इस्रायलच्या २२ ते २३ हजार चौरस किमी या एकूण भूभागापैकी सुमारे ६०% भाग नेगेव वाळवंट हा ओसाड आणि वाळवंटी प्रदेश अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीसाठी उपयोगात आणला आहे… इस्राईलमध्ये मर्यादित शेतजमीन (केवळ २९.७% क्षेत्र) आणि पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे…
इस्त्राईलने ६०% पेक्षा जास्त वाळवंटी प्रदेश आणि पाण्याची तीव्र टंचाई असतानाही अद्ययावत तंत्रज्ञान, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर वाळवंटात समृद्ध शेती फुलवून दाखवली आहे…
या वाळवंटी भागात केलेल्या शेती व बागायतीच्या यशस्वी प्रयोगांमुळे आज हा भाग हिरवागार तर झालाच आहे शिवाय इस्रायलमधील एकूण पिकांपैकी ४०% हून अधिक पिके याच नेगेव वाळवंटातून घेतली जातात…
ही किमया करण्यासाठी इस्त्राएलने नेमके काय केले?…

पहिले म्हणजे १९६० च्या दशकात पोलीश इस्त्रायली इंजिनिअर सिमचा ब्लास यांनी ठिबक सिंचन (Drip Irrigation) ही पद्धती शोधून काढली आणि www.netafim.com कंपनीने ती जगभर पोहोचवली…
१९३० च्या दशकात सिमचा ब्लास यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात एक अजब दृश्य पाहिले… तिथे ओळीने लावलेल्या झाडांपैकी एकच झाड इतर झाडांपेक्षा खूप मोठे आणि निरोगी वाढले होते… ब्लास यांनी जवळ जाऊन पाहिले असता, त्यांच्या लक्षात आले की जवळून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपला एक लहानसे छिद्र होते आणि त्यातून थेंब-थेंब पाणी सतत त्या झाडाच्या मुळापाशी पडत होते… या एका लहानशा घटनेतून त्यांना ठिबक सिंचनाची मुख्य कल्पना सुचली…
पारंपारिक पद्धतींपेक्षा या पद्धतीमुळे ३०% ते ८०% पाण्याच्या वापराची बचत होते, कारण पाणी थेट झाडांच्या मुळाशी दिले जाते… पिकांना वेळेवर आणि गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात २०% ते २००% पर्यंत वाढ होऊ शकते… पाण्याच्या माध्यमातून थेट मुळांपर्यंत विद्रव्य खते पोहोचवता येतात व त्यामुळे ३०-३५% खतांची बचत होते व जमिनीची धूप थांबते… तसेच चढ-उतार असलेल्या किंवा वाळवंटी भागातील जमिनीवरही या पद्धतीने उत्तम शेती करता येते…

दुसरे म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर (Wastewater Recycling)… इस्त्राईल हा वापरलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे… ते आपल्या देशातील सुमारे ८० ते ९०% सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करतात आणि ते पाणी पाईपलाईन्सद्वारे थेट वाळवंटातील शेतीसाठी पुरवले जाते…
बाथरुम, स्वयंपाकघर आणि कपडे धुण्यामधून निघणारे पाणी तसेच शौचालयातील मलमूत्रयुक्त पाणी; कारखाने, रासायनिक उद्योग आणि उत्पादनादरम्यान बाहेर पडणारे पाणी… आणि शहरी भागात रस्त्यांवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी हे सांडपाण्याचे स्त्रोत आहेत…
सांडपाणी पुनर्वापर (Wastewater Recycling) म्हणजे घरांमधून, उद्योगांमधून किंवा शहरांमधून बाहेर पडणाऱ्या वापरलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोगांसाठी वापरण्यायोग्य बनवणे होय.
सांडपाणी पुनर्वापरामुळे गोड्या पाण्यावरचा वाढता ताण कमी होतो… सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यामुळे सांडपाणी थेट नद्या, तलाव किंवा भूजलात मिसळून होणारे प्रदूषण थांबते… तसेच दुष्काळी किंवा पाणीटंचाईच्या काळात हा पाण्याचा एक भरवशाचा स्रोत ठरतो…

तिसरे म्हणजे खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण (Desalination)… इस्रायलची मुख्य किनारपट्टी पश्चिमेकडे भूमध्य समुद्राला लागून आहे, ज्याची लांबी सुमारे १९० ते २०० किलोमीटर आहे…
इस्त्राईलने भूमध्य समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य आणि शेतीयोग्य गोड्या पाण्यात रूपांतरित करण्यासाठी प्रचंड मोठे ‘डीसॅलिनेशन’ प्लांट्स उभारले आहेत… या प्रक्रियेला मराठीत ‘निक्षारीकरण’ किंवा ‘क्षारमुक्तीकरण’ असे म्हटले जाते… इस्त्राएल सारख्या देशात जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे… तिथे समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यासाठी ही तंत्रज्ञान पद्धत वापरली जाते…
समुद्रात अमर्याद पाणी असल्याने, दुष्काळ किंवा पावसाच्या कमतरतेच्या काळातही हा पाण्याचा एक भरवशाचा स्त्रोत ठरतो… इस्त्राएलसाठी Desalination हे एक वरदानच ठरले आहे…
इस्रायलमधील निम-खाऱ्या पाण्यातील शेती (Brackish Water Farming) हे जगभरातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे… इस्रायलने त्यांच्या देशातील पाण्याचे दुर्भिक्ष आणि वाळवंटी भागावर मात करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे…
निम-खारं पाणी म्हणजे असे पाणी, ज्यामध्ये समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी पण सर्वसामान्य गोड्या पाण्यापेक्षा जास्त मिठाचे (क्षारांचे) प्रमाण असते… इस्रायलच्या नेगेव वाळवंटात जमिनीखाली अशा खाऱ्या पाण्याचे मोठे साठे आहेत…

इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी अशा पिकांची वाणे विकसित केली आहेत जी खाऱ्या पाण्यातही उत्तम येतात… यामध्ये प्रामुख्याने खजूर, ऑलिव्ह, चेरी टोमॅटो आणि काही विशिष्ट भाज्यांचा समावेश होतो… विशेष म्हणजे, खाऱ्या पाण्यामुळे इथल्या चेरी टोमॅटोची चव अधिक गोड आणि चवदार बनते…
या खाऱ्या पाण्याचा अचूक वापर करण्यासाठी इस्रायलने ‘संगणक नियंत्रित ठिबक सिंचन’ पद्धती विकसित केली आहे… यामुळे मुळापाशी हवे तेवढेच पाणी आणि क्षार पोहोचवले जातात, ज्यामुळे जमीन नापीक होत नाही…

चौथे म्हणजे नियंत्रित शेती आणि ग्रीनहाऊस… वाळवंटातील तीव्र तापमान, उष्ण वारे आणि कीटकांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी इस्त्राईलमध्ये प्लॅस्टिकल्चर आणि ग्रीनहाऊस (हरितगृह) चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो… कॉम्प्युटर आणि सेन्सर्सच्या मदतीने या ग्रीनहाऊसमधील तापमान, आर्द्रता आणि खतांचे प्रमाण अचूक नियंत्रित केले जाते…
इस्रायलमधील ग्रीनहाऊस शेती (Greenhouse Farming)
ही जगात अत्यंत प्रगत आणि आधुनिक मानली जाते… इस्रायलची बहुतांश जमीन उष्ण आणि कोरडी (वाळवंटी) असूनही, त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे…

पाचवे म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग… अर्थात् उभी शेती – Vertical Farming… जमिनीची कमतरता आणि वाळवंटी भागाचा पुरेपूर वापर करण्यासाठी इस्त्राईलने उभ्या भिंतींवर किंवा रचनेवर शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले… यामध्ये हायड्रोपॉनिक्स (मातीविना केवळ पाण्यात शेती) आणि एअरोपॉनिक्स (हवेत शेती) या अत्याधुनिक पद्धतींचा समावेश आहे…
थोडक्यात म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming – उभी किंवा स्थरीय शेती) म्हणजे पारंपारिक जमिनीवर आडव्या स्वरूपात शेती करण्याऐवजी, बंदिस्त इमारतीमध्ये, ग्रीनहाऊसमध्ये किंवा उभ्या रॅक/भिंतींवर थरांच्या स्वरूपात शेती करणे होय…
या तंत्रामुळे १ एकर जागेत पारंपरिक शेतीच्या तुलनेत ५ ते १० पट (किंवा त्याहून अधिक) जास्त उत्पादन मिळवता येते…
शिवाय हवामानावर अवलंबून न राहता ३६५ दिवस पिके घेतली जाऊ शकतात….

इस्त्राएलने वाळवंटात विकसित केलेले सहावे तंत्र म्हणजे…
वाळवंटातील मत्स्यशेती (Desert Aquaculture)… इस्रायलमधील वाळवंटी मत्स्यपालन (Desert Aquaculture) ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट आणि चमत्कारिक नमुना आहे… त्यांच्या नेगेव (Negev Desert) आणि अरावा (Arava Valley) या अत्यंत उष्ण आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी भागात यशस्वीरीत्या मासेमारी आणि जलसंवर्धन (Aquaculture) करून दाखवले आहे…
वाळवंटातील वातावरण निर्जंतुक असल्यामुळे माशांना कोणतेही परजीवी किंवा रोग होत नाहीत… त्यामुळे येथे अँटीबायोटिक्स किंवा हार्मोन्सचा वापर न करता अत्यंत शुद्ध मासे तयार होतात… बंदिस्त टाक्यांमुळे समुद्रातील वादळे किंवा बदलत्या तापमानाचा माशांवर परिणाम होत नाही… इस्रायल या वाळवंटातून दरवर्षी हजारो टन माशांचे उत्पादन करतो आणि युरोपियन देशांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करून कोट्यवधी डॉलर्सची कमाई करतो…

आणि सातवे तंत्र म्हणजे… प्रगत बियाणे आणि व त्यावरील संशोधन… इस्त्रायली शास्त्रज्ञांनी वाळवंटी हवामानात तग धरू शकतील अशा बियाण्यांचे संशोधन केले आहे… उदाहरणार्थ, जास्त काळ टिकणारे आणि उष्ण हवामानातही उत्तम येणारे ‘चेरी टोमॅटो’ तसेच उच्च दर्जाची डाळिंबे आणि खजूर त्यांनी वाळवंटात यशस्वीरित्या पिकवून दाखवले आहेत…
ताज्या भाज्या, फळे आणि बटाटे या बाबतीत आज इस्राईल पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे… देशांतर्गत गरज भागवून इस्राईल मोठ्या प्रमाणावर फळांची युरोपियन देशांमध्ये निर्यातही करतो…
आधुनिक विज्ञानाची कास धरून… अतिशय परिश्रमपूर्वक व जिद्दीने इस्त्राएलने आपल्या देशातील मरुभूमीचे नंदनवनात रूपांतर केले आहे…
इस्त्राएलने आपले हे तंत्रज्ञान भारताला सुद्धा दिले आहे… पुढच्या भागात आपण त्याचा तपशील पाहू…