भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे ६५ वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाने एका चिमुकलीवर केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे आपल्या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे जळजळीत वास्तव आपल्यासमोर आले आहे. या घटनेने संतापलेल्या हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा आली हा भाग अलाहिदा आहे. या घटनेचे विश्लेषण करताना जे सामाजिक पैलू प्रामुख्याने समोर येतात, ते ‘प्रगत’ मानल्या जाणाऱ्या समाजासाठी शरमेची बाब आहेत.
भारतीय संस्कृतीत वय आणि नाती याला विशेष स्थान आहे. एखाद्या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीकडे आधार, अनुभवी मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये ‘रक्षक आणि रक्षित’ असे पवित्र नाते अपेक्षित असते. भीमराव कांबळेने या विश्वासाचा क्रूरपणे खून केला आहे. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो, तेव्हा समाजातील ‘ममत्व’ आणि ‘बंधुभावाचा’ मूळ पायाच ढासळतो. या एका घटनेमुळे शेकडो सुरक्षित नात्यांवर संशयाची सावली पडली असून, पालकांमध्ये कमालीची असुरक्षितता निर्माण झाली आहे.
नात्यातील यांत्रिकता
आजचा माणूस तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला असला तरी मनाने तो पशू पेक्षा हिडीस’ झाला आहे का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो. सकाळी कामावर जाणे आणि रात्री परतणे, या धकाधकीच्या यांत्रिक जीवनात आपल्या शेजारी एखादा ‘राक्षस’ पोसला जातोय, याची साधी पुसटशी कल्पनाही आपल्याला नसते. आपली ही संवेदनशून्यता अशा नराधमांच्या विकृतीस पोषक ठरते. जेव्हा आपण आजूबाजूला घडणाऱ्या दुर्लक्ष करतो, तेव्हा नकळतपणे अशा प्रवृत्तींना आश्रय मिळत असतो.
“कांबळे याच्यावर १९९८ मध्ये पहिल्यांदा अल्पवयीन मुलीवरील विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु नंतर त्या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली. २०१५ मध्ये कांबळेच्या नातेवाइकांपैकी एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. आम्ही या दोन्ही जुन्या प्रकरणांचा आढावा घेणार आहोत,” असे पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले. तपास यंत्रणेचे कार्य आणि न्यायालयीन प्रक्रियेतला फोलपणा इथे प्रकर्षाने समोर येतो.
भीमराव कांबळे सारखी विकृत प्रवृत्ती इतकी वर्षे समाजात उजळ माथ्याने फिरत होती, हे आपल्या सामाजिक सजगतेचे मोठे अपयश आहे. पोलीस प्रशासन केवळ घटना घडल्यानंतर सक्रिय होते, परंतु समाजात वावरणाऱ्या ‘सायलेंट’ गुन्हेगारांना ओळखण्याची यंत्रणा समाजातच असायला हवी. आपण अशा व्यक्तीला ‘विचित्र’ म्हणून सोडून देतो किंवा त्याच्या हिंसेला ‘खाजगी’ मानतो, हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक सुरक्षा केवळ पोलिसांच्या लाठीत नसून ती लोकांच्या वागणुकीत आणि नैतिक दबावात असते.
वैयक्तिक वेदनेकडून सामूहिक शक्तीकडे
नरसापूरची ही घटना केवळ एका कुटुंबाची वैयक्तिक वेदना नाही, तर ती संपूर्ण समाजाची ‘सामूहिक जखम’ आहे. जोपर्यंत आपण अशा घटनांना “त्या एका कुटुंबाची समस्या” समजत राहू, तोपर्यंत गुन्हेगारांचे धाडस वाढत राहील. ज्या क्षणी ही आपली ‘सामूहिक वेदना’ बनेल, त्याच क्षणी समाजाची संवेदनशीलता जागी होईल. जिथे सर्वात दुर्बल घटकांचे, म्हणजेच लहान मुले आणि स्त्रियांचे रक्षण करण्याची जबाबदारी संपूर्ण समाज घेतो तोच समाज प्रगत असतो.
ही समस्या केवळ एका प्रकरणातील आरोपीला फासावर लटकावून सुटणार नाही. ज्या मानसिकतेतून हा गुन्हा घडला, त्या मानसिकतेचा बिमोड करण्यासाठी सामाजिक शिक्षण आणि संस्कारांची नवी चळवळ उभी करणे गरजेचे आहे. आपल्याला पुन्हा एकदा ‘माणुसकी’ केंद्रस्थानी आणावी लागेल.
- सुरक्षा हा हक्क आहे: आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, कोणाची मेहेरबानी नाही.
- त्वरित न्यायाची गरज: कायद्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते, त्यामुळे अशा प्रकरणांत ‘त्वरित न्याय’ मिळणे आवश्यक आहे.
अखेर, संवेदनशीलता ही केवळ शब्दांत नसून ती कृतीतून दिसली पाहिजे. आता वेळ आली आहे की आपण आपली ‘सामूहिक वेदना’ ही ‘सामूहिक शक्ती’मध्ये रूपांतरित करावी. अन्यथा, हा समाज केवळ जनावरांचा एक कळप ठरेल जो स्वतःच्या विनाशाची वाट पाहत आहे.
– अपरांत कांबळे