Friday, April 24, 2026

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

Share

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत.

मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, “मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.

या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे. हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो..”

अशा शब्दात आपली असमर्थता व्यक्त केली आहे.

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/baramati-by-election-dcm-sunetra-pawar-post-as-sharad-pawar-wont-be-able-to-vote/1002804

त्याचवेळी खासदार सुप्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना… “शरद पवारांची तब्येत आता बरी आहे. त्यांना मतदान करायचं होतं. परंतु एक्सप्रेस-वे बंद आहे, ऊन देखील जास्त आहे. शिवाय हेलिकॉप्टरने येणे शक्य नाही, त्यामुळे ते आले नाहीत. त्यांना आज डिस्चार्ज मिळेल” असे कारण दिले आहे.

https://marathi.abplive.com/news/politics/baramati-byelection-2026-sharad-pawar-skip-voting-in-baramati-bypoll-due-to-health-issue-supriya-sule-reactions-support-to-sunetra-pawar-maharashtra-politics-marathi-news-1421306

म्हणजे पवार बाप लेकीच्या नेहमीच्या बनवाबनवीची सुरूवात मतदान न करण्याच्या कारणांवरून सुरू होते. दोन दिवसांपूर्वी शरद पवार प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना अजूनही डिस्चार्ज मिळालेला नाही किंवा त्यांनी तो घेतलेला नाही. त्यामुळे ते मतदानाला जाऊ शकत नाही असे त्यांचे स्वतःचे म्हणणे आहे.

त्याचवेळी शरद पवारांची तब्येत आता बरी आहे. त्यांना मतदान करायचं होतं. परंतु एक्सप्रेस-वे बंद आहे, ऊन देखील जास्त आहे. शिवाय हेलिकॉप्टरने येणे शक्य नाही, त्यामुळे ते आले नाहीत. अशी मखलाशी सुप्रिया सुळे करतात. वडिलांच्या आणि लेकीच्या कारणांमध्ये इतकी तफावत आहे की, यांच्यापुढे एखादे दुतोंडी गांडूळसुद्धा लाजेल.

यावेळी मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर जाणाऱ्या ७ खासदारांपैकी एकुलती एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आणि आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा डावलून शरद पवारांनी ती जागा पटकावली. तेव्हाही त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होत्या पण ते नाही म्हणाले नाहीत.

का कोण जाणे पण आम्हाला संगीत शारदा नाटकातील…

म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान
खासदारा अजुनि लहान… हे पद आठवले…

आज शरद पवारांचे वय ८५ वर्षे पूर्ण आहे. म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांचे वय ९१ वर्षांचे असेल. ८५ काय आणि ९१ काय. वयोमानानुसार याला “वृद्ध”च म्हणावे लागेल. ग्रामीण भाषेत वापरला जाणारा ” जख्खड म्हातारा” हा शब्द आम्ही वापरणार नाही. तरीही शरद पवार उड्या मारत मुंबईहून नवी दिल्लीला पोहोचले.

६ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथील संसद भवनात शपथविधी सोहळा पार पडला. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. नुकत्याच झालेल्या आजारपणामुळे त्यांना चालणे कठीण असल्याने त्यांनी व्हीलचेअरवर बसून शपथ घेण्याचा निर्णय घेतला आणि पण शपथ घेतली.

त्या शरद पवारांना मुंबईतून बारामतीला मतदानासाठी जाणे अवघड होते पण अशक्य नव्हते. शरद पवारांनी ठरवले असते तर ते नक्की जाऊ शकले असते. “एक्सप्रेस वे बंद आहे” हे सुप्रिया सुळे यांनी दिलेले कारण अगदीच बालिश आणि हास्यास्पद आहे. मुंबई पुण्याची वाहतूक पूर्णपणे बंद आहे का? पुण्याला जाण्यासाठी एक्सप्रेस वे सोडून अन्य कुठलाही पर्यायी मार्ग नाही का? “ऊन देखील जास्त आहे” या कारणावर तर हसावे की रडावे तेच कळत नाही. शरद पवारांना कुठल्या तळपत्या उन्हात पायपीट करून बारामतीला जायचे होते? शरद पवारांची ख्याती पावसात भिजण्यासाठी आहे. उन्हात करपण्यासाठी नाही. १९६७ साली पहिल्यांदा निवडणूक लढवण्यापूर्वी शरद पवार जे काही उन्हात फिरले असतील तेच आणि हेलिकॉप्टर कशाला? मी मतदान करणारच असा हट्ट शरद पवारांनी धरला असता तर सुप्रिया ताई सुळे त्यांना चार्टर्ड विमानाने देखील घेऊन गेल्या असत्या. पण नावडतीचे मीठ अळणी… शरद पवार यांच्याच मनात जायचे नव्हते त्यामुळे बापलेक वेगवेगळी कारणे देत आहेत.

२००४ साली म्हणजे आजपासून बरोबर २२ वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या तोंडाच्या कर्करोगाचे निधन झाले. शस्त्रक्रिया झाल्या औषधोपचार झाले पण शरद पवारांनी कधी प्रवास थांबवला नाही. आपला पक्ष अगदी नागालँडपर्यंत त्यांनी पोहोचवला. कुठल्या निवडणुकीच्या मतदानाला पोचले नाहीत असे झाले नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर गेली दोन दशके आपल्या कर्करोगावर मात करून शरद पवार अथक राजकारण करत आहेत. आणि आज एकदम शरद पवारांना मुंबईहून बारामतीला जाणे अशक्य झाले?

