प्रियांक खरगे कर्नाटकचे गृहमंत्री आहेत… त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचे रजिस्ट्रेशन दाखवायला… तसेच संघ करोडोंचे डोनेशन पावती शिवाय घेतो… संघाच्या अधिकाऱ्यांचा विमान प्रवास, पंचतारांकित संस्कृती कोणत्या पैशातून केली जाते… याचा हिशोब मागितला आहे…
आणि जर पारदर्शकता नसेल तर देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जाण्यास तयार रहा… असा सज्जड दम देखील दिला आहे…
गेल्या मंत्रिमंडळात ग्रामविकास व पंचायत राजमंत्री असलेल्या प्रियांक खरगे यांनी… ऑक्टोबर २०२५ मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक जागेत संघाच्या शाखा व उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती… या मागणीनंतर कर्नाटक सरकारने केवळ खाजगी संस्था किंवा संघटनांना सरकारी जागेचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी नियम लागू केले…
मात्र आता मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात गृहखाते मिळाल्यावर प्रियांक खरगे यांना अतिउत्साहाच्या भरात संघावर बंदी घालण्याची खुमखुमी आलेली दिसतोय…
थोडक्यात सांगायचे तर… राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कर्नाटक पुरती बंदी घालण्याची पूर्ण तयारी प्रियांक खरगे यांनी केली आहे असे मानायला हरकत नाही…
प्रियांक खरगे यांच्या आक्रमक पवित्र्यावरून सहाजिकच काही प्रश्न उपस्थित होतात…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे रजिस्ट्रेशन नाही म्हणून जर संघाचे अस्तित्वच नाकारायचे असेल तर… अस्तित्वात नसलेल्या संघावर… प्रियांक खरगे यांच्याच काँग्रेस पक्षाच्या केंद्र सरकारांनी ३ वेळा बंदी घातली कशी?…
आणि रजिस्ट्रेशन नसल्यामुळे संघ बेकायदेशीर ठरत असेल तर ३ वेळा बंदी घालून नंतर ती उठवली कशी?…
याचा अर्थ प्रियांक खरगे आपल्याच काँग्रेस पक्षाच्या माजी पंतप्रधानांना वेड्यात काढत आहेत…
संघाच्या रजिस्ट्रेशनचा विषय सध्याचे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी एका कार्यक्रमात प्रश्नोत्तरांच्या वेळी… “संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली, मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणी केली असेल अशी तुमची अपेक्षा आहे का?… आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने संघासारख्या Body of Individuals घटनांसाठी नोंदणी अनिवार्य केली नाही.”… हे स्पष्ट केलेले आहे…
त्यामुळे कायदेशीर संस्थात्मक रचनेऐवजी हा केवळ एक व्यक्तींचा एकत्रित समूह मानला जातो…
मात्र संघ प्रेरणेतून देशभरातून सुरू झालेल्या हजारो सेवाभावी सामाजिक संस्था या धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड आहेत… त्यांच्या आर्थिक उलाढालीचे सरकारकडून ऑडिट केले जाते… आयकर खात्याचे सगळे नियम त्यांना लागू असतात…
अशा सेवाभावी संस्था आपल्या वास्तूतील एखादा कोपरा संघासाठी कार्यालय म्हणून देतात… आणि संघाला तेवढी जागा पुरेशी असते… प्रियांक खरगे यांना डोनेशनच्या पावत्या तपासण्यासाठी मागायच्या असतील तर या सेवाभावी संस्थांकडे त्यांनी मागाव्यात… मात्र धर्मादाय आयुक्तांनी त्या आधीच तपासलेल्या असल्यामुळे… प्रियांक खरगे यांचा आपल्याच सरकारच्या यंत्रणेवर विश्वास नाही असे सिद्ध होईल…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना एखाद्या परिवाराप्रमाणे (कुटुंबाप्रमाणे) चालवली जाते… कुटुंबातील सदस्य ज्याप्रमाणे आपले यथाशक्ती आर्थिक योगदान देऊन कुटुंब चालवतात त्याचप्रमाणे संघ चालवला जातो… संघात प्रवेश करण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी कोणतीही लेखी नोंदणी करावी लागत नाही… आणि यासाठी कोणतेही सदस्यत्व शुल्क (Membership Fee) देखील घेतले जात नाही… कोणताही व्यक्ती स्थानिक ‘शाखेमध्ये’ जाऊन थेट संघात सामील होऊ शकतो त्यांना ‘स्वयंसेवक’ म्हटले जाते… असे सगळे स्वयंसेवकच यथाशक्ती आर्थिक हातभार लावून संघाचा खर्च भागवतात… ‘Body of Individuals’ या दर्जामुळेच संघाला आयकरामधून सूट मिळाली आहे… प्रियांक खरगे ज्याला डोनेशन म्हणत आहेत ती संघामध्ये गुरुदक्षिणा मानली जाते… आणि या व्यतिरिक्त संघ कोणतेही डोनेशन घेत नाही वा देत नाही…
आणि गुरुदक्षिणेवर आयकर लावण्याचे षडयंत्र हे काँग्रेसच्या हिंदुद्वेषाचे एक उत्तम मासलेवाईक उदाहरण आहे…
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९६७-६८ ते १९७५-७६ या काळातील मूल्यांकनानुसार, प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी गुरुदक्षिणेच्या माध्यमातून सदस्यांकडून मिळालेली रक्कम करपात्र मानली होती… संघाने गुरुदक्षिणेच्या उत्पन्नावर असा युक्तिवाद केला की ही रक्कम सदस्यांच्या परस्पर सहकार्यातून गोळा केली जाते… प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT): आयकर आयुक्तांनी संघाची ही रक्कम करमुक्त असल्याचे आधीच मान्य केले होते आणि ‘म्युच्युॲलिटी’च्या तत्त्वावर ते करपात्र नसल्याचा निर्णय दिला होता… प्राप्तिकर विभागाने याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती, परंतु प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला अनुसरून व केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) सूचनांच्या आधारे… गुरुदक्षिणेच्या रूपाने संघाला मिळणाऱ्या देणग्या या केवळ संस्था आणि सदस्यांमधील देवाणघेवाणीचा भाग असल्याने, कायदेशीररीत्या त्यावर आयकर लावता येत नाही असा निर्वाळा दिला…
आणि विशेष म्हणजे या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी लढवली होती…
या सगळ्या इतिहासाचे साक्षीदार खुद्द त्यांचे वडील आहेत… काँग्रेसचे (कामचलाऊ आणि नामधारी) अध्यक्ष असूनही… आपले वडील आपल्याला मुख्यमंत्री बनवू शकले नाहीत याचा राग बाजूला ठेवून… प्रियांक खर्गे यांनी एकदा आपल्या वडिलांशी संघावरील कारवाईबाबत मनमोकळी चर्चा करायला हवी… म्हणजे किमान न्यायालयात ते आपण स्वतः आणि कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला तोंडघशी पाडणार नाहीत…
प्रियांक खरगे यांना हा आपल्याच पक्षाच्या सत्ताधारी पूर्वजांचा इतिहास माहित नाही की… २ वर्षांनी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला मुसलमानांची शतप्रतिशत मते मिळावीत यासाठी संघावर कारवाई करून त्यांना खुश करण्याची केविलवाणी धडपड चालली आहे?…
प्रियांक खरगे त्यांनी कितीही आव आणला तरी ते फक्त कर्नाटकचे गृहमंत्री आहेत… त्यांनी संघावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर ती कर्नाटक पुरती असेल…
१९४८, ७५ आणि ९२ अशी ३ वेळा वेगवेगळ्या काँग्रेस सरकारने
देशभर संघावर बंदी घातली… आणि कालांतराने ती त्यांना उठवावी देखील लागली… कधी जनमताच्या रेट्यामुळे तर कधी न्यायालयाने चपराक मारली म्हणून…
संघावरील देशव्यापी बंदी देखील ३ वेळा कुचकामी ठरली तिथे फक्त कर्नाटकात बंदी घालून काय साध्य होणार आहे?…
डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यात देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचे षडयंत्र सुरू होते…
त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री
दिग्विजय सिंग यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना म्हटले होते की… “राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची चूक काँग्रेस सरकारने करू नये, आज हे केवळ एकाच नावाने काम करत आहेत उद्या बंदी घातली तर १० नवीन नावांनी काम सुरू करतील”…
आणि डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने संघावरील बंदीचा विचार सोडून दिला…
संघावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रियांक खर्गे यांनी एकदा दिग्विजय सिंग यांच्याशी सल्लामसलत करणे श्रेयस्कर ठरेल…
कदाचित आपला राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून देशभरात भारतीय जनता पक्षाशी लढण्याचे त्राण आपल्या काँग्रेसमध्ये उरलेले नसल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले असावे… त्यामुळे “वड्याचे तेल वांग्यावर… अर्थात भाजपचे तेल संघावर” या न्यायाने नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करणाऱ्या संघावर… कर्नाटक पुरती का होईना पण कारवाई करण्याची “विनाशकाले विपरीत बुद्धी” त्यांना सुचली असावी…
काँग्रेस सरकारने माथी मारलेल्या गांधी हत्येच्या खोट्या पापाचे हलाहल पचवलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आहे… त्याच्याविरुद्ध आपल्या राजकीय आकसापोटी कारवाई करणे ही प्रियांक खरगे यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही…
प्रियांक जी… संघात एक पद्य म्हटले जाते…
“ही कृपा कुणाची ना वाढलो अम्ही
लाचारी पत्करली ना कधी अम्ही
दाविले जगून ते कसे जगायचे
संघकार्य ना कधी विझून जायचे”…
या कडव्याचा अर्थ जर तुम्ही नीट समजून घेतला तर परत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची दुर्बुद्धी तुम्हाला कधीच सुचणार नाही…