भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनेत केलेले नवा बदल हा केवळ पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा भाग नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय संघटनेने भविष्याची तयारी कशी करावी, याचा तो संदेश आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील ही नवी टीम म्हणजे अनुभव, तरुणांची ऊर्जा, महिलांचे प्रतिनिधित्व आणि तळागाळातील संपर्क यांचा सुरेख मेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या रचनेचे वर्णन ‘संघटनात्मक अनुभव, ऊर्जा आणि जमिनीवरील पकड यांचा त्रिवेणी संगम’ असे केले आहे.
हे समीकरण महत्त्वाचे आहे. राजकीय पक्षांचे खरे मूल्य केवळ निवडणुकीतील गणितांवर अथवा मतसंख्येवर ठरत नसते. आपली संस्थात्मक पुंजी आणि मूलभूत विचार न गमावता कालगतीनुसार बदलण्याची, नव्याने ऊर्जावान, तरुण होण्याची क्षमता किती आहे, यावरूनच खरी परीक्षा होते. भाजपने हा फरक समजावून घेतला आहे. आपल्या अनुभवी नेतृत्वाकडची शिदोरी सोबत ठेवून, संघटनेत नव्या रक्ताला वाव देणे, हा या बदलांचा मुख्य गाभा आहे. एका बलाढ्य राष्ट्रीय पक्षाने पिढीबदलाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.
भाजपची नवी राष्ट्रीय टीम पाहिली तर त्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस आणि १६ राष्ट्रीय चिटणीस आहेत. विनोद तावडे, स्मृती इराणी आणि पीयूष गोयल अशा अनुभवी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी आली आहे. त्याचवेळी प्रादेशिक संतुलन आणि महिलांचे प्रतिनिधित्व याकडे लक्ष दिले आहे. नव्या टीममध्ये १० महिलांचा समावेश हा केवळ आकड्यांचा खेळ नाही. भविष्यातील नेतृत्वाची एक फळी बांधण्याची दृष्टी त्यामागे आहे.
घराणेशाही नसणारी संघटना
भारतीय राजकारणात पिढीबदल किंवा सत्तांतर हा बहुधा मोठ्या नाट्याचा, बंडखोरीचा, कौटुंबिक कलहाचा आणि पक्षफुटीचा विषय असतो. भाजपमध्ये ही प्रक्रिया तुलनेने सहज होते. भारतातील बहुतेक पक्ष हे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या ताब्यात आहेत. तेथे पिढीबदल हेही आव्हान असते. अनेकदा कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीसारखी पक्षातली पदे वाटली जातात. हाच घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वांत मोठा आणि घातक दोष किंवा विकार आहे.
राजकीय पक्षाची कौटुंबिक जहागीर बनणे, हीच धोक्याची घंटा असते. तेथील पिढीबदल ही वर्चस्वाची हिंसक लढाई बनते. मग पक्ष फुटतात. गट-तट होतात आणि संघटनेचे कल्याण व कुटुंबाचे कल्याण एकच होऊन बसते. भाजपचे संघटन मॉडेल मुळातच वेगळे आहे. या पक्षाची राजकीय ओळख एका कुटुंबाशी बांधलेली कधीच नव्हती. पुढे असण्याची शक्यताही नाही.
भाजपकडे केडरवर आधारित मजबूत रचना, अनेक शिस्तबद्ध विभाग आणि राष्ट्रीय स्तरापासून अगदी राज्य, जिल्हा आणि थेट बूथ पातळीपर्यंत पसरलेले भक्कम जाळे आहे. भारतातील बहुतांश पक्ष एखाद्या करिश्माई नेत्याच्या किंवा घराण्याच्या भोवती फिरतात. मात्र, भाजपची खरी ताकद प्रचंड विस्तृत संघटनेचे नेटवर्क हीच आहे. या मूलभूत फरकामुळे एवढा मोठा संघटनात्मक फेरबदल घडूनही पक्षात कोणतेही नाराजीनाट्य होत नाही.