दया, कुछ तो गडबड है…

एका बाजूला आपल्या पवार कुटुंबाची वीण पूर्वीसारखीच घट्ट आहे. पुतण्या अजितदादांबद्दल आपल्याला किती आस्था होती. हे जगाला दाखवण्यासाठी मतदानाला जायचे तर होते असे म्हणायचे. सुनेत्राताई पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचा. त्याचवेळी हास्यास्पद आणि बालिश कारणे देऊन मतदान टाळायचे व आपले राजकीय वैर देखील निभावाचे. अशी हाडीमाशी खेळलेली राजकीय कसरत शरद पवारांनी आणि त्यांच्या लेकीने केलेली आहे.

खरं सांगायचं तर, सुनेत्राताई पवार यांचा राजकारणातील प्रवेश व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हे शरद पवारांसाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर शरद पवार व त्यांच्या लेकीने सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासाठी जो केविलवाणा आटापिटा चालवला होता. त्याच्यावरून शरद पवारांना अजितदादांची संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेण्याची किती घाई झाली होती हे जनतेच्या लक्षात आले आहे.

अजितदादांच्या मागे त्यांचा पक्ष व महायुतीत त्यांना लाभलेली सत्ता पदे ही आता आपलीच आहेत. या तोऱ्यात शरद पवार होते. अर्थात यामागे त्यांना आपल्या लेकीला सुप्रिया सुळे यांना सत्तेच्या राजकारणात प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी लाभली होती. अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र त्यामानाने वयाने लहान व कौटुंबिक वीण घट्ट असलेल्या आपल्या पवार परिवारात वडीलकीच्या नात्याने आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, याची खात्री शरद पवारांना होती. बाकी अजितदादांबरोबर असलेले सगळे आमदार हे मुळात एकेकाळी शरद पवारांचेच चेले होते. त्यामुळे त्यांनी हयात नसलेल्या अजितदादा पवार यांचा हवाला देऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा घाट घातला जेणेकरून आपल्या सत्तासोपनाचा मार्ग सुकर करायचा हाच शरद पवारांचा कुटील राजकीय डाव होता.

पण सुनेत्राताई पवार राजकारणात येतील त्या अजितदादांचा वारसा सांभाळतील अगदी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे शरद पवारांना स्वप्नातही कधी वाटले नव्हते.

आयुष्यभर दगाबाजी आणि वैचारिक कोलांट्या उड्यांचे राजकारण केलेल्या शरद पवारांची नेमकी इथेच फसवणूक झाली.

पती निधनाचे दुःख गिळून सुनेत्राताई पदर खोचून उभ्या राहिल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले व शरद पवारांच्या विलीनीकरणाचा कुटील डाव उधळून लावला. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सत्तेच्या राजकारणात आपण महायुतीबरोबर आहोत. आपण आपल्या दिवंगत पतीचा अजितदादांचा वारसा तसाच्या तसा पुढे चालवणारा आहोत हे देखील स्पष्ट केले.

मात्र संघर्षाच्या या सगळ्या काळात त्यांनी सासरे म्हणून शरद पवारांचा सर्वोच्च सन्मान राखला. वैयक्तिक नात्यात कुठेही कटुता येऊ दिली नाही. पवार कुटुंबाची घट्ट वीण कुठेही उसवू दिली नाही. मात्र कर्तव्य कठोर होताना नात्यागोत्यांचा देखील विचार केला नाही. त्यामुळे अपरिहार्यपणे त्या निवडणुकीच्या राजकारणात उतरल्या.

एकेकाळी “पवार कुटुंबाच्या बाहेरची” म्हणून आपण हिणवलेल्या आपल्या त्याच सुनेने सत्तेच्या बुद्धिबळात आपल्याला मात द्यावी हे शरद पवारांच्या पचनी पडलेले नाही. कारण सुनेत्राताई इतक्या अल्पावधीत राजकीय बुद्धिबळाची ही चाल खेळतील असा शरद पवारांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र त्यांच्या दृष्टीने अघटीत असे ते घडलेच.

मात्र, शरद पवारांचे शल्य वेगळेच आहे. सुनेत्राताई हे सगळे डावपेच आपल्या पुढे पोरसवदा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने खेळताहेत अशी त्यांची मनोमन (काल्पनिक) खात्री पटलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने छत्रपतींच्या कोल्हापूरच्या घराण्यात भाजपतर्फे खासदारकी दिल्यावर “एकेकाळी छत्रपती पेशव्यांना वस्त्रे देत असत आता पेशवे छत्रपतींना वस्त्रे द्यायला लागले आहेत.” असे सांगत अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवर घसरणाऱ्या शरद पवार यांना आपली सून सुनेत्राताई पवार या आधुनिक पेशव्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने आपले राजकीय डावपेच खेळत असतील तर आपल्या ६० वर्षांच्या राजकीय तपश्चर्येची एकाअर्थी राखरांगोळी झाली आहे. या नुसत्या विचारानेच शरद पवारांची आतल्याआत तडफड सुरू आहे.

अशा परिस्थितीत मतदानाला जाणे म्हणजे “हेचि फळ काय मम तपाला” आणि न जाणे म्हणजे पवार घराण्याची घट्ट असलेली कौटुंबिक वीण आपण उसवली हे अपशरण. अशा कात्रीत सापडलेल्या शरद पवारांना शेवटी. “बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार” शोधला. दोन दिवस आधी इस्पितळात दाखल होऊन कशीबशी आपली सुटका करून घेतली तरीही. सुजाण जनतेच्या नजरेतून शरद पवार आणि त्यांच्या लेकीची वैचारिक लबाडी मात्र सुटलेली नाही.

अन्य लेख

संबंधित लेख