Tuesday, February 3, 2026

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा

Share

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.

भाजपच्या बैठकीत एकमताने निर्णय
नाशिकमधील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाल्यानंतर हिमगौरी आहेर-आडके आणि मच्छिंद्र सानप यांच्या नावावर सर्वांनी संमती दर्शवली. या निवडीनंतर गिरीश महाजन यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“जनतेचा विश्वास सार्थ ठरवा” – गिरीश महाजन
या बैठकीत गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “नाशिकच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर जो प्रचंड विश्वास दर्शवला आहे, तो विश्वास सार्थ ठरवणे ही आपली जबाबदारी आहे. शहराच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी उत्तम काम करावे.”

नाशिक महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता केवळ अधिकृत निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता बाकी आहे.

अन्य लेख

संबंधित लेख