भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोलीच्या भूमीतून एका तरुणाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. तो महान योद्धा म्हणजे ‘वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके’. आजच्या पिढीला बाबुरावांचा हा प्रेरणादायी लढा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
बालपण आणि शिक्षणाचा पाया
बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी येथील मोल्लंपल्ली या जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील पुल्लेसूर बापू हे एक स्वाभिमानी जमीनदार होते. बाबुरावांचे सुरुवातीचे शिक्षण जानजातींच्या पारंपारिक ‘गोटूल’मध्ये झाले. गोटूल ही केवळ राहण्याची जागा नव्हती, तर ती संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र होती. तिथे त्यांनी कुस्ती, धनुष्यबाण आणि तलवारबाजी यांसारख्या युद्धकलांमध्ये प्रावीण्य मिळवले.
बाबुरावांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी केवळ पारंपारिक शिक्षणच घेतले नाही, तर त्यांचे वडील पुल्लेसूर बापू यांनी त्यांना आधुनिक जगाचे भान येण्यासाठी रायपूरला इंग्रजी शिक्षणासाठी पाठवले. त्या काळात इंग्रजी शिकलेला आदिवासी तरुण ही एक मोठी क्रांती होती. इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे बाबुरावांना ब्रिटिशांचे कायदे, त्यांची धोरणे आणि त्यांचे कुटिल डावपेच समजणे सोपे झाले. हेच ज्ञान पुढे त्यांच्या लढाईत गनिमी काव्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले.
ब्रिटिशांचा अन्याय आणि संघर्षाची ठिणगी
१८५४ मध्ये ब्रिटिशांनी नागपूरच्या भोसल्यांकडून चंद्रपूरचा ताबा घेतला आणि या परिसरातील शांतता भंग पावली. ब्रिटिशांनी येथील जल, जंगल आणि जमिनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्थानिक आदिवासींचे वनहक्क नाकारले आणि जाचक कर लादले. याच काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आदिवासींच्या संस्कृतीत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. आपली संस्कृती आणि हक्क धोक्यात आलेले पाहून बाबुराव शेडमाके यांच्यातील क्रांतीवीर जागा झाला. त्यांनी ठरवले की, आपल्या मातीचे रक्षण करण्यासाठी शस्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही.
‘जंगोम सेना’ आणि गनिमी कावा
बाबुरावांनी आपल्या परिसरातील ५०० तरुण योद्ध्यांना एकत्र केले आणि ‘जंगोम सेना’ उभारली. ‘जंगोम’ या शब्दाचा अर्थ क्रांती किंवा जागृती असा होतो. त्यांनी या सैनिकांना गनिमी काव्याचे प्रशिक्षण दिले. १८५८ च्या सुमारास बाबुरावांनी ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया लढल्या. ७ मार्च १८५८ रोजी त्यांनी राजगढ किल्ल्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला. त्यानंतर १३ मार्चला नांदगाव घोसारी येथील लढाईत त्यांनी ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेचा दारुण पराभव केला.
बाबुरावांचा सर्वात मोठा पराक्रम २९ एप्रिल १८५८ रोजी दिसून आला. त्यांनी चिचगुडी येथील इंग्रजांच्या तळावर हल्ला केला आणि दोन टेलिग्राम ऑपरेटर्सना ठार केले. यामुळे ब्रिटिशांची संपर्क यंत्रणाच कोलमडून पडली. ही बातमी थेट लंडनपर्यंत पोहोचली आणि ब्रिटिश सरकारला या वनपुत्राच्या ताकदीची जाणीव झाली.
फितुरी आणि अटक
ब्रिटिशांना रणांगणावर बाबुरावांना पकडणे अशक्य झाले होते. म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे ‘फितुरी’चा आधार घेतला. बाबुरावांच्या एका नातेवाईकाच्या मदतीने त्यांना जेरबंद करण्याचा कट रचण्यात आला. अहेरीच्या एका जमीनदाराने केलेल्या फितुरीमुळे बाबुराव इंग्रजांच्या तावडीत सापडले. त्यांना साखळदंडात जखडून चंद्रपूरला आणण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि हत्येचा खटला चालवण्यात आला. न्यायालयातही बाबुरावांनी झुकण्यास नकार दिला. त्यांनी गर्वाने सांगितले की, “मी माझ्या मातीसाठी आणि माझ्या लोकांच्या हक्कासाठी लढलो आहे.”
ऐतिहासिक बलिदान
२१ ऑक्टोबर १८५८ ही तारीख चंद्रपूरच्या इतिहासात रक्तरंजित अक्षरांनी लिहिली गेली. त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता बाबुरावांना चंद्रपूर कारागृहाबाहेरील एका पिंपळाच्या झाडावर फाशी देण्यात आली. मृत्यूला समोर पाहूनही हा वीर योद्धा डगमगला नाही. फाशी देताना त्यांची निर्भयता पाहून खुद्द ब्रिटीश अधिकारीही थक्क झाले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी बाबुरावांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण विदर्भात क्रांतीची मशाल पेटली.
बाबुरावांचा वारसा आणि आजची स्थिती
वीर बाबुराव शेडमाके यांचा लढा राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर तो आदिवासींच्या संस्कृतीच्या आणि नैसर्गिक हक्कांच्या रक्षणासाठी होता. आज ज्या ‘जल, जंगल, जमीन’ या घोषणा आपण ऐकतो, त्याचा खरा प्रणेता हा योद्धा होता. भारत सरकारने २००९ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले, ही त्यांच्या शौर्याला मिळालेली मोठी पावती आहे.
आजही चंद्रपूरच्या त्या ऐतिहासिक पिंपळाच्या झाडाजवळ दरवर्षी २१ ऑक्टोबरला हजारो लोक जमा होतात आणि या महानायकाला आदरांजली वाहतात. बाबुराव शेडमाके हे केवळ इतिहासातील एक नाव नाही, तर ते अन्यायाविरुद्ध लढण्याची एक चिरंतन प्रेरणा आहेत. जोपर्यंत चंद्रपूरच्या मातीत गोंडवनाचे संगीत घुमत राहील, तोपर्यंत बाबुरावांचे नाव आणि त्यांचे बलिदान अजरामर राहील.
अशा या महान क्रांतिवीराच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!!!!
– प्रतिक्षा लोहकरे