Wednesday, March 11, 2026

‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

Share

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारी एक 24 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. स्तुती बजरंग सोनावणे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, तिच्या आत्महत्येमागे तिचा मुस्लिम प्रियकर फजल मोहम्मद खान (३१) याचा अमानुष मानसिक छळ कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी फजलला अटक केली असून या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

स्तुती आणि फजल खान यांची ओळख एका प्रसिद्ध डेटिंग ॲपच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हे नाते स्तुतीसाठी जीवघेणे ठरेल याची कल्पना कोणालाही नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून फजलने तिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

पोलिसांच्या हाती लागलेल्या ६ पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फजल तिला वारंवार “तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील” अशी धमकी देत असे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या भीषणतेची आठवण करून देणाऱ्या या धमक्यांमुळे स्तुती प्रचंड दहशतीखाली होती. तिने यापूर्वी आपल्या मैत्रिणीकडेही या संदर्भात भीती व्यक्त केली होती.

८ मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत स्तुतीने आपल्या खोलीत गळफास लावला. आई-वडील घरी परतल्यानंतर वारंवार हाका मारूनही तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची गांभीर्य ओळखून अँटॉप हिल पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवले. तांत्रिक तपासाच्या आधारे फजल मोहम्मद खानला लोअर परळ परिसरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. हा केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे की यामागे काही संघटित ‘लव जिहाद’चा अँगल आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख