Friday, March 20, 2026

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

Share

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी केंद्र सरकारच्या हातमाग विभागाच्या विकास आयुक्त डॉ. एम. बीना आणि प्रसिद्ध अभिनेत्री सायली भगत यांची विशेष उपस्थिती होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विणकरांच्या सक्षमीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे प्रदर्शन केवळ विक्री केंद्र नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव ठरत आहे. यामध्ये अस्सल पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी आणि आकर्षक हँड पेंटेड साड्यांचे वैविध्य पाहायला मिळत आहे. साड्यांशिवाय कोल्हापुरी चप्पल आणि विविध पारंपरिक हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. विणकर आणि कारागिरांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांशी जोडणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले.

हे प्रदर्शन २२ मार्चपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनांतर्गत उद्या, शनिवार २१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता एका विशेष ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, नितीन शेंडे, माहिती संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांसह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी उपस्थित होते. दिल्ली व परिसरातील महाराष्ट्रप्रेमी, साडीप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख