डिजिटल युगात मोबाईलचे वाढते व्यसन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि मोबाईल खेळांचे (Online Gaming) आकर्षण यामुळे शालेय शिक्षण व विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र, या आव्हानावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शाळा आणि शिक्षण संस्था पुढे येत असून, शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी नवनवीन, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
शिक्षकांच ‘ मोबाईल फ्री ‘ अध्यापन
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १६ शिक्षकांनी सकाळी १० ते ४ या वेळेत आपले मोबाईल फोन मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.या उपक्रमामुळे वर्गातील अध्यापनाची गुणवत्ता वाढली असून शिक्षकांची मनःशांती व वाचन संस्कृती जपली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्रशासनाने या प्रयोगाचे स्वागत करत इतर शाळांनाही याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षणाचे ऑनलाईन स्वरूप कोरोना काळानंतरही सुरू राहिल्याने लहान मुलांच्या हातात मोबाईल असणे अनिवार्य झाले होते. यावर पर्याय म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेने शाळांमध्ये व्हॉट्सॲप किंवा मोबाईलवर अभ्यास (गृहपाठ) देण्यावर पूर्ण बंदी घातली आहे.
शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीने वही-पुस्तकात अभ्यास द्यावा आणि विद्यार्थ्यांकडून पाढे, उजळणी व पाठांतर करून घ्यावे, असा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होण्यास मोठी मदत होत आहे.
प्राचीन भारतीय खेळांचे पुनरुज्जीवन
मोबाईल गेमिंगच्या जाळ्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मैदानी व बौद्धिक खेळांकडे वळवण्यासाठी विरार येथील एन. जी. वर्तक हायस्कूलमध्ये ‘किल्ले वसई मोहीम परिवार’तर्फे अनोखी कार्यशाळा घेण्यात आली.
यात इयत्ता ५ वीच्या २८० विद्यार्थ्यांनी शराव्यूह, नवकंकरी, अष्टचामा, चक्रव्यूह आणि वाघबकरी यांसारख्या प्राचीन भारतीय खेळांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या पारंपरिक खेळांमुळे मुलांमधील रणनीती आखण्याची क्षमता (Strategic Thinking), एकाग्रता आणि निरीक्षण शक्ती, सांस्कृतिक वारशाची ओळख वाढीस मदत होते
गावोगावी ‘अभ्यासाचा भोंगा’ आणि नो-स्क्रीन अवर
मुलांचा रात्रीचा वेळ मोबाईल व टीव्हीच्या स्क्रीनसमोर जाण्याऐवजी अभ्यासात जावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तळवाडे गावामध्ये ग्रामपंचायतीतर्फे दररोज रात्री साडेसात वाजता ‘ अभ्यासाचा भोंगा ‘ वाजवला जातो. भोंगा वाजताच गावातील सर्व मुले मोबाईल-टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात. या उपक्रमाला पालकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.
स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाढणारी चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी केवळ नियम लादण्याऐवजी अशा रचनात्मक उपायांची (Constructive Alternatives) गरज आहे. शिक्षकांचा आदर्श, पारंपरिक खेळांची साथ, ऑफलाईन गृहपाठ आणि गावकऱ्यांचा सहभाग या चतुःसूत्रीमुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये घडणारा हा बदल एका उज्ज्वल आणि निरामय शैक्षणिक भविष्याची नांदी ठरत आहे.