Wednesday, February 11, 2026

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. “राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था “हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम” अशी झाल्याचा टोला लगावला आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून देशातील विविध राज्यांची उदाहरणे देत ही टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांचे ट्विट जसेच्या तसे:
““हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम…”

‘राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते’ असं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार दिसतंय.

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांची हातमिळवणी झाली. सायकल एकदा जी घसरली… आणि विजयाच्या रस्त्यावर परत आलीच नाही.

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी झाली. परिणाम? डावे कायमचे संदर्भहीन. आज त्यांच्या अस्तित्वाची दखल घेणंही थांबलं.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्यासोबत आघाडी. कंदील पेटवण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला, पण विजयाचं तेल मिळालंच नाही.

आणि आता महाराष्ट्रात… उद्धव ठाकरे राहुल गांधीसोबत गेले आणि, विचार गेला. वारसा गेला. कार्यकर्ते गेले. सत्ता गेली.”

राहुल गांधींच्या ‘राजकीय ट्रॅक रेकॉर्ड’वर बोट
केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये उत्तर प्रदेशातील सपा (सायकल), बिहारमधील राजद (कंदील) आणि पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीच्या अपयशाचा दाखला दिला आहे. राहुल गांधी ज्या ज्या प्रादेशिक पक्षांसोबत गेले, त्या पक्षांचे राजकीय नुकसानच झाले, असा दावा उपाध्ये यांनी केला. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी आपला विचार, वारसा आणि सत्ता गमावली आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

अन्य लेख

संबंधित लेख