संस्थात्मक पाया आणि वाटचाल
भाजपच्या या संघटनात्मक शिस्तीचे आणि टिकून राहिलेल्या ऊर्जेचे मूळ समजून घेण्यासाठी त्याच्या स्थापनेपासूनचा प्रवास पाहायला हवा. १९५० च्या दशकात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापलेल्या भारतीय जनसंघापासून विचारसरणीचा पाया घातला गेला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या ‘एकात्म मानववाद’ आणि अंत्योदयाच्या विचाराने या संघटनेला वैचारिक दिशा दिली. सन १९७७ मध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी जनसंघ जनता पक्षात विलीन झाला आणि जनता सरकार आले. मात्र, वैचारिक निष्ठेच्या मुद्द्यावरून १९८० मध्ये जनसंघाचे नेते वेगळे झाले.
६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची अधिकृत स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. तेव्हा वाजपेयींनी उच्चारलेले ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा..’ हे वाक्य म्हणजे एका प्रचंड संघर्षाची नांदी होती. सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. राजकीय विरोधकांनी भाजपची टिंगल केली, पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि केडरचा विश्वास डगमगला नाही.
सन १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या रामजन्मभूमी आंदोलनाने आणि ऐतिहासिक रथयात्रेने राजकारणाची दिशाच बदलून टाकली. भाजप हा भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक अस्मितेचा समर्थक म्हणून उभा राहिला. १९९६ मध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांचे सरकार आले. त्यानंतर १९९८ आणि १९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) माध्यमातून वाजपेयींच्या नेतृत्वाखाली पूर्ण क्षमतेने सरकार चालवले गेले. या काळात अणुचाचण्या, पायाभूत सुविधा आणि अणुचाचणीसारख्या धाडसी निर्णयांनी भारताची जागतिक पत वाढवली.
२००४ आणि २००९ च्या पराभवानंतर पक्षाने कच खाल्ली नाही. उलट, संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमत मिळविले. हा विजय केवळ एका नेत्याचा नव्हता, तर तीन-चार दशकांपासून बूथ पातळीवर राबणाऱ्या कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या कष्टाचे ते फळ होते. २०१९ आणि त्यानंतर २०२४ च्या निवडणुकांपर्यंत भाजपने सत्ता टिकवून ठेवत स्वतःला भारतातील सर्वांत मोठा आणि प्रभावी राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित केले. दोन खासदारांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष बनण्यापर्यंत झाला आहे.
बदलत्या भारताचे प्रतिबिंब
या ताज्या फेरबदलातून पक्षाने एक संदेश दिला. अनुभव हा नक्कीच अमूल्य असतो, पण त्या अनुभवाचे रूपांतर संघटनेच्या साचलेपणात होता कामा नये. त्याच वेळी, तरुण रक्ताचा उत्साह म्हणजे जुना अनुभव कचऱ्यात फेकणे नव्हे. म्हणूनच ‘ऊर्जा अधिक अनुभव’ हे सूत्र भाजपने स्वीकारले आहे. सर्व जुन्या नेत्यांना एकदम बाजूला सारून सर्व नव्या नेत्यांच्या हातात अचानक सूत्रे सोपवणे, या बाळबोध कल्पनेपेक्षा हे अधिक परिपक्व धोरण आहे.
भाजपची सर्वांत मोठी ताकद म्हणजे केवळ निवडणूक जिंकणारी यंत्रणा एवढीच नाही. त्या यंत्रणेच्या मागे उभा असलेला संघटनात्मक परिसर (इकोसिस्टम) ही खरी शक्ती आहे. पक्षाचे केडर, बूथ पातळीवरील कार्यकर्ते, सतत चालणारे प्रशिक्षण, विविध समित्या, संवादाचे जाळे आणि अढळ वैचारिक निष्ठा या गोष्टी पक्षाला ताकद देतात. सुशासन, राजकीय फीडबॅक, मीडिया, आणि संघटन कार्यक्रमांसाठी पक्षातील अनेक यंत्रणा सतत काम करीत असतात.
