Tuesday, July 28, 2026

विवेकानंद आणि आजचा Gen Z तरुण

Share

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांनी भारताच्या पुनरुज्जीवनासाठी ज्या ओजस्वी युवाशक्तीची कल्पना केली होती, ती शक्ती आजही समाजाच्या आणि राष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. २१ व्या शतकातील ही ‘Gen Z’ तरुण पिढी तंत्रज्ञानाने समृद्ध, आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडलेली आणि सामाजिक-राजकीय घडामोडींवर अत्यंत तातडीने प्रतिक्रिया देणारी पिढी आहे. अलीकडच्या काळात या पिढीने विविध मुद्द्यांवर केलेले आंदोलन, राजकीय सत्ताधाऱ्यांवर केलेली टीका आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आक्रोश याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

स्वामी विवेकानंदांनी तरुणाईला ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ असा अमर संदेश दिला आहे. परंतु, ‘स्वामीजींना भारताचा तरुण खरोखर असाच अभिप्रेत होता का’, हा मात्र विचार करण्याजोगा आणि अत्यंत कळीचा प्रश्न आहे.

आंदोलन: निर्भयतेचे प्रतीक

स्वामी विवेकानंदांच्या मते, तरुण म्हणजे केवळ वयाची एक विशिष्ट अवस्था नसून ती अंगी असलेले साहस, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त करण्याची जिवंत ऊर्जा आहे. विवेकानंदांनी नेहमीच आळस, जडत्व आणि अंधानुकरणाचा धिक्कार केला. जिथे समाज किंवा तरुण जिवंत असतात, ते कधीही व्यवस्थेच्या त्रुटींकडे डोळेझाक करू शकत नाहीत. या अर्थाने Gen Z ने स्वतःच्या हक्कांसाठी, रोजगारासाठी किंवा सामाजिक न्यायासाठी रस्त्यावर उतरून अथवा डिजिटल माध्यमातून आंदोलन करणे हे युवकांच्या जिवंतपणाचेच लक्षण आहे.

विवेकानंदांच्या संदेशाचा मुख्य गाभा ‘निर्भयता’ हा होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘दुर्बलता हाच मृत्यू आहे, आणि सामर्थ्य हेच जीवन आहे.’ सत्तेला किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवणे ही दुर्बलता नसून ते आत्मश्रद्धेचे आणि आंतरिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या भवितव्यासाठी आणि राष्ट्राच्या सुधारणेसाठी केलेले आंदोलन तत्त्वतः पूर्णपणे योग्य आणि स्वाभाविक मानले पाहिजे.

डिजिटल अभिव्यक्ती आणि नैतिकतेचे पतन

आंदोलनाचा अधिकार योग्य असला, तरी आंदोलनाचा मार्ग आणि अभिव्यक्तीचे स्वरूप काय असावे, यावर देखील स्वामी विवेकानंदांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि आग्रही आहेत. आजच्या तरुण पिढीने आंदोलनाचे आणि टीकेचे मुख्य साधन म्हणून सोशल मीडियावरील ‘मीम्स’चा वापर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर लोकप्रतिनिधींवर मीम्स बनवताना तरुणाईचा उत्साह दिसून आला; परंतु या प्रक्रियेत वैचारिक राजकीय टीका आणि वैयक्तिक चिखलफेक यातील सूक्ष्म रेषा पुसट झाली आहे.

लोकशाहीत धोरणांवर टीका करणे आणि उपरोध वापरणे योग्य मानले जाते, पण राजकीय असंतोष व्यक्त करताना जेव्हा अश्लील, चुकीचे, असत्य आणि चारित्र्यहनन करणारे मीम्स बनवले जातात, तेव्हा तेथे विचारांचे दारिद्र्य दिसून येते. विवेकानंदांनी भगवद्गीतेचा हवाला देत नेहमी सांगितले होते की, “साध्य जेवढे पवित्र, तेवढीच साधनेही पवित्र असावीत.” जर आपले ध्येय न्याय आणि राष्ट्रहित हे असेल, तर त्यासाठी वापरले जाणारे मार्ग असत्य किंवा द्वेषावर आधारित असू शकत नाहीत. जेव्हा तरुण पिढी केवळ झटपट प्रसिद्धी, लाईक्स किंवा द्वेष पसरवण्यासाठी अश्लील व दिशाभूल करणारे मीम्स बनवते, तेव्हा ती कळत-नकळत स्वतःच्याच नैतिक स्तराचा ह्रास करत असते.

