Thursday, May 14, 2026

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट

Share

भारतीय वायुसेनेच्या (IAF) नाशिकमधील ओझरस्थित बेस रिपेअर डेपो (11 BRD) ने भारतीय नौदलाच्या मिग-२९के (MiG-29K) विमानांच्या इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल (दुरुस्ती) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

१३ मे २०२६ रोजी, ओझर येथे आयोजित सोहळ्यात एअर मार्शल यल्ला उमेश आणि व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या उपस्थितीत ही दुरुस्त केलेली सीट भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ओझरचा ११ बीआरडी हा रशियन बनावटीच्या विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी एक प्रमुख केंद्र आहे. नाशिकच्या ओझर येथील ११ बीआरडी (Base Repair Depot) मध्ये मिग-२९के (MiG-29K) लढाऊ विमानांची इजेक्शन सीटच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

ओझरस्थित हवाई दलाच्या ११ बीआरडी अर्थात देखभाल-दुरुस्ती केंद्रात मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय विमानांची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरऑल) केली जाते. या केंद्राने या दोन्ही विमान ताफ्यांच्या जटील देखभाल गरजांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य, सक्षम दुरुस्ती क्षमता आणि विशेषीकृत पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.

२ वर्षांपूर्वी हवाई दलाच्या ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रास ‘प्रेसिडेंट कलर्स’ मिळाला होता. २०२३ वर्षात देखभाल-दुरुस्ती कमांड अंतर्गत सर्वोत्कृष्ट दुरुस्ती केंद्राचा सन्मानही या केंद्राला मिळाला होता. देशभरातील सर्व केंद्रात ओझरचे देखभाल, दुरुस्ती केंद्र अव्वल ठरले. देशातील देखभाल दुरुस्ती केंद्रांत ओझरस्थित ११ वे हे महत्वाचे केंद्र आहे.

१९७५ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रात आजवर रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्तीसह सुखोईच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली. मिग २९ लढाऊ विमानाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले. त्या अंतर्गत क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अधिक क्षमता, इंधन टाकीची क्षमता वृध्दिंगत करताना हवेत इंधन भरण्याची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.

यापूर्वी या सीट दुरुस्तीसाठी आपल्याला रशियावर अवलंबून राहावे लागत होते. सुखोई-३० एमकेआय (Su-30 MKI) इजेक्शन सीट दुरुस्तीच्या अनुभवाचा वापर करून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या स्वदेशी दुरुस्ती तंत्रज्ञानाला आरसीएमए (RCMA – Regional Centre for Military Airworthiness) ची मान्यता मिळाली आहे. यामुळे परदेशी अवलंबित्व कमी होऊन. वेळेबरोबरच मौल्यवान असे परकीय चलन सुद्धा वाचणार आहे. शिवाय यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला देखील बळकटी मिळाली आहे.

जगात लढाऊ विमानांची इजेक्शन सीटची दुरुस्ती करण्याचे तंत्रज्ञान अत्यंत जटिल असल्यामुळे ते केवळ. ब्रिटन अमेरिका रशिया चीन फ्रान्स अशा मोजक्याच प्रगत देशांकडे उपलब्ध आहे. भारतआता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

भारतीय हवाई दलात (IAF) फ्लाइंग ब्रँचमध्ये वैमानिक म्हणून निवड होणे ही अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रिया आहे. साधारणपणे १.५ ते २ लाख अर्जदारांपैकी (AFCAT द्वारे) केवळ १५० ते १८० जणांची निवड या शाखेत वैमानिक म्हणून केली जाते. यावरून एका वैमानिकाच्या जीवाची किंमत काय असते ते आपल्याला लक्षात येईल.

जेव्हा युद्धात किंवा अपघातामुळे लढाऊ विमान नियंत्रित करणे अशक्य होते. तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी पायलट या इजेक्शन सीटचा वापर करून सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडतो. पायलटने सीटखालील किंवा डोक्यावरील ‘फायरिंग हँडल’ (Lever) ओढल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत. सर्वात आधी विमानावरील काचेचे छत (कॅनोपी) स्फोटकांद्वारे उडवले जाते किंवा सीटवरील धातूच्या टोकाने ते तोडले जाते आणि सीटच्या खाली असलेले रॉकेट मोटर्स चालू होतात. हे रॉकेट सीट आणि पायलटला प्रचंड वेगाने थेट हवेत वर फेकतात. हवेचा प्रचंड दाब सहन करण्यासाठी आणि सीट उलट-पालट होऊ नये म्हणून एक छोटे ‘ड्रॉग पॅराशूट’ उघडते व ते सीटला हवेत सरळ ठेवते. ठराविक उंचीवर आल्यानंतर पायलट मुख्य पॅराशूटच्या मदतीने सीटपासून वेगळा होतो आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरतो.

अर्थात् इजेक्शन सीट हा संपूर्ण हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि आता तो भारतातच दुरुस्त होणार आहे. ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल भारतीय वायुसेना, संरक्षण मंत्रालय आणिपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे.

भारत माता की जय!!!!

अन्य लेख

संबंधित लेख