Friday, May 8, 2026

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

Share

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. “विठ्ठलभक्ती ” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष पंचमी) या दिवशी असते.


संत चोखामेळा यांचे  ‘अभंग’ ही  अंतःकरणाची आर्त हाक आहे.  चोखामेळा यांच्या अभंगांत विठ्ठलाविषयीची ओढ आणि समाजाकडून होणाऱ्या अन्यायाबद्दलची वेदना यांचा संगम आढळतो. “धाव घाली विठू आता, चालू नको मंद” असे म्हणताना त्यांच्या शब्दांत एक प्रकारची व्याकुळता दिसते. त्यांनी कल्पनेपेक्षा अनुभवावर आधारित लेखन केले. पददलित समाजावरील  होणाऱ्या वेदनेचे  चटके सोसताना जे अनुभव आले, ते त्यांनी निर्भीडपणे मांडले.  त्यांचे साहित्याचा गोडवा हा त्यांची ओघवती भाषा आणि सामाजिक परिस्थितीला परमेश्वराच्या समोर मांडण्याची सर्जनशीलता  याचा संगम हा  त्यांनी  ‘लोकभाषेत’ घडवून आणला आहे.  चोखामेळा यांची शैली हि  अनेकदा विठ्ठलालाच प्रश्न विचारून आपली व्याकुळता आपल्या रचनां मधून दाखवली  आहे. “देही देवल देऊळ, आत्मा तो विठ्ठल” असे सांगत त्यांनी बाह्य सोवळेपणापेक्षा अंतरीच्या शुद्धतेवर भर दिला.

image.png


संत साहित्यातील  योगदान

महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ‘समरसता’ (Social Harmony) या शब्दाचा खरा अर्थ चोखामेळा यांच्या कार्यामुळे स्पष्ट होतो. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या काळात चोखामेळा यांनी वारकरी संप्रदायात महत्त्वाची भूमिका बजावली. “पंढरीच्या पेठेत” सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन विठ्ठलाचे भजन करू लागले, याचे श्रेय चोखामेळा आणि त्यांच्या समकालीन संतांना जाते. चोखामेळा यांनी ठामपणे मांडले की, ईश्वराच्या दरबारात कोणालाही प्रवेश नाकारता येत नाही. त्यांनी भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला, ज्यामुळे तळागळातिल वर्गामध्ये आध्यात्मिक समरसतेचा  स्वाभिमान जागृत झाला. त्यांनी विठ्ठलाला ‘मायबाप’ मानले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात एक अशी संस्कृती निर्माण झाली जिथे चर्मकार, कुंभार, नाभिक आणि महार एकत्र येऊन “विठ्ठल-विठ्ठल” म्हणू लागले. ही सामाजिक समरसतेची पहिली मोठी लाट म्हणजेच समरसतेची सांस्कृतिक क्रांती होती.


संत चोखामेळा यांचा काळ साधारणपणे १३ व्या शतकाचा उत्तरार्ध ते १४ व्या शतकाच्या पूर्वार्धाचा (मृत्यू १३३८) मानला जातो. हा काळ धार्मिक कर्मठतेचा आणि सामाजिक समरसतेचा अभाव असणारा काळ होता.
संत चोखोबा हे  मंगळवेढ्याचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेवांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेवांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखोबांची समाधी पंढरपूरमध्ये आहे.


व्याकरण, विवेचन आणि वाङ्‌मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.


शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥


अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. चोखोबांनी ‘वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन’ असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे.त्याकाळी अनेक विचित्र समजुतींच्या अधीन समाज  व्यवस्था होती. त्याच प्रमुख कारण होत ते म्हणजे  परकीय आक्रमणं. परकीय आक्रमणां मुळे  समाजात दुहीची खोलवर जखम तयार झाली. ज्यामुळे समाजात एकमेकांविषयी संशयाचे विष तयार होत गेलं . त्याचा परिणाम असा झाला कि  समाजातील एका मोठ्या वर्गाला गावाबाहेर राहावे लागत असे आणि त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. परमेश्वर चरणी  केवळ काही समाजातले वर्ग पोहोचू शकतात असा समज किंवा विचार तयार झाला. कष्टाची कामे करणाऱ्यांना समाजातली  प्रतिष्ठा कमी कमी होऊन नष्ट होत गेली.

त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्तिपरायण होते. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्‍नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग-रचना आहेत. संत चोखोबांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखोबांच्या भक्तीची उंची फार मोठी होती.


चोखामेळा यांनी शोधलेली भक्ती परंपरेच्या माध्यमातून या परिस्थिचा दाहकता  सकल समाजापुढे समर्थपणे मांडण्याचा यशस्वी प्रयोग केला.


“देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ नित्यशुद्ध ।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ।।
विटाळावाचून उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण करी जगी ।।
म्हणोनि पांडूरंगा वानित असे थोरी ।
विटाळ देहांतरी वसतसे ।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखयाची ।।


या अभंगातून संत सोयराबाई (संत चोखामेळा यांच्या पत्नी) यांनी उत्तर दिले की, विटाळ हा केवळ शरीराचा असू शकतो, पण ज्या आत्म्यात विठ्ठल वसलेला आहे तो कधीही विटाळलेला असू शकत नाही.

भक्ती परंपरा आणि तळागाळातील लोकांचा ओढा
संत चोखामेळा यांनी तळागळातील लोकांच्या आयुष्यात ‘भक्ती’ नावाचा एक नवा प्रकाश आणला. तोपर्यंत वेशीबाहेर राहाणाऱ्या  वर्गाला वाटत होते की देव आपला नाही. पण चोखामेळा यांनी सांगितले, “विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा”. यातून तळागाळातील लोकांमध्ये एक प्रकारची धार्मिक आणि सामाजिक अस्मितेचि जाणीव  निर्माण झाली. वारकरी संप्रदाय हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी संप्रदाय बनला. कारण इथे चोखामेळा यांच्यासारखा संत ‘महाद्वारी’ उभा राहूनही सर्वांना वंदनीय झाला. चोखामेळांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा) भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. यामुळे घराघरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले.

संत चोखामेळा यांच्या साहित्याचे जतन आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे संत चोखामेळा यांच्या अभंगांचे संकलन आणि शुद्ध प्रत प्रकाशित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये संत चोखामेळा यांच्या साहित्यावर आधारित अध्यासन केंद्रे (Chairs) स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले गेले, जेणेकरून नव्या पिढीला त्यांच्या समरसतेच्या विचारांची ओळख होईल. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या संत चोखामेळा यांच्या पालखीला अधिक सुरक्षा, सोयी-सुविधा आणि स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी भाजपने ‘वारी नियोजन विकास आराखड्यात’ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही संत चोखामेळा यांची कर्मभूमी. वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या क्षेत्रासाठी भाजप सरकारने जे केले ते आकडेवारीवरून स्पष्ट होते:  भाजपने सत्तेत असताना मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आणि संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी १०० कोटींहून अधिक रुपयांचा एकत्रित विकास आराखडा मंजूर केला. संत चोखामेळा यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांचा तातडीचा निधी वितरित करण्यात आला. यात संतांच्या जीवनावर आधारित म्युझियम, सभामंडप आणि भाविकांसाठी भक्त निवासाचा समावेश आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी असलेल्या संत चोखामेळा यांच्या समाधी पायरीच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली.

संत चोखामेळा हे  ‘क्रांतीचे अग्रदूत’ होते. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीशी आहे. ही पायरी आजही जगाला ओरडून सांगते की, भक्तीसाठी कुळ किंवा जातीची गरज नसते, तर केवळ शुद्ध भावनेची गरज असते.


महाराष्ट्राच्या मातीतील समरसतेचा विचार चोखामेळा यांच्या अभंगांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या आधुनिक काळातही त्यांचा संघर्ष आणि त्यांची भक्ती आपल्याला समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रेरणा देते.

– अपरांत कांबळे

अन्य लेख

संबंधित लेख