Tuesday, May 5, 2026

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू “मार्टिन ल्यूथर” – भाग ४

Share

विटेनबर्गच्या ऑल सेंट चर्चच्या दारावर तेथील बिशपना उद्देशून मार्टिन ल्यूथरने आपल्या सूचनावजा मागण्या खिळा ठोकून लावल्या होत्या त्यास तेथील बिशपनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण, ते निबंध thesis रोमला पाठवून दिले. पोप लिओ दहावा याने विविध धर्मपंडितांना मार्टिन ल्यूथरचा प्रतिवाद करण्यास सांगितले. पोपनी मार्टिनला रोमला येण्यास फर्मावले. ऑक्टोबर १५१८ मध्ये सलग तीन दिवस मार्टिन ल्यूथर स्वतःची बाजू मांडत होता. “पोप हा पवित्र धर्मग्रंथाहून श्रेष्ठ असू शकत नाही. मार्टिन हा पोपचा शत्रू आहे असा आरोप ठेऊन त्यास अटक करण्यापूर्वीच मार्टिन शहरातून निसटला. १५१९ मध्ये त्याने असे मांडले Matthew 16:18  नुसार पोपला पवित्र धर्मग्रंथाचा अर्थ लावण्याचा विशेषाधिकार दिलेला नाही. त्यामुळे पोप किंवा चर्चची कौन्सिल अचूक असू शकत नाही. यावर तेथे उपस्थित असलेला धर्मपंडित जोहान इकने झेक सुधारणावादी जान हस सारखे मार्टिन ल्यूथरला संबोधले या जान हस याला १४१५ मध्ये पाखंडी म्हणून जाळून मारण्यात आले होते.

१५ जून १५२० मध्ये पोपनी फतवा काढला की, जर साठ दिवसाच्या आत मार्टिनने त्याचे म्हणणे मागे घेतले नाही, तर त्यास ख्रिश्चन समाजापासून वाळीत टाकण्यात येईल अथवा बहिष्कृत करण्यात येईल. १५२१ मध्ये मार्टिनला ख्रिश्चन धर्मातून बहिष्कृत करण्यात आले.

१५२१ च्या एप्रिलमध्ये मार्टिन डाएट ऑफ वोर्मस या रोमन सम्राटांच्या समितीसमोर हजर झाला. या समितीचा अध्यक्ष चार्ल्स पाचवा हा रोमन सम्राट होता. मार्टिनची लिहलेली पुस्तके टेबलवर मांडली गेली व त्याला विचारले की ही पुस्तके त्याने लिहली आहेत का? आणि त्यातील मजकूराशी तो सहमत आहे का? मार्टिनने पुस्तके त्याने लिहली आहेत हे मान्य केले. व सहमतीच्या प्रश्नावर दुसर्‍या दिवशी उत्तर दिले. तो म्हणतो पवित्र धर्मग्रंथांची साक्ष मला मनोमन पटली आहे आणि मी उल्लेख केलेले धर्मग्रंथातील दाखले मला पटलेले आहेत आणि माझी सद्सदविवेकबुद्धी फक्त देवाच्या शब्दाशी बांधलेली आहे. माझा पोप किंवा कौन्सिलवर विश्वास नाही कारण ते अनेकदा चुकलेले आहेत आणि त्यांचे वर्तन अंतर्विरोधी आहे. आणि म्हणूनच माझ्या विवेकबुद्धीनुसार मी लिहलेली कोणतीही गोष्ट नाकारणे हे सुरक्षित आणि योग्य नाही आता देवच माझी मदत करेल. आमेन…

२५ मे १५२१ ला सम्राटाने वोर्मसचा फतवा जाहीर केला व मार्टिन ला बहिष्कृत करून कायद्याच्या आणि राजाच्या संरक्षणाबाहेर काढले. त्याच्या साहित्यावर बंदी आणली. ल्यूथरला अन्न अथवा निवारा देणे यास गुन्हा म्हणून जाहीर केले. मार्टिन ल्यूथरला जर कोणी जीवे मारले तर त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही असेही जाहीर करण्यात आले.

मार्टिन ल्यूथर विटेनबर्गला परतत असताना मध्येच गायब झाला. त्याला सॅक्सोनीच्या फ्रेडरिकनी आयझॅनॅक येथील वार्टबर्ग किल्यामधे सुरक्षितपणे आणून ठेवले. वार्टबर्ग मधील मुक्कामात मार्टिनने नव्या कराराचे ग्रीक मधून जर्मनमध्ये भाषांतर केले. येथे त्याने स्वतःचे विचार किंवा सिद्धान्त मांडणारे लिखाण केले तसेच प्रस्थापितांविरुद्ध टीकास्त्र सोडले. येथे त्याने त्याचे एक प्रसिद्ध विधान केले. मार्टिन म्हणतो ‘गाॅडचे (देवाचे) लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून केलेले सत्कर्म हे पापच आहे.”

सर्व माणसं निसर्गतःच पापी असतात. फक्त गाॅडची कृपाच त्याला वाचवू शकते. यानंतर त्याने पोप व त्याच्या प्रथेवर हल्ले चालू केले प्रायव्हेट मास हे चुकीचे असून ते मूर्तीपूजेप्रमाणे आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्फेशन म्हणजेच पापांची कबुलीही आहे त्या कन्फेशनचा अधिकार पोपला दिला कुणी असा प्रश्न मार्टिन  विचारतो. प्रत्येक ख्रिश्चन हा स्वतःची कबुली देऊन मुक्ती मिळवू शकतो त्याला पोपची गरज नाही. नंतर मार्टिन कॅथलिक चर्च मधील माॅन्क व ननस् ना सांगतो तुम्ही केलेल्या प्रतिज्ञा (चारित्र्य, ब्रह्मचर्य, निष्कांचन, आज्ञाधारकता आणि स्थिरता) या कृपा मिळवण्यासाठी केलेली निष्फळ धडपड आहे. त्या प्रतिज्ञा मोडल्याने कोणतेही पाप लागत नाही.

इकडे विटेनबर्गमध्ये चर्चमध्ये उलथापालथ सुरू झाली. चर्चमधील पुतळे आणि प्रतिमा तोडल्या फोडल्या जाऊ लागल्या. चर्चमधील अधिकारी व्यक्तींचा धिक्कार होऊ लागला. मार्टिन ल्यूथरची विटेनबर्गला परतण्याची वेळ जवळ येऊ लागली होती.

– डॉ. प्रसाद केळकर

अन्य लेख

संबंधित लेख