मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे.
मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर हे मधुश्री प्रकाशन नावाचे प्रतिष्ठित प्रकाशन गृह चालवतात. एखाद्या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणासाठी मूळ प्रकाशकाची परवानगी आवश्यक असते हे त्यांना ठाऊक नसेल असे कसे म्हणावे?. आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावे म्हणून त्यांनी पुस्तकाचे पुनर्मुद्रन केले असले तरी. मूळ प्रकाशक लोकवाङ्मयची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक होते.
कदाचित एका पुरोगाम्याने दुसऱ्या पुरोगाम्याकडून तिसऱ्या पुरोगाम्याच्या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाची कसली परवानगी घ्यायची असा अतीपुरोगामी विचार त्यांनी केला असावा.
बरं त्यांनी पुनर्मुद्रण केले ते केले. २०१९ साली प्रकाशित झालेल्या नवीनतम आवृत्तीचे तरी करायचे. ते त्यांनी जसेच्या तसे केले. पुस्तकाच्या १९९१ च्या चौथ्या आवृत्तीच्या २०१० साली पुनर्मुद्रित केलेल्या ऑनलाइन पीडीएफ आवृत्तीचे.
२०१० साली पुनर्मुद्रित झालेल्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या आवृत्तीत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असा उल्लेख होता. मात्र २०१० साली इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असे प्रतिपादन केले. आणि आपल्या मूळ पुस्तकातील मजकूर लोकवाङ्मय प्रकाशनने. कॉम्रेड गोविंद पानसरे मार्क्सवासी झाल्यानंतर आपल्या २०१९ च्या आवृत्तीमध्ये गाळला. असे उपलब्ध माहितीवरून लक्षात येते.
मात्र, ही नवीन आवृत्ती आपल्याला माहितीच नव्हती असा शरद अष्टेकर खुलासा करतात. शरद अष्टेकर यांच्यासारख्या प्रकाशकाला लोक वाङ्मय प्रकाशनने “शिवाजी कोण होता?” सारख्या ब्रम्हांडात चर्चा असलेल्या पुस्तकाची २०१९ साली नवीन आवृत्ती काढली आहे हे माहितीच नाही. यावर हसावे की रडावे हेच सामान्य माणसाला कळत नाही. पुढे ते असा खुलासा करतात की, “आम्ही उदारमतवादी विचारसरणीचे शिलेदार आहोत. म्हणूनच शिवाजी महाराजांविषयीचा पूर्वग्रहदूषित व वादग्रस्त मजकूर लोकांपर्यंत पोचावा, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे यासंदर्भात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेनंतर आम्हाला आमची गंभीर चूक लक्षात येताच आम्ही छापलेल्या प्रती लगोलग बाजारातून काढून घेतल्या. आणि गोदामातल्या प्रतीही नष्ट केल्या आहेत. आमच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबाबत आम्ही दिलगीर आहोत.”.
इतक्या प्रांजळपणे चूक कबूल करून त्याचे प्रायश्चित्तही घेतल्याबद्दल, खरे म्हणजे लोकवाङ्मय प्रकाशन आणि पानसरे कुटुंबीयांनी आपले पुरोगामी अंत:करण विशाल करून शरद अष्टेकर यांना त्यांच्या अतीपुरोगामी चुकीबद्दल माफ करायला हवे होते.
१९४२ च्या चले जाव आंदोलना विरोध करण्यापासून भारतीय स्वातंत्र्याला बेगडी ठरवून सत्ता हातात घेण्यासाठी सशस्त्र क्रांतीकरण्यापर्यंत आणि आणीबाणीला पाठिंबा देण्यापासून ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यापर्यंत. आपल्या अनेक ऐतिहासिक घोडचुकांची (Historical Blunders) यथावकाश कबुली कम्युनिस्ट पक्षांनी दिलेली आहे. आणि भारताच्या मतदारांनी त्यांना देशद्रोह करूनही माफ देखील केले आहे.
इथे तर शरद अष्टेकर यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रायश्चित्त म्हणून पुस्तकाचे पुनर्मुद्रण ताबडतोब थांबवले आहे. आपल्याकडच्या त्या पुस्तकांचा साठा नष्ट करून टाकला आहे आणि बाजारात विकली गेलेली पुस्तके परत देखील मागवली आहेत. (अर्थात् हा “मढ्यामागून रडं” चा प्रकार वाटतो).
पण झाले उलटेच. लोकवाङ्मय प्रकाशन आणि पानसरे कुटुंबीयांनी शरद अष्टेकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे. शरद अष्टेकरांकडे पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाचे अधिकार नसताना त्यांनी पुस्तक छापलेच कसे?. हाच मूळ प्रकाशकांकडून (लब्ध) प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे. पण एकूणच घटनाक्रम बारकाईने बघितला तर लोकवाङ्मय प्रकाशन आणि पानसरे कुटुंबीयांकडून हा प्रश्न ताणला जाण्यामागे कळीचा मुद्दा म्हणजे शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनाने पुनर्मुद्रण केलेल्या आवृत्तीत. “दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते” हे छापले गेले हा असावा.
इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी “शहाजीराजे यांनी जिजामाता आणि शिवरायांची पुण्यात सोय केल्यावर दादोजी कोंडदेव हे आदिलशाहीचे एक निष्णात कारभारी आणि जहागिरीचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. परंतु, शिवाजी महाराजांना घडवण्याचे किंवा त्यांचे गुरू असण्याचे श्रेय त्यांना देता येणार नाही” . अशी इतिहासाची फेरमांडणी केली आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ती मनोमन मान्य केली. तोपर्यंत कॉम्रेड गोविंद पानसरे देखील “दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत” अशीच मांडणी करत होते. मात्र जयसिंगराव पवार यांची नवीन मांडणी त्यांच्या साम्यवादी विचारसरणीला सुखावणारी होती आणि त्यामुळेच त्यांनी ती मनोमन मान्य देखील केली होती. आणि तरीही शरद अष्टेकर यांनी “दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत” अशीच मांडणी करणाऱ्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण करावे यापरता मोठा अपराध तो कोणता?. हीच लोकवाङ्मय प्रकाशन आणि पानसरे कुटुंबीयांची खरी चीड आहे. डाव्यांच्या मते खरे तर पुरोगामी शरद अष्टेकर हे खरे “बूर्झ्वा” (Bourgeois) आहेत आणि म्हणून त्यांना शासन हे झालेच पाहिजे.
परंतु, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संबंधित मजकुरामध्ये बदल करण्यात आले ते त्यांच्या मृत्यूनंतरच. म्हणजे २०१५ नंतर. असे एकंदरीत उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते. म्हणजे मूळ पुस्तकातील मजकुरात लोकवाङ्मय प्रकाशनने बदल केला आहे. आणि आधीच्या आवृत्यांची ऑन लाईन पीडीएफ फाईल्स हटवण्याची खबरदारी देखील त्यांनी घेतलेली नाही. तरीही दोषी कोण? तर “बूर्झ्वा” शरद अष्टेकर. लाल माकडांनो तर मग बसा एकमेकांच्या उरावर!!!
– पराग नेरूरकर