याला ‘चारित्र्यवान आणि नीतिमान’ म्हणायचे का?

सत्ताधारी पक्षाला वेळोवेळी, आवश्यक तिथे लोकशक्तीचे दर्शन घडणे आवश्यक आहेच. मात्र, त्याचा मार्ग नैतिक आहे का? याचेही भान महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान, इतर राजकीय नेते किंवा महिला लोकप्रतिनिधींचे चेहरे अश्लील/अवमानकारक चित्रांवर, अश्लील सिनेमातील दृश्यांवर किंवा विवस्त्रावस्थेसारख्या एडिट केलेल्या फोटोंवर जोडणे किंवा नेत्यांच्या कौटुंबिक समस्या, घटस्फोट, वैयक्तिक आजारपण किंवा लग्नावरील निर्णयांवर अश्लील टिप्पणी करणारे मीम्स तयार करणे; राजकीय नेत्यांच्या मूळ भाषणाचा ऑडिओ एआयद्वारे बदलून त्यात अश्लील शिव्या, गलिच्छ गाणी किंवा अश्लील संभाषणे जोडणे; या न संपणाऱ्या यादीमधून केवळ वैचारिक घसरण दिसून आली. सर्व पोस्ट्स वायरल होत आहेत. आपले आई-वडील देखील ही अश्लील वक्तव्य पाहतील असा विचार कुणाही तरुणाच्या मनात आला नाही याची खंत आहे.

केवळ विरोध न करता ‘रचनात्मक पर्याय’ उभे करणे महत्त्वाचे असते. आता, प्रश्नपत्रिका फुटल्या कारण ते विकत घेणारा सुद्धा Gen Z तरुण वर्गच होता; हे विसरून चालणार नाही. स्वामीजींनी यशाचा आणि ध्येयप्राप्तीचा मार्ग सांगताना म्हटले होते, ‘एकच विचार हाती घ्या. तोच विचार तुमचे जीवन बनवा — त्याचाच विचार करा, त्याचीच स्वप्ने पाहा, तोच विचार जगा. तुमचे मस्तिष्क, स्नायू, मज्जासंस्था आणि शरीराचा प्रत्येक भाग त्याच विचाराने व्यापून जाऊ द्या. यशाचा हाच खरा मार्ग आहे.’ या ध्येयसक्तीच्या जोरावर शिक्षण, विज्ञान, समाजसेवा आणि नवसंशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रश्नांवर व्यावहारिक उपाय शोधणारा तरुणच खरा राष्ट्रनिर्माता ठरू शकतो.

निष्कर्ष

Gen Z ने राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेला संताप आणि दाखवलेले आंदोलन हे त्यांच्या जागरूकतेचे प्रतीक आहे; या अर्थाने त्यांचे जागे होणे निश्चितच योग्य आणि समर्थनीय आहे. परंतु, आंदोलनाची भाषा जेव्हा अश्लीलता, असत्य आणि चारित्र्यहननाच्या पातळीवर घसरते, तेव्हा तो सत्याचा लढा राहत नाही, तर तो वैचारिक पराभवाचा मार्ग ठरतो.

तरुणाईने आपल्यातील ऊर्जेला अश्लील मीम्स आणि द्वेषाच्या अग्नीत आहुती न देता, तिला नैतिकतेची आणि ध्येयसक्तीची जोड दिली, तरच हा तरुण वर्ग स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील प्रगत, सक्षम आणि जगद्गुरू भारताची निर्मिती करणारा ठरू शकेल.

अन्य लेख

संबंधित लेख