Friday, October 9, 2026

मानवाचे नामकरण

Share

प्रस्तावना

मानवाचा इतिहास हा मुळातच विचार, जाणिवा आणि संस्कृतीच्या उत्क्रांतीचा एक थक्क करणारा प्रवास आहे. आपण रोजच्या बोलण्यात ‘माणूस’, ‘मनुष्य’ किंवा ‘मानव’ हे शब्द कितीतरी वेळा वापरतो. परंतु, या शब्दांचा भाषिक आणि ऐतिहासिक प्रवास अतिशय विस्मयकारक आहे. ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत आज आपण पाहणार आहोत की, मानव शब्दामागे मानवी संस्कृतीचा, तत्त्वज्ञानाचा आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचा एक अखंड प्रवाह कसा वाहतो आहे.

संस्कृतच्या दृष्टिकोनातून

संस्कृतमध्ये ‘मानव’ शब्दाचा उगम, ‘मन्’ या मूळ धातूपासून होतो. संस्कृत व्याकरणाच्या मूलभूत नियमानुसार, जगातील प्रत्येक वस्तुला दिलेले नाव हे त्याच्या कर्मावरून दिले जाते. ‘मन्’ म्हणजे मनन करणे, विचार करणे किंवा बोध प्राप्त करणे असा याचा अर्थ होतो. थोडक्यात शब्द निर्मितीच्या शास्त्रानुसार, ‘मनुते अवबुध्यते जानाति इति मनुः’—म्हणजेच जो केवळ उपजत प्रेरणेवर जगत नाही, तर जो विचार करतो, जाणतो आणि समजून घेतो, तो ‘मनु’. याच मनूचे अपत्य किंवा वंशज म्हणजे ‘मानव’ (मनोरपत्यं पुमान् इति मानवः).

महर्षी यास्कांनी ‘निरुक्त’ (३.७) या ग्रंथात या शब्दाचा भाषिक आणि मनोवैज्ञानिक गाभा अत्यंत देखणेपणाने उलगडला आहे:

“मनुष्याः कस्मात्? मत्वा कर्माणि सीव्यन्ति, मनस्यमानेन सृष्टाः, मनोरपत्यं वा ॥”

यातली पहिली व्याख्या फार विलक्षण आहे—‘मत्वा कर्माणि सीव्यन्ति’. ‘सीव्यन्ति’ म्हणजे शिवणे किंवा गुंफणे, सांगड घालणे. मागील व्याख्येनुसार, माणूस हा एकमेव असा घटक आहे, जो पूर्वविचार करून, विवेकाने आपल्या कर्मांची योजना आखतो आणि ती कौशल्याने कृतीत उतरवतो. विचार आणि कृती यांची अशी जाणीवपूर्वक सांगड घालणं हेच माणसाचं मुख्य जैविक आणि बौद्धिक लक्षण मानलं गेलं.

वैदिक संदर्भ आणि जलप्रलयाची कथा

वैदिक वाङ्मयात ‘मनु’ हा संस्कृतीचा आद्य प्रवर्तक आणि समाजाला दिशा देणारा पहिला मार्गदर्शक मानला गेला आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात (१०.५३.६) एक अत्यंत क्रांतिकारक विचार येतो:

“मनुर्भव जनया दैव्यं जनम् ॥” ऋषी म्हणतात, केवळ जैविक शरीराने जन्माला आलात म्हणून तुम्ही माणूस ठरत नाही; तर अज्ञानाचा आणि पशूवृत्तीचा त्याग करून बुद्धी, विवेक आणि करुणेने स्वतःला घडवणं म्हणजेच खरा ‘मानव’ होणं!

शतपथ ब्राह्मणात (१.८.१.१-१९) मानवाच्या अस्तित्वाची आणि जलप्रलयाची एक प्रसिद्ध कथा येते. वैवस्वत मनुच्या हातात एक लहान मासा येतो. मनु त्याचे रक्षण करतात आणि तो महाकाय मासा भीषण जलप्रलयात मनुच्या नौकेला हिमालयातील ‘मनोरवसर्पण’ शिखरावर सुरक्षित पोहोचवतो. प्रलयानंतर मनुने केलेल्या यज्ञाच्या आहुतींमधून ‘इडा’ प्रगट होते आणि त्यांच्या संयोगातून पृथ्वीवर पुन्हा नवी प्रजा निर्माण होते. मनूची हीच पुनरुत्पादित प्रजा म्हणजे ‘मानव’. विशेष म्हणजे, अशा जलप्रलयाच्या कथा केवळ आपल्याकडेच नव्हे, तर मेसोपोटेमियाच्या ‘गिल्गामेश’ महाकाव्यात आणि बायबलमधील ‘नोहाची नौका’ या आख्यायिकेतही अगदी अशाच रूपात आढळतात.

१४ मनू आणि मन्वंतरांची कालगणना

पुराणांमध्ये या कल्पनेचा विस्तार एका महाकाय कालमापनाच्या चौकटीत करण्यात आला. हिंदू पौराणिक कालगणनेनुसार एका कल्पात एकूण १४ मनु मानले जातात. प्रत्येक मनुच्या कालखंडाला ‘मन्वंतर’ म्हटले जाते, ज्याचा कालावधी सुमारे ७१ महायुगांचा (अंदाजे ३० कोटी ६७ लाख २० हजार सौर वर्षे) असतो.

सध्याच्या श्वेतवराह कल्पात आतापर्यंत ६ मनु होऊन गेले आहेत: १. स्वायंभुव मनु २. स्वारोचिष मनु ३. उत्तम मनु ४. तामस मनु ५. रैवत मनु ६. चाक्षुष मनु.

सध्याचा चालू असलेला सातवा मनु म्हणजे ‘वैवस्वत मनु’ (श्राद्धदेव मनु) होय, आणि सध्याचे मन्वंतर यांच्याच नावाने ओळखले जाते. यानंतर भविष्यात पुढील सात मनु येणार आहेत: ८. सावर्णि, ९. दक्ष-सावर्णि, १०. ब्रह्म-सावर्णि, ११. धर्म-सावर्णि, १२. रुद्र-सावर्णि, १३. देव-सावर्णि (रौच्य), आणि १४. इंद्र-सावर्णि (भौत्य).

महाभारतातील आदिपर्वातही (७०.११-१२) मार्तंडाचा (सूर्याचा) पुत्र मनु याच्यापासूनच सर्व समाजघटक निर्माण झाले, म्हणून त्यांना ‘मानव’ म्हटले गेले, असा थेट उल्लेख येतो. मनुच्या संततीपासूनच पुढे प्रसिद्ध सूर्यवंश आणि चंद्रवंश विस्तारले.

मानव शब्दाचे जागतिक नाते

हा विचार केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता, तर तो जागतिक भाषाकुळाशी जोडलेला आहे. मूळ भारोपीय (Proto-Indo-European) भाषेत ‘*men-’ किंवा ‘*mon-’ हा धातू अस्तित्वात होता, ज्याचा अर्थ “विचार करणे, मनन करणे किंवा आत्मभान असणे” असाच होतो.

रोमन इतिहासकार टॅसिटसने इसवी सनाच्या पहिल्या शतकात आपल्या ‘जर्मेनिया’ या ग्रंथात जर्मॅनिक टोळ्यांच्या मौखिक परंपरेची नोंद केली आहे. त्यानुसार, पृथ्वीपुत्र देव ‘त्विस्तो’ (ज्याचे साम्य वैदिक परंपरेतील शिल्पी देव ‘त्वष्टा’ याच्याशी दिसते) याला एक पुत्र होता—‘मॅन्युस’. या मॅन्युस ला जर्मन मानववंशाचा आद्य जनक मानले गेले. विविध मते मतांतरे असली तरी संस्कृत ही अतिप्राचीन भाषा असल्याने त्यातूनच Man हा शब्द घेतला गेला असावा. त्यामुळेच, वैदिक परंपरेतील ‘मनु’ आणि जर्मॅनिक परंपरेतील ‘मॅन्युस’ हे एकाच भारोपीय आख्यायिकेचे दोन समांतर प्रवाह आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजीतील ‘Man’ हा शब्दही इसवी सन १००० पूर्वी लिंगभेदाशिवाय केवळ ‘मानव व्यक्ती’ याच अर्थाने वापरला जात होता.

निष्कर्ष

थोडक्यात सांगायचे तर, संस्कृतमधील ‘मनु-मानव’, अवेस्तन ‘मनु’, जर्मॅनिक ‘मॅन्युस’ आणि इंग्रजीतील ‘मॅन’ या सर्वांमागे एकच मूलभूत संकल्पना आहे—ती म्हणजे ‘विचार करण्याची अफाट शक्ती’! म्हणूनच ‘मानव’ ही केवळ जैविक देहाची ओळख नसून, ऋग्वेदातील ‘मनुर्भव’ या मंत्राप्रमाणे स्वतःला सतत अधिक सुसंस्कृत, संवेदनशील आणि नैतिक बनवण्याचा तो एक शाश्वत वैश्विक वारसा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख