महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आज टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिला प्रवाशांची सुरक्षितता, सन्मान आणि स्तनदा मातांना मदत करण्याच्या उद्देशाने ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.या उपक्रमांतर्गत, संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांवर १२५ हिरकणी कक्ष उभारण्यासाठी सहकार्य करणार आहे.
महाराष्ट्राची जीवन वाहिनी मानली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ही राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक पाठीचा कणा आहे. ग्रामीण भागापासून ते मेट्रो शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना आपल्या सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाने नुकताच एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, माननीय परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक आणि TKM चे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
माननीय परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक म्हणाले, “शासकीय आणि खासगी क्षेत्रातील सहकार्यातून नागरिकांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिरकणी कक्ष’ प्रकल्प आहे. हा उपक्रम महिला प्रवाशांचे कल्याण आणि सन्मान जपणाऱ्या सेवा पुरवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळ देतो. भारतातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांसाठी हा एक नवीन आदर्श निर्माण करेल.”
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करताना स्तनदा मातांना ज्या असहाय्यता आणि मानसिक संकोचाला सामोरे जावे लागते, त्याची जाणीव या प्रकल्पाच्या मुळाशी आहे. हे कक्ष प्री-फॅब्रिकेटेड खोल्या, बसण्याची सोय, फीडिंग टेबल, बाळांचे डायपर बदलण्याचे स्टेशन, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन्स आणि पुरेशा व्हेंटिलेशन सुविधांनी सुसज्ज असतील. या उपक्रमाचा दरवर्षी सुमारे ४.५० लाख महिला प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा असून, सार्वजनिक वाहतूक केंद्रांवरील महिला-स्नेही सुविधांची मोठी गरज यातून पूर्ण होईल. बाळाला वेळेवर स्तनपान देणे ही नैसर्गिक गरज असतानाही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि खाजगी जागेअभावी महिलांची होणारी घुसमट अत्यंत क्लेशदायक असते. या पार्श्वभूमीवर, ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड, आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ ‘हिरकणी कक्ष’ उभे राहणे हे महिला प्रवाशांच्या दृष्टीने एक दिलासादायक पाऊल ठरणार आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP ) आणि CSR फ़ंडाचा सुवर्ण मिलाफ
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे आर्थिक आणि व्यवस्थापकीय प्रारूप. हा संपूर्ण प्रकल्प टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून राबविला जात आहे. महामंडळावर कोणताही थेट भांडवली खर्च न पाडता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.
| प्रकल्पाची प्रमुख भाग | तपशील |
| वित्तीय प्रारूप | १००% टोयोटा किर्लोस्कर CSR निधी (MSRTC ला शून्य भांडवली खर्च) |
| प्रकल्पाचा आकार | १२५ प्री-फॅब्रिकेटेड हिरकणी कक्ष (Lactation Pods) |
| जागेचे नियोजन | MSRTC कडून प्रति कक्ष ५ मी × ५ मी (25 sq.m) जागा |
| अमलबजावणी टप्पे | २०२६-२७ (५० कक्ष), २०२७-२८ (५० कक्ष), २०२८-२९ (२५ कक्ष) |
| अंदाजित लाभार्थी | वार्षिक सुमारे ४.५० लाख स्तनदा माता व बालके |
फडणवीस सरकारच्या प्रयत्नातून ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी विविध योजना सरकार प्रयत्न पूर्वक करत आहे. त्याच प्रयत्नांमधला हा महत्वाचा भाग म्हणून पहायला हवा. खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्थांचा सामाजिक निधी आणि शासकीय संस्थांची पायाभूत जागा व नेटवर्क यांचा असा एकत्रित मेळ बसल्यास, सामाजिक हिताचे मोठे प्रकल्प कसे प्रत्यक्षात आणता येतात, हे या सामंजस्य कराराने सिद्ध केले आहे.
महिला सक्षमीकरण
एसटीच्या दररोजच्या ५५ ते ६० लाख प्रवाशांपैकी तब्बल ३५% ते ४५% (सुमारे १७.३ लाख) महिला प्रवासी असतात. तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात, ज्यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असते. अशा ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी हिरकणी कक्ष उपलब्ध असणे म्हणजे मातृत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव करणे होय.
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDG Goal 3 & 5) बालकांच्या सुरुवातीच्या ६ महिन्यांतील अखंड स्तनपानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिरकणी कक्षांमुळे प्रवासा दरम्यान स्तनपानात येणारे अडथळे दूर होतील. जेव्हा सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित आणि महिला-स्नेही बनतात, तेव्हा महिलांचा घराबाहेर पडण्याचा आणि प्रवासाचा आत्मविश्वास वाढतो. हा निर्णय अप्रत्यक्षपणे महिलांच्या सामाजिक व आर्थिक गतिशीलतेला पाठबळ देणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा करार, राज्य सरकारची महिलांप्रती संवेदनशील धोरणांकडे असलेली राजकीय इच्छाशक्ती दर्शवतो.