Saturday, June 6, 2026

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग

Share

पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई, तापमानवाढ आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखी संकटे आज संपूर्ण जगासमोर उभी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त मांडलेल्या “पंच परिवर्तन” या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनाला विशेष स्थान दिले आहे.


पर्यावरण संवर्धनाची भारतीय दृष्टी
भारतीय हिंदू संस्कृतीत निसर्गाला देवतुल्य मानले गेले आहे. पृथ्वीला माता, नद्यांना देवी, वृक्षांना पूजनीय आणि प्राणिमात्रांना देवतुल्य मानण्याची परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. “वसुधैव कुटुंबकम्” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः” या विचारांमध्ये मानवासह संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची भावना व्यक्त होते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा केवळ वैज्ञानिक किंवा प्रशासकीय विषय नसून तो सांस्कृतिक आणि नैतिक कर्तव्याचा भाग आहे.


पंच परिवर्तनातील पर्यावरण संवर्धन
पंच परिवर्तनामध्ये पर्यावरण संवर्धनाचा उद्देश समाजामध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करणे हाच आहे. पर्यावरणाचे रक्षण केवळ शासनाच्या योजना किंवा कायद्यांद्वारे होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच ते शक्य होईल. त्यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.पर्यावरण संवर्धनासाठी संघाने काही उपक्रम हाती घेतले आहेत.झाडे ही पर्यावरणाचा आधारस्तंभ आहेत. ती कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन देतात, पावसाचे प्रमाण टिकवून ठेवतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणेही तितकेच आवश्यक आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारण करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलप्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे.जलसंर्वधनाची मोहिम सुरु केली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. कापडी पिशव्या, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. प्लास्टिक मुक्त जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन केले आहे.घरातील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता राखणे, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला प्रोत्साहन देणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते.स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हाती घेतला आहे. वीज आणि इंधनाचा संयमाने वापर करणे, सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर वाढवणे आणि ऊर्जाबचतीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले.

समाजाची भूमिका
पर्यावरण संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची किंवा शासनाची जबाबदारी नाही. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामान्य नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणविषयक जनजागृती, वृक्षारोपण मोहीमा, जलसंवर्धन उपक्रम आणि स्वच्छता अभियानांमधून समाजाचा सक्रिय सहभाग वाढवता येईल. पर्यावरण संवर्धन हा आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचा सामाजिक विषय आहे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच परिवर्तनातील पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा केवळ निसर्ग संरक्षणापुरता मर्यादित नसून शाश्वत आणि संतुलित जीवनपद्धतीचा मार्ग दाखवणारा आहे. पर्यावरणाचे रक्षण हेच मानवजातीच्या सुरक्षित भविष्याचे रक्षण आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख