नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. या महान बलिदानाला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने खारघर येथे आयोजित ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजींनी आयुष्यभर मानवता आणि सेवेचा संदेश दिला. त्यांच्या नावाने उभारले जाणारे रुग्णालय हे केवळ इमारत नसून पीडितांच्या सेवेचे एक पवित्र केंद्र असेल. हे रुग्णालय सर्व आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असेल, ज्याचा फायदा नवी मुंबईसह आसपासच्या परिसरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना होईल. केवळ कार्यक्रम करून गुरुजींचे विचार मर्यादित न ठेवता, समाजाच्या आरोग्यासाठी काम करणारी ही संस्था त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करेल.
रुग्णालयासोबतच मुख्यमंत्र्यांनी गुरुजींच्या शौर्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचीही घोषणा केली. जेणेकरून पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या या बलिदानाची माहिती मिळेल.
या ऐतिहासिक प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आणि शिख समाजातील विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.