्या स्त्रीला आधार कोण देतो, आणि तो आधार तिला कोणत्या दिशेने नेतो? ही विचार करण्याची गोष्ट आहे, या कार्यकर्तीला आधार मिळाला आणि तिने त्यातून आपलं जीवनकार्य घडवलं. तिचं म्हणणं शेवटी साधं आहे: घरातला संवाद, मुलांना मिळणारी ओळख आणि अडचणीच्या वेळी मिळणारी साथ यावरच पुढचं सगळं अवलंबून असतं.


त्याचबरोबर समाजाने जागृत होत तिच्या या कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. बळी पडलेल्या मुलींना वाचवण्याबरोबरच सामाजिक जागृती निर्माण करत अधिकाधिक मुलींना या धोक्याची जाणीव करून देत, त्यांना सुरक्षित करण्याची आणि हिंमतीने आल्या प्रसंगाला तोंड देण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे. अॅड. प्रीती राऊत यांची तिला या कार्यात साथ आहे. आपण अधिकाधिक संख्येने या कार्यात दुहेरी पद्धतीने आणि अधिकाधिक संख्येने सहाभागी होणे आवश्यक आहे.

अन्य लेख

संबंधित लेख