Saturday, May 30, 2026

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश

Share

मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापला आहे. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाटा सिंहाचा आहे. जागतिकीकरणाच्या या वेगात प्रांतीय भाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्या डिजिटल जगाशी जोडणे हे प्रत्येक प्रादेशिक सरकारसमोरील मोठे आव्हान होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नसून त्याचे एका सुवर्णसंधीत रूपांतर केले. पुढील चार वर्षांत आकारास येणारा ‘एआय-आधारित मराठी विश्वकोश’ हा केवळ एक उपक्रम नसून तो फडणवीस सरकारच्या दूरदृष्टीचे आणि तुमच्या माझ्या माय मराठी भाषेला जागतिक पटलावर मानाचे स्थान मिळवून देणारे एक ऐतिहासिक यश ठरणार आहे.

मराठी भाषेला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. ज्ञानकोशकार केतकर आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठीत ज्ञानकोश आणि विश्वकोशाची पायाभरणी केली. आजची तरुण जेन झी पिढीला माहिती पुस्तकात नाही, तर मोबाईलच्या एका क्लिकवर हवी असते. फडणवीस सरकारने ही काळाची पावले अचूक ओळखून पारंपारिक मराठी विश्वकोशाला एआय (AI) च्या माध्यमातून आधुनिक रूप देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘विकसित महाराष्ट्र,२०४७’ या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत मराठी भाषेचे डिजिटायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मराठी शब्दकोश निर्मिती आणि दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी महायुती सरकारने कृती आराखडा जाहीर केला आहे. २०३० पर्यंत १० अब्ज शब्दांचा एआय कॉर्पस तयार करण्यासह ५ हजार दुर्मिळ हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पात मुंबई विद्यापीठासह विविध विद्यापीठे, महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल. राज्य मराठी विकास संस्थेला हस्तलिखिते शोधणे, डिजिटायझेशन आणि भाषांतराची जबाबदारी देण्यात आली आहे.

एआय-आधारित विश्वकोशाचे वेगळेपण.. 

हा केवळ छापील मजकुराचे डिजिटल रूपांतर असलेला प्रकल्प नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे हा विश्वकोश अत्यंत गतिमान आणि वापर कर्त्यासाठी सुलभ होणार  आहे.

– स्वयंचलित अद्ययावतीकरण:-  जगात रोज घडणाऱ्या घडामोडी, नवीन शोध आणि माहिती या विश्वकोशात एआय तंत्रज्ञानाद्वारे आपोआप आणि त्वरित मराठीत अपडेट होतील.

– सहज आणि सोपी भाषा:- कठीण शास्त्रीय किंवा तांत्रिक शब्दांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सोप्या मराठीत भाषांतर केले जात आहे. ज्यामुळे मराठी ज्ञानभाषा होण्यास मदतच होणार आहे. 

– व्हॉईस असिस्टंट:- ज्यांना टाईप करता येत नाही ते केवळ बोलून या विश्वकोशातून माहिती मिळवू शकतील. यामुळे हा ज्ञानकोश दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींसाठीही वरदान आहे.

मल्टिमीडिया: केवळ मजकूर नव्हे, तर विषयाशी संबंधित व्हिडिओ, 3D चित्रे आणि आलेखांचा समावेश एआयच्या माध्यमातून केला जात आहे.

कोणताही मोठा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी केवळ घोषणा पुरेशी नसते, तर त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय नियोजनाची गरज असते.  फडणवीस सरकारने या प्रकल्पासाठी आयआयटी (IIT), सीडॅक (C-DAC) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा तज्ज्ञांची मदत घेतली आहे. निधीची कमतरता भासू न देता, कालबद्ध कार्यक्रमआखून पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भाषा कशी समृद्ध करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

शिक्षण आणि संशोधनाला नवी दिशा

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. मात्र, उच्च शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश ज्ञान इंग्रजीत उपलब्ध असते. या एआय-आधारित विश्वकोशामुळे इंग्रजीतील हे अथांग ज्ञानभांडार मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड नाहीसा होईल. ग्रामीण भागातील संशोधकांना जागतिक दर्जाचे संशोधन साहित्य मातृभाषेत मिळाल्यामुळे संशोधनाला गती येणार आहे. 

अनेकदा प्रादेशिक भाषा डिजिटल युगात मागे पडतील अशी भीती व्यक्त केली जाते. परंतु, फडणवीस सरकारच्या या उपक्रमामुळे मराठी भाषा मागे पडण्याऐवजी जागतिक स्तरावर आघाडी घेताना आपण पाहणार आहोत. इंटरनेटवरील मराठी मजकुराचे प्रमाण यामुळे प्रचंड वाढेल. गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक कंपन्यांनाही त्यांच्या एआय मॉडेल्ससाठी मराठी भाषेचा अचूक डेटा उपलब्ध होईल ज्यामुळे जागतिक डिजिटल मंचावर मराठीचा दबदबा वाढण्यास मदत होणार आहे. माहितीच्या महापुरात आपल्या भाषेचे जहाज अधिक भक्कमपणे पुढे नेण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. हा विश्वकोश येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा ठरेल यात शंका नाही.

– हिमांशू शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख