अनेक जन्म गुलामीत राहिलेली माणसं यांचा केंद्रबिंदू होता स्वातंत्र्य. आणि या स्वातंत्र्याचा श्वास होता वंदे मातरम.अत्यंत अंधाऱ्या कालखंडात अडकलेल्या कोट्यवधी भारतीयांच्या मनाचा, प्राणाचा आणि अस्तित्वाचा एकमेव केंद्रबिंदू होता ‘वंदे मातरम्’!. हे शब्द नव्हते, तर तो कोट्यवधी कंठांतून निघणारा सिंहनाद होता. जेव्हा-जेव्हा हा जयघोष हवेत घुमला, तेव्हा जुलमी सत्तेचे धाबे दणाणले.
त्या वंदे मातरम च्या जयघोषाने स्वातंत्र्याचा ध्वज भारताच्या जनतेने फडकवला. त्यावेळी देशाचे राष्ट्रगान हे जनगणमन हे शालेय वयातील शासन उपक्रमाचा भाग असला तरीही हाताची पाचही बोटं करकचून आवळली आणि तो हात आकाशाच्या दिशेने भीरकावत जयघोष होतो वंदे मातरम.
वंदे मातरम् याच मंत्राने त्या निष्ठुर जुलमी ब्रिटिश राजवटीला गुडघे टेकावे लागले. परंतु, ज्या मंत्राने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यालाच स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणाच्या साखळदंडात करकचून आवळण्याच काम केल काँग्रेस नेतृत्त्वाने. कोट्यवधी भारतीयांच्या मनात आणि शब्दात वसलेल्या या राष्ट्रीय गीताला (National Song) त्याचा खरा, संपूर्ण आणि ऐतिहासिक सन्मान मिळवून देण्यासाठी अखेर २०२६ चे वर्ष उजाडावे लागले. केंद्रीय गृह मंत्रालयाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या पूर्ण ६ कडव्यांना गाण्याची किंवा वाजवण्याची अधिकृत संमती दिली आहे. सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीत (जन गण मन) च्या आधी हे पूर्ण गीत वाजवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते १३ ऑगस्ट या काळात होणार आहे. या अधिवेशनात वंदे मातरम् विधेयकाचा समावेश आहे.या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरवणे हा आहे. या प्रकरणी दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बद्दल सरकारचे आभार.
सांडलेल्या रक्ताचे महाकाव्य
हुतात्मा बाबू गेनू हे मुंबईत स्वदेशी आंदोलनादरम्यान परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे पडताना त्यांच्या मुखात ‘वंदे मातरम्’चाच जयघोष होता. चाफेकर बंधूंना (दामोदर, बालकृष्ण, वासुदेव) १८९७ मध्ये रँडच्या हत्येनंतर फासावर जाताना त्यांच्या हातात भगवद्गीता आणि मुखात ‘वंदे मातरम्’ होते. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू १९३१ मध्ये लाहोर मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या तख्ताकडे जाताना त्यांनी’वंदे मातरम्’चा नारा दिला होता.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला चेतना देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रमंत्राने ब्रिटीश हुकूमाची झोप उडवून दिली होती. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटीश सरकारने या गीताच्या जयघोषावर आणि सार्वजनिक गायनावर कठोर कायदेशीर बंदी घातली. मात्र, ब्रिटीशांच्या या जुलुमी शासनाला भारतीय जनता प्राणांची पर्वा न करता सामोरी गेली.
या विरोधाचा सर्वात ऐतिहासिक आणि रक्तरंजित प्रसंग एप्रिल १९०६ मध्ये बारीसाल (सध्याच्या बांगलादेशातील) प्रांतिक परिषदेदरम्यान घडला. परिषदेच्या विशाल मिरवणुकीत हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी हातात तिरंगा आणि मुखात ‘वंदे मातरम्’चा नारा देत प्रवेश केला. संतप्त ब्रिटीश पोलिसांनी या शांततापूर्ण मिरवणुकीवर अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठ्यांचा वर्षाव होत असताना आणि पाठीवर, डोक्यावर अमानुष वार झेलताना देशभक्तांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. परंतु, या भीषण मारहाणीनंतरही स्वातंत्र्यवीरांच्या ओठांवरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष पुसला गेला नाही.
ब्रिटीश राजवटीच्या या दडपशाहीने उलट आगीत तेल ओतण्याचे काम केले. बारीसालच्या या बलिदानानंतर ‘वंदे मातरम्’ हा केवळ एक मंत्र न राहता क्रांतीची ठिणगी बनला.
काकीनाडा अधिवेशन (१९२३)
१९२३ साली काकीनाडा (आंध्र प्रदेश) येथील काँग्रेस अधिवेशनातला तो वादग्रस्त प्रसंग ! १९१५ पासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनांची प्रत्येक सुरुवात ‘वंदे मातरम्’ ने करण्याची परंपरा सुरु झाली. पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर हे नामांकित संगीतकार आणि देशभक्त गायक दरवर्षी हे गीत भारतियांसाठी अत्यंत निष्ठेने गात.
१९२३ च्या या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जौहर (अली बंधूंपैकी एक) हे होते. जेव्हा पंडित पलुस्कर अधिवेशनाच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ गाण्यासाठी मंचावर आले, तेव्हा अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली यांनी त्यांना मध्येच रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की या गीतात देवी-देवतांचे वर्णन आहे, मुस्लिम धर्मानुसार आम्हाला ही देवी-देवतांची वर्णने गायन हे निषिद्ध आहे.
या अचानक झालेल्या विरोधाने कांग्रेस मधील सर्व नेते थक्क झाले. ज्या वंदे मातरम गायनाने कांग्रेस मधील तसेच सगळे क्रांतिवीर जेल मध्ये होते किंवा बलिदान देत होते, त्यांना हा विरोध सरळ-सरळ अमान्य होता. त्याचा वेळी पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी अत्यंत कणखर भूमिका घेतली. त्यांनी गाणे थांबवण्यास स्पष्ट नकार दिला
आणि मौलाना मोहम्मद अली जौहर यांना ठणकावून सांगितले,
“हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सार्वजनिक आणि राष्ट्रीय व्यासपीठ आहे, हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे प्रार्थनास्थळ नाही. त्यामुळे मला हे राष्ट्रीय गीत गाण्यापासून रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही.”
पंडितजींच्या या कृत्याला उपस्थितांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. पलुस्कर यांनी आपला शब्द पाळत संपूर्ण ‘वंदे मातरम्’ अत्यंत तन्मयतेने आणि ताकदीने गायले. या विरोधाचे प्रदर्शन म्हणून मौलाना मोहम्मद अली गायनादरम्यान काही काळ मंचावरून बाजूला झाले.
काँग्रेसचे लांगूलचालन
१९०१ साली काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गाणे पहिल्यांदा गायले गेले आणि तिथून पुढे काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात किंवा सांगता या गीताने होणे ही परंपरा बनली. देशातल्या प्रत्येकाच्या मनावर हे गाणे कोरले गेले होते.
परंतु, दुर्दैवाने देशाच्या राजकारणात मुस्लिम लांगूलचालनाचा शिरकाव झाला. १९३७ नंतर काँग्रेसने मुस्लीम लीग आणि कट्टरपंथीयांच्या दबावापुढे मान तुकवली. या गाण्यात मूर्तीपूजा आहे, असा धार्मिक जिहादी आक्षेप घेत विरोध केला. परिणामी, ज्या गाण्याने संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अग्नीत प्राणांची आहुती देण्यास सज्ज झाला, त्याच वंदे मातरम दोन भाग केले गेले. १९३७ च्या कॉँग्रेस कार्यकारिणीने ‘वंदे मातरम्’ची फक्त पहिली दोन कडवी गाणे बंधनकारक केले आणि उर्वरित गीतावर बंदी घातली. हा केवळ वंदे मातरमचा अपमान नव्हता, तर ज्या क्रांतीकारकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणत प्राण सोडले, त्या सांडलेल्या रक्ताप्रती विश्वास घात होता.
वंदे मातरम् सांस्कृतिक चळवळ आणि वैचारिक लढा
काँग्रेसने ज्या ‘वंदे मातरम्’ला राजकीय सोयीसाठी कोपऱ्यात ढकलले होते, त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भारतीय जनता पार्टीने (भाजपा) आणि तिच्या विचारसरणीने केलं. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक आत्मा आहे आणि त्याला पूर्ण सन्मान मिळालाच पाहिजे, यासाठी राष्ट्रभक्तांनी देशभरात चळवळी उभारल्या.
“जर या देशात राहायचे असेल, तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल,” ही भूमिका केवळ राजकीय नव्हती, तर ती या मातीशी आणि दिलेल्या बलिदानाची जाणिव होती. संसदेच्या अधिवेशनाची सांगता ‘वंदे मातरम्’ने व्हावी, ही प्रथा सुरू करण्यात भाजपाच्या नेत्यांनी मोठी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हा लढा म्हणजे भारताची विसरलेल्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला पुनरुज्जीवित करण्याचा मार्ग होता.
याच प्रवासाचा सुवर्णक्षण म्हणजे वर्ष २०२६! अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांमुळे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला त्याचा पूर्ण आणि सर्वोच्च सन्मान मिळाला. ज्या गीताला जवळपास शतकभर धार्मिक तेढ निर्माणाचं शिक्का मारून जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला, ते आज भारताच्या संसदेपासून ते काश्मीरच्या लाल चौकापर्यंत आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अखंडपणे, संपूर्ण कडव्यांसह गायले जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार, राष्ट्रगीत ‘जन गण मन’चे गायन रोखणे किंवा त्यावेळी जाणीवपूर्वक गोंधळ घालणे हा गुन्हा आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता सरकारच्या प्रस्तावित दुरुस्ती मंजूर झाली तर ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे यासाठी हीच शिक्षेची तरतूद असेल.
२०२६ हे वर्ष यासाठी ऐतिहासिक ठरले, कारण आज सामान्य भारतीयाला हे गीत म्हणताना कोणत्याही राजकीय संकोचाला सामोरे जावे लागत नाही या बद्दल सरकारचे शतशः आभार. पिढ्यानपिढ्या भारतीय जनमानसाच्या निढळावर कोरलेल हे गीत पुन्हा उच्चरवाने गाण्याची पुन्हा वेळ आली आहे.