हेच भाजपचे वेगळेपण आहे. अनेक पक्षांची संघटना केवळ निवडणुका जवळ आल्यावर जागी होते. भाजपचे राजकारण निवडणुकीपुरते सीमित नसते. त्याचे संघटनात्मक काम वर्षभर, अविरत सुरू असते. म्हणूनच या ताज्या फेरबदलांकडे केवळ २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून पाहणे संकुचित ठरेल.
भविष्यातील आव्हाने
या सगळ्यामागील मूळ प्रश्न अधिक व्यापक आणि मोठा आहे. भारत सध्या एका कालखंडात प्रवेश करत आहे. भारताच्या देशांतर्गत राजकीय चर्चेवर, धोरणात्मक पर्यायांवर, सामाजिक ऐक्यावर आणि राष्ट्रीय प्राधान्यावर प्रभाव टाकण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न बाहेरून होत राहतील. भारताच्या अंतर्गत बाबींमधील असा संभाव्य हस्तक्षेप ही काळजीपूर्वक नोंद घेण्याची गोष्ट आहे.
आता भारताकडे जगातील परस्परविरोधी हितसंबंधी शक्ती आकर्षित होणारच. सध्याही ते दिसतेच आहे. अशा वेळी, राष्ट्रीय ध्येय हे केवळ निवडणुकांचे नसते. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे जे भव्य स्वप्न मोदी पाहतात, त्यासाठी धोरणसातत्य, संस्थात्मक क्षमता, राजकीय स्थैर्य, सामाजिक सलोखा आणि नागरिकांना राष्ट्रीय उद्दिष्टे समजावून सांगणारी संघटना आवश्यक आहे. हे सगळे भाजपला आता ताकदीने करावे लागेल.
यासाठी काम करणाऱ्या समित्या हव्यात. वर्षानुवर्षे संघटना बांधणारे कार्यकर्ते हवेत. यासाठी कडक शिस्त, वैचारिक कमिटमेंट आणि समर्पण वृत्ती लागते. भाजपमध्ये ही जमेची बाजू आहे. कारण पक्षाच्या मोठ्या केडरसाठी राजकारण हा व्यवसाय नाही. ती एक संघटनात्मक निष्ठा तसेच जीवनाचे व्रतच आहे.
विरोधक कदाचित या फेरबदलांकडे केवळ पुढच्या निवडणुकीची गणिते मांडणारा प्रयत्न म्हणून पाहतील. तसे पाहणे चूक ठरेल. निवडणुका महत्त्वाच्या आहेतच, पण त्या संपूर्ण चित्राचा छोटा भाग आहेत. यामागची खरी कथा भाजपच्या संस्थात्मक सातत्याची आहे. यातूनच आत्मविश्वास निर्माण होतो.
ज्येष्ठांचा आणि तरुणांचा मेळ घालणारा हा पक्ष वैयक्तिक करिअरला फार किंमत देत नाही. म्हणूनच भाजपचा हा ताजा चमू बरेच काही सांगून जाणारा आहे. ज्या देशात पिढीबदल म्हणजे कौटुंबिक हक्क असे मानले गेले आणि राजकीय मतभेद हे व्यक्तिगत वैमनस्यात बदलले, तिथे भाजपने वेगळा वस्तुपाठच घालून दिला आहे.
येती सन २०२९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक येईल आणि जाईल. पण २०४७ च्या उद्दिष्टासाठी आवश्यक असणारी गती भाजप देऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी केवळ लोकप्रिय नेते नव्हेत, तर समर्पित कार्यकर्त्यांची फौज लागते. वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक शिस्त लागते. सतत अद्ययावत राहावे लागते. भाजपमधला ताजा फेरबदल केवळ पुढच्या निवडणुकीच्या लढाईसाठी नाही, तर येत्या काही दशकांतली भारताची राजकीय आणि राष्ट्रीय दिशा ठरविण्यासाठी आहे. एका मोठ्या लढाईसाठी भाजप स्वतःला तयार करत आहे! इतरही राